जुने गोवेत काँग्रेसचा ‘संकल्प सत्याग्रह’

गांधी पुतळ्याजवळ निदर्शने : राहुल गांधींच्या अपात्रतेचा निषेध

Story: प्रतिनिधी। गाेवन वार्ता |
27th March 2023, 12:15 am
जुने गोवेत काँग्रेसचा ‘संकल्प सत्याग्रह’

पणजी : मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर त्यांना लोकसभेतून अपात्र केल्याने या अन्यायाच्या निषेधार्थ रविवारी जुने गोवे येथील गांधी पुतळ्याजवळ गोवा काँग्रेसने ‘संकल्प सत्याग्रह’ केला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही भाग घेतला. भाजप सरकार विरोधी पक्षातील कोणावरही अशी वेळ आणू शकते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या विरोधात लढा द्यावा लागेल, असे यावेळी उपस्थित असलेल्या नेत्यांनी सांगितले.

या संकल्प सत्याग्रहात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लुस फरेरा, खासदार फ्रान्सिस सार्दिन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष बिना नाईक, काँग्रेस नेते अॅड. वरद म्हार्दोळकर, एम. के. शेख, अमरनाथ नाईक, युवा अध्यक्ष जॉयल आंद्रादे, संजय बर्डे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी अदानी आणि भाजप यांचे संबंध लोकांसमोर आणल्याने त्यांना गप्प करण्यासाठी अपात्र करण्यात आले आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनाविल्यावर २४ तासांत त्यांना अपात्र करण्यात आले. मात्र गोव्यात १८ आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, तरी त्यांच्यावर वर्षानुवर्षे निर्णय का होत नाही, असे विराेधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. कर्नाटकात स्टील इंडस्ट्री येणार असून त्यांना सहकार्य करण्यासाठी केंद्र सरकारने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना म्हादई वळविण्यास सांगितले आहे, असे ते म्हणाले.

भाजप सरकार लोकशाही विरोधात काम करत आहे. भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना आणि पत्रकारांनादेखील स्वातंत्र्य राहिलेले नाही. काही महिन्यांपूर्वी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात पाठविले, तर आता राहुल गांधी यांना तुरुंगात पाठविण्याची त्यांना तयारी केली आहे, असे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी काहीच चुकीचे केले नाही. ज्यासाठी त्यांना दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे, त्या गुन्ह्यासाठी सर्वाधिक शिक्षा दोन वर्षाची आहे. त्यांना सहा महिने, एक वर्ष किंवा दीड वर्ष शिक्षादेखील देऊ शकले असते. या निर्णयावरून देशात काय सुरू आहे, हे लोकांनीही पाहिले आहे, असे आमदार कार्लुस फरेरा यांनी सांगितले.

.....

भाजप सरकारमुळे लोकशाही धोक्यात असून हुकूमशाही सुरू झाली आहे. या विरोधात क्रांती झालीच पाहिजे. राहुल गांधी यांनी पदयात्रा केल्यानंतर त्यांच्यासोबत लाखो लोक असल्याचे निदर्शनास आल्यावर केंद्र सरकारला भीती वाटली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.

- अमित पाटकर, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष