ऑलिम्पिक सायकलिंग टायम् ट्रायल स्पर्धा उत्साहात

विशेष विद्यार्थ्यांकरिता सासष्टी रायडर्स मडगावतर्फे आयोजन

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th March 2023, 12:35 am
ऑलिम्पिक सायकलिंग टायम् ट्रायल स्पर्धा उत्साहात

विशेष विद्यार्थ्यांसह विशेष ऑलिम्पिक मशाल प्रज्वलित करताना आयएएस अजित राॅय, व्हिक्टर वाझ, प्रदीप डिकाॅस्टा, मुकेश सगलानी, डॉ. सिस्टर लिझान, समीर नाडकर्णी, डॉ. विश्वजीत फळदेसाई.

मडगाव : सासष्टी रायडर्स-मडगावतर्फे गोव्यातील विशेष स्कूल विद्यार्थ्यांकरिता प्रथम अखिल गोवा विशेष ऑलिम्पिक सायकलिंग टायम् ट्रायल स्पर्धा २०२३ कार्मेल महिला काॅलेज नुवे मैदानावर यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. गोव्यातील १५ विशेष स्कूलमधून एकूण १२७ विशेष विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.
सदर स्पर्धेचे आयोजन विशेष ऑलिम्पिक भारत, गोवा, गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्ट विशेष स्कूल, मडगाव, वेर्णा औद्योगिक उद्योजक संगठना, वेर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रो पेडलर्झ-मडगाव व कार्मेल महिला काॅलेज, नुवे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजित राॅय आयएएस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी विशेष स्कूल विद्यार्थ्यांसाठी आयोजित गोव्यातील या प्रथमच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सासष्टी रायडर्स मडगावचे कौतुक केले. ते म्हणाले, या आयोजनामुळे साष्टी रायडर्सच्या मुकूटात आणखी एक मानाचा तुरा प्राप्त झाला आहे.
सामाजिक संस्था व सर्वांनी मिळून सार्वजनिक जनजीवन व खास करून मुलांचे जीवन निरोगी, आनंदी व तणावमुक्त बनविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे अजित राॅय यांनी यावेळी आवाहन केले.
विशेष ऑलिम्पिक्स भारत, गोवाचे राष्ट्रीय संचालक व्हिक्टर वाझ, गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्ट विशेष स्कूल, मडगावचे चेअरमन मुकेश सगलानी व कार्मेल महिला काॅलेजच्या मॅनेजर सिस्टर शांती यांनी यावेळी विचार प्रकट केले. प्रो पेडलर्झ, मडगावचे अध्यक्ष डाॅ. विश्वजीत फळदेसाई, कार्मेल महिला काॅलेजच्या प्राचार्या सिस्टर लिझान व कार्मेल हायर सेकंडरीच्या प्राचार्या सिस्टर मारीनेल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रारंभी सासष्टी रायडर्स, मडगावचे अध्यक्ष समीर नाडकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करून या विशेष ऑलिम्पिक सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनामागचे प्रयोजन कथन केले. सासष्टी रायडर्स, मडगावतर्फे गतसाली गुजराती समाज विशेष स्कूल विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात आलेल्या सायकलींचा अपेक्षित उपयोग करण्यात आल्याने त्यांना आणखी दोन सायकली प्रदान करण्याचेही समीर नाडकर्णी यांनी जाहीर केले.
वेर्णा औद्योगिक उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डिकाॅस्टा यांनी आभार प्रदर्शन केले. साष्टी रायडर्सच्या बिनी नाडकर्णी, गुजराती समाज विशेष स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक प्रशांत तारी व शारीरिक शिक्षण प्रशिक्षक उल्हास महाले यांनी स्पर्धा समन्वयक म्हणून काम पाहिले.