धेंपो-एमसीसी अंतिम लढत रंगतदार स्थितीत

जीपीएल :मंथनचे शतक, दीपचे अर्धशतक; बोगाटीचे ५, तर दर्शनचे सामन्यात १५ बळी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th March 2023, 12:09 am
धेंपो-एमसीसी अंतिम लढत रंगतदार स्थितीत

मडगाव : जीपीएल स्पर्धेतील अंतिम लढत रंगतदार अवस्थेत आहे. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या लढतीच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी एमसीसी संघाला विजयासाठी आणखी १८३ धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा एमसीसीने बिनबाद ४ धावा केल्या होत्या.
धेंपो क्रिकेट क्लबच्या पहिल्या डावातील १५७ धावांना एमसीसीने ५ बाद १३५ धावांवरून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर आपल्या डावात सर्वबाद १७६ धावा केल्या. धेंपोसाठी रोहन बोगाटीने ५, तर विकास ‌सिंग व यश परबने प्रत्येकी २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, पहिल्या डावात १९ धावांनी पिछाडीवर राहिलेल्या धेंपो क्रिकेट क्लबने आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद २०५ धावा केल्या. नाबाद शतकी खेळी केलेल्या मंथन खुटकर (१८८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद १०८ धावा) व दीप कसवणकरच्या (११९ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५९ धावा) यांच्या जिगरबाज फलंदाजीमुळे धेंपोने एमसीसीवर वर्चस्व गाजवले. या दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची आकर्षक शतकी भागिदारी केली.
मंथन व दीप या दोघांव्यतिरिक्त यश परब (१७) वगळता धेंपो क्रिकेट क्लबच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. करण वशेदिया(५) व अभिनव तेज राणा (२) हे तंत्रशुद्ध फलंदाज सपशेल अपयशी ठरले. धेंपोसाठी कर्दनकाळ ठरला तो एमसीसीचा कर्णधार दर्शन मिसाळ. दर्शनने ७८ धावांत ८ विकेट्स काढल्या. या स्पर्धेतील चार सामन्यांत दर्शनच्या नावावर आता ३३ विकेट्सची नोंद झाली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा एमसीसीच्या सुमीरन आमोणकर (२) व प्रथमेश गावस (१) नाबाद खेळत होते.
संक्षिप्त धावफलक :
धेंपो क्रिकेट क्लब : प. डाव- सर्वबाद १५७ धावा.
दु. डाव- ६९.३ षटकांत सर्वबाद २०५ धावा (करण वशेदिया ५, मंथन खुटकर १०८, अभिनव तेज राणा २, दीप कसवणकर ५९, सोहम पनवलकर ०, विकास सिंग ०, लक्षय गर्ग ५, वासू तिवारी २, यश परब १७, राहन बोगाटी ४, फरदीन खान ०. दर्शन मिसाळ ७८-८, हेरंब परब १४-१, किथ पिंटो ६२-१.
एमसीसीसी : प. डाव- ५४ षटकांत सर्वबाद १७६ धावा (पियुष यादव ४४, दर्शन मिसाळ १९, वेदांत नाईक १४, दिगेश रायकर नाबाद ९, हेरंब परब ३, समर्थ राणे १. रोहन बोगाटी ६७-५, विकास सिंग ६२-२, यश परब २२-२.)
दु. डाव - २ षटकांत बिनबाद ४ धावा (सुमीरन आमोणकर नाबाद २, प्रथमेश गावस नाबाद १. अवांतर १ धाव.)