लवलिना, निखत बनल्या ‘विश्व चॅम्पियन’

जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचा ‘गोल्डन’ चौकार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th March 2023, 12:14 am
लवलिना, निखत बनल्या ‘विश्व चॅम्पियन’

निखत जरीन     लवलिना बोर्गोहेन, 

दिल्ली : महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या बॉक्सिंगपटूंनी इतिहास घडवला. भारताची बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेन हिने ७५ किलो वजन गटात, तर निखत जरीनने ५० किलो वजन गटात सुवर्णपदकावर मोहर उमटवली. निखतने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने अंतिम फेरीत दोनवेळा आशियाई चॅम्पियन असलेल्या व्हिएतनामच्या गुयेन थी टॅम हिचा ५-० असा पराभव केला. तर लवलिनाने ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करचा ५-२ असा पराभव केला. तिच्‍या या कामगिरीमुळे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने चौथ्‍या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
लवलिनाने याआधी २०१८ आणि २०१९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तर टोकियो ऑलिम्पिकमध्येही लवलिनाने कांस्‍यपदक पटकावले होते. त्‍यामुळे महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये देशवासीयांना तिच्‍याकडून मोठ्या अपेक्षा होत्‍या. तिने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
लवलिनाचा सामना चुरशीचा होता. पहिली फेरी लवलिनाने जिंकली होती. मात्र, दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियन खेळाडूने दमदार पुनरागमन करत ही फेरी जिंकली. तिसऱ्या फेरीत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली. फेरीच्या शेवटी लवलिनाने काही चांगले पंच केले आणि यामुळे सामना रिव्ह्यूवर गेला जिथे लवलिना जिंकली.

निखतची चमकदार कामगिरी
अंतिम सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. तिने पहिल्या फेरीत ५-० अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या फेरीतही ही आघाडी कायम ठेवली. तिसऱ्या फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी टॅम बॉक्सरवर जोरदार ठोसा लगावला. पंचांनी व्हिएतनामी बॉक्सरची प्रकृती जाणून घेण्यासाठी सामना थांबवला. याचवेळी निखतचा विजय निश्चित झाला होता. अखेरीस तिने ५-०च्या फरकाने सामना जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्‍ये सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली.
......
भारताला चौथे सुवर्णपदक
शनिवारी (दि. २५) नीतू घनघासने ४८ किलो गटात सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर स्वीटी बुरा हिने ८१ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. स्वीटीने चीनच्या लिना वॉन्गचा ४-३ असा पराभव केला होता. तर रविवारी निखत जरीन आणि लवलिना बोर्गोहेन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदकावर मोहर उमटवली.