जोशीमठ : रहिवासी अडकले हॉटेलमध्ये

Story: राज्यरंग | सुदेश दळवी |
27th March 2023, 11:50 Hrs
जोशीमठ : रहिवासी अडकले हॉटेलमध्ये

नववर्षाच्या सुरुवातीलाच उत्तराखंड येथील जोशीमठ शहरावर कोसळलेल्या संकटाने येथील लोकांचे सर्वस्वच हिरावून घेतले. आजही या शहरातील घरांना भेगा पडत आहेत, काहींची घरे जमिनीत रुतत असून डोंगराचा भाग खचू लागला आहे. उत्तराखंड सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यावेळी स्थानिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले, तर काहींनी भाड्याच्या खोल्या व हॉटेलमध्ये रात्री जागवल्या. ७ खोल्यांच्या तीन मजली इमारतीत राहणारे ५ जणांचे एक प्रशस्त कुटुंब आज हॉटेलच्या १० बाय १०च्या खोलीत कोंबलेल्या अवस्थेत रहात आहेत. आता हॉटेलवाल्यांनीही त्यांना अल्टिमेटम दिला की, ३१ मार्चपर्यंत खोली खाली करा. कारण, चारधाम यात्रेमुळे तीर्थयात्रींचे बुकिंग सुरू होणार आहे. दरम्यान, शहरात भाड्यानेही घर मिळेनासे झाले आहे. मुलांची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. अशा वेळी येथील स्थानिकांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.            

सुमारे चार हजार इमारती असलेल्या ११.५ चौरस किमीत विस्तारलेल्या शहरातील २.५ चौरस किमी क्षेत्रातील ८६८ घरांना भेगा पडल्या आहेत. यापैकी १८१ निरुपयोगी घोषित केले गेले. सुमारे ७०० लोकांना आपले घर सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागला. या लोकांना सरकारी मदत म्हणून १.५० लाख रुपये आणि ६ महिन्यांसाठी भाड्याच्या घरासाठी ५ हजार रुपये दरमहिन्याला दिले जात आहेत. परंतु, सरकारी मदत मिळाल्यानंतर ७ दिवसांच्या आत घर रिकामे करावे लागणार आहे. ४ ते ७ जणांचे कुटुंबीय ५ हजार रु. च्या भाड्याच्या लहान घरात सामानासह कसे राहू शकतात? सरकारने नगरपालिकेत तीन वेळा खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. परंतु, त्यासाठी मुले आणि पत्नीला लाचारांसारखे तासनतास रांगेत उभे राहावे लागते, असे सांगताना हॉटेल साईधाममध्ये राहत असलेल्या चंद्रमोहन यांचे डोळे भरून आले. व्यवसायाने ठेकेदार असलेल्या चंद्रमोहन यांच्या तीन मजली घरालाही तडे गेले आहेत. ते ७७ दिवसांपासून हॉटेलमध्ये आहेत.            

दुहेरी विस्थापनाचा मार सहन करणाऱ्या पीडितांना आता कोणताही मार्ग दिसत नाही. सरकार घरांच्या भरपाईसाठी २५-३७ हजार रुपये प्रति चौरस मीटर देणार, असे सांगत आहे. परंतु, पीडितांचे म्हणणे आहे की, एवढ्यात तर आम्हाला जमीनही मिळणार नाही. तेथे घर कसे बांधायचे? आपल्या मागणीसाठी गेल्या ७७ दिवसांपासून ते तहसीलसमोर सातत्याने धरणे देत आहेत. परंतु, अजून सरकारकडून कोणतीही दीर्घकालीन योजना सांगितली गेली नाही.             

जोशीमठ शहरात असे एकही घर, दुकान, शाळा, मठ आणि मंदिर सापडणार नाही, ज्याला तडे गेले आहेत. परंतु, अनेक लोक हे तडे लपवत आहेत. सरकार आपल्या घरावरही लाल फुली मारेल आणि बेघर होऊ, असे त्यांना वाटत आहे. २ जानेवारीला ज्या घरांना हलके तडे गेले होते ते दिवसेंदिवस मोठे होत आहेत. या घरात राहणाऱ्या लोकांना रात्रभर झोप लागत नसून ते भयभीत झाले आहेत.