धेंपो ‘जीपीएल’चे चॅम्पियन

एमसीसीचा ११३ धावांत खुर्दा : विकास सिंग, रोहन बोगाटीचे ४ बळी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th March 2023, 12:42 am
धेंपो ‘जीपीएल’चे चॅम्पियन

जीपीएल विजेत्या धेंपो क्रिकेट क्लब सोबत अध्यक्ष विपुल फडके, दया पागी, जे.टी. सचिव रूपेश नाईक, प्रशि‌क्षक आणि क्रिकेट ऑपरेशन्स संचालक प्रकाश मयेकर, राजेश धेंपो, अनंत कामत व इतर.

मडगाव : धेंपो क्रिकेट क्लबचे गोलंदाज विकास सिंग आणि रोहन बोगाटी यांच्या फिरकीसमोर एमसीसीच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकल्याने धेंपो क्रिकेट क्लबने एमसीसीचा ७३ धावांनी पराभव करून गोवा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या गोवा प्रीमियर लीग (जीपीएल) क्रिकेट चषकावर आपले नाव कोरले.
ही तीन दिवशीय लढत फिरकी गोलंदाजांच्या पूर्ण आहारी गेलेल्या पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आली होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विजयासाठी १८७ धावांचा पाठलाग करताना एमसीसीचा दुसरा डाव बिनबाद ४ धावांवरून ११३ धावात संपला. एमसीसीसाठी सर्वाधिक धावा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू दर्शन मिसाळ (२१) ने केल्या. सुमीरन आमोणकर आणि प्रथमेश गावस यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या. तर किथ पिंटो १५ धावांवर नाबाद राहिला. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स एमसीसीचा कर्णधार दर्शन मिसाळने पटकावल्या. तर सर्वाधिक धावा साळगावकर क्रिकेट क्लबच्या दीपराज गावकरने केल्या.
संक्षिप्त धावफलक :
धेंपो क्रिकेट क्लब : पहिला डाव सर्वबाद १५७ धावा
दुसरा डाव ६९.३ षटकांत सर्वबाद २०५ धावा
एमसीसी : पहिला डाव ५४ षटकांत सर्वबाद १७६
दुसरा डाव २ षटकांत बिनबाद ४ धावांवरून ४८.१ षटकांत सर्वबाद ११३ धावा. (सुमीरन आमोणकर १८, प्रथमेश गावस १८, शांतनू नेवगी ०, शौर्य जगलान ६, पियुष यादव २, वेदांत नाईक ५, दर्शन मिसाळ २१, दिगेश रायकर ५, हेरंब परब २, किथ पिंटो नाबाद १५, समर्थ राणे ५ धावा. विकास सिंग ५१-४, रोहन बोगाटी ३५-४, यश परब ११-१.)