लोकशाहीसाठी ‘गांधीं’चा त्याग

प्रियंका गांधी : दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्याग्रह


27th March 2023, 12:49 am
लोकशाहीसाठी ‘गांधीं’चा त्याग

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. देशाच्या लोकशाहीला माझ्या कुटुंबाने रक्त शिंपडलं आहे. त्यामुळे तुम्ही अशा कुटुंबाचा अपमान कसा काय करू शकता? असा प्रश्न प्रियंका गांधी यांनी विचारला.

रविवारी सर्व राज्यांतील जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर महात्मा गांधीं यांच्या पुतळ्यासमोर पक्षाचे मोठे नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महासचिव प्रियंका गांधी सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील राजघाटावर पोहोचले. दिल्ली पोलिसांनी येथे कलम १४४ लागू केले असले तरी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, आजपर्यंत आम्ही गप्प बसलो, तुम्ही आमच्या कुटुंबाचा अपमान करत राहिलात. माझा भाऊ म्हणाला, मी तुमचा तिरस्कार करत नाही. फक्त आपली विचारधारा वेगळी आहे. मला विचारायचे आहे की, तुम्ही माणसाचा किती अपमान कराल. भगवान राम आणि पांडव कुटुंबवादी होते का? आमचे कुटुंब देशासाठी शहीद झाले, तर आम्हाला लाज वाटली पाहिजे का? जे आमचा अपमान करत आहे आणि आम्हाला घाबरवत आहात. आम्ही अधिक ताकदीने लढू. आम्ही आजही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. जे हुकूमशहा असतात ते प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना नेहमी दाबण्याचा प्रयत्न करतात. या अदानीमध्ये असे काय आहे की, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही अदानींना का वाचवत आहात.

राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा ते (भाजप) त्यांना दाबण्यासाठी मानहानीचा तमाशा करत आहेत. हे एक षड्यंत्र आहे; ज्याच्या विरोधात राहुल गांधी लढत आहेत. संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे.

-काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

राहुल गांधी यांना एका कायद्यानुसार जबाबदार धरण्यात आले आहे. आम्हाला विश्वास आहे की अपील हा याला मागे टाकण्याचा एकमेव मार्ग आहे. एक वकील म्हणून मी स्पष्टपणे दाखवू शकतो की निकालात अनेक त्रुटी आहेत.

- सलमान खुर्शीद.


लोकसभेच्या संकेतस्थळावरून हटवले नाव

राहुल यांचे संसद सदस्यत्व शुक्रवारी संपुष्टात आले. लोकसभा सचिवालयाने एक पत्र जारी करून याबाबत माहिती दिली होती, त्यासोबतच लोकसभेच्या वेबसाइटवरून राहुल यांचे नावही हटवण्यात आले होते. २०१९ मध्ये राहुल यांनी कर्नाटक विधानसभेत मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते.