सरावाचे सागर क्रमून साधक पैलतीर गाठतात

मन-पवनाची वाट क्रमून म्हणजे श्वासोच्छवासावर मन केंद्रित करून जे अबाधितपणे थेट व्योमी म्हणजे चिदाकाशांत पोचतात ते देहधारी असतानाच ब्रह्मत्व प्राप्त झालेले असतात, असे मी हे अर्जुना, तुला म्हटले होते. यम-नियमांचे दुर्घट, कठीण डोंगर निर्धाराने अथकपणे ओलांडून तसेच अभ्यासाचे (म्हणजे सरावाचे) सागर क्रमून ते साधक पैलतीराला पोचतात हे निश्चित. स्वतःला निर्लेप, विशुद्ध करून त्यांनी जीवनाचा हा प्रपंच जोखलेला असतो आणि या सगळ्यातून तावून-सुलाखून, अनुभवसिद्ध होऊन मग ते स्वतःच परब्रह्म होऊन राहिलेले असतात.

Story: विचारचक्र | मिलिंद कारखानीस |
27th March 2023, 12:03 am
सरावाचे सागर क्रमून साधक पैलतीर गाठतात

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो:।                              

प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ।। २७।।                         

यतेन्द्रियमनोबुध्दिर्मुनिर्मोक्षपरायण:।                              

विगतेच्छाभयक्रोधो य: सदा मुक्त एव स:।। २८।। 

हे अर्जुना, बाहेरच्या विषयांना त्यांचे चिंतन न करता बाहेरच सोडून व नेत्रांची दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण व अपान वायूंना सम करून ज्याने इंद्रिये, मन व बुद्धी यांना वश केले आहे व जो मोक्षपरायण मुनी तो परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतन मनन करणारा मुनी इच्छा, भय व क्रोध या तिन्ही विरहित झाला, तो सदा मुक्तच आहे.                              

     एखादा माणूस चिडून वागायला लागला की आपण म्हणतो त्याला राग आला आहे, ‘उसको गुस्सा आया है,’ म्हणून तो तसा वागतो. या अर्थाने आपण राग हा शब्द मराठीत वापरतो. पण त्या शब्दाचा अध्यात्मिक वापर वेगळा आहे. जशी दात घासण्याची पेस्ट वा पावडर कोणत्याही बनावटीची असली तरी तिला ‘दंतमंजन’ अशी संज्ञा आहे, त्याप्रमाणे इंद्रियांच्या विषयांपासून उत्पन्न होणाऱ्या (कुठल्याही) सुखाच्या हव्यासाला ‘राग’ म्हणतात! आणि ज्याला - जिला त्या सुखांचा हव्यास नाही त्याला ‘वीतराग’ म्हणतात. असा हव्यास वा ओढ नसणे, इतकेच नव्हे तर त्या सुखांची साधी इच्छाही नसणे या गुणविशेषाला ‘वैराग्य’ म्हणतात. हे वैराग्य प्रयत्नाने अंगी बाणवता येते, असे म्हणतात. तसा त्या वैराग्याचा आधार घेऊन जे विषयांनाच मनातून काढून टाकतात, चर्मचक्षू मिटून घेऊन मनोवृत्ती एकाग्र करून जे आपल्या मनाचा मोहरा शरीराच्या आतल्या बाजूला वळवतात; इडा, पिंगला आणि मंगला सुषुम्ना या तीन नाड्या जिथे भेटतात, त्या भुवयांची अग्रे एकत्र होण्याच्या ठिकाणी आपली दृष्टी उफराटी वळवून नासिकाग्री सुस्थिर ठेवतात. मूलाधार चक्रापासून निघून डाव्या नाकपुडीतून वारा वाहणारी जी नाडी तिला इडा किंवा चंद्रनाडी म्हणतात. तसेच मूलाधार चक्रापासून निघून उजव्या नाकपुडीतून वारा वाहणारी जी नाडी तिला पिंगला किंवा सूर्यनाडी असे म्हणतात. या दोन नाड्यांमधील पोकळीला ‘सुषुम्ना’ म्हणतात. तारायंत्रापुढील प्रगती ज्याप्रमाणे बिनतारी संदेशवहन तंत्राने गाठली त्याप्रमाणे योगी या सुषुम्ना मार्गाने संदेश देण्याचे किंवा ज्ञानसंपादनाचे कार्य करू शकतात. सामान्य मनुष्याचे बाबतीत हा मार्ग बंदच असतो. सुषुम्नेच्या मूलाधाराकडील टोकाला कुंडलिनी - प्राणशक्ती - सुप्तरूपाने असते आणि ती जागृत झाली म्हणजे सुषुम्ना मार्गाने वर जाऊ लागते.                              

मनुष्य डोळ्यांनी नेहमी बाहेरील सृष्टी पाहतो. तसे बाह्यसृष्टीकडे न पाहता अंत:सृष्टीकडे पाहणे, नजर आत वळविणे, ‘हे काय?’ याचा शोध घेण्याऐवजी ‘मी कोण?’ याचा शोध घेणे, स्वरूपाकडे पाहणे ही ‘उफराटी’ दृष्टी होय.                              

नासिकाग्र म्हणजे दोन भुवयांच्या सांध्याजवळील नाकाचे टोक. डोळे मिटून ध्यान करताना मन:चक्षूंची दृष्टी तेथे म्हणजे भ्रूमध्यात स्थिर करावी असा शास्त्रीय संकेत आहे. इडा व पिंगला या दोघींना मनातून उणे करून, प्राण व अपान समान करून जे आपल्या मन:चक्षूंची दृष्टी चित्ताला संलग्न असलेल्या चिदाकाशी नेऊन ठेवतात, त्यांचा प्रभंजनाच्या योगाने चिदाकाशी मनोलय होतो! चिदाकाश म्हणजे चित्ताचे, चित्ताला संलग्न असलेले आकाश. चैतन्यरूप - ज्ञानरूप - आकाश. अनंत विस्तार, अलिप्तता आणि शिवाय शुद्ध ज्ञानमय अवस्था असा भाव तिथे दर्शवावयाचा असतो. ज्याप्रमाणे गंगा एकदा का समुद्राला मिळाली की मग तिच्यातले वहाळ, ओहोळ, नाले, ओढे, उपनद्या वेचून वेगळ्या काढता येत नाहीत, त्याप्रमाणे प्रभंजनाच्या योगाने एकदा का मन चिदाकाशी लय पावले की मग तिथे त्या मनातल्या इंद्रियांचा, त्याच्या विषयांचा, त्यांच्यापासून उद्भवणाऱ्या सुखदुःखांच्या कल्पनांचा, वासना-विचारांचा मनोव्यापार आपोआप थांबतो. पूर्णपणे थांबतो. ज्या पटावर संसाराच्या कल्पनेचे चित्र मुळात उमटते तो मनोरूप पटच फाटून जातो. जसे एकदा का सरोवर आटून सुकले की मग शोधूनही त्यात आपल्याला प्रतिबिंब दिसू शकत नाही, तसे अर्जुना, मनाचे सगळे मनपण समूळ लोपते. मग तिथे मीपणा, अहंकार, अहंभावादी विकार कसे व कुठे राहतील. धनंजया, म्हणून मग अशा स्थितीत शरीर धारण केलेला हा देही स्वानुभवाने ब्रह्मच होतो.            

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।                              

सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां 

शान्तिमृच्छति।। २९।।             

हे अर्जुना, माझा भक्त मला यज्ञ व तप यांचा भोक्ता सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर, त्याचप्रमाणे सर्व भूत प्राण्यांचा सुहृद म्हणजे नि:स्वार्थ-प्रेमी असे तात्विक दृष्टीने जाणून शांतिप्रत पावतो व  सच्चिदानंदघन परिपूर्ण शांत ब्रह्माखेरीज त्याच्या दृष्टीत दुसरे काहीच राहत नाही, केवळ वासुदेवच वासुदेव राहत असतो.                              

मन-पवनाची वाट क्रमून म्हणजे श्वासोच्छवासावर मन केंद्रित करून जे अबाधितपणे थेट व्योमी म्हणजे चिदाकाशांत पोचतात ते देहधारी असतानाच ब्रह्मत्व प्राप्त झालेले असतात, असे मी हे अर्जुना, तुला म्हटले होते. यम-नियमांचे दुर्घट, कठीण डोंगर निर्धाराने अथकपणे ओलांडून तसेच अभ्यासाचे (म्हणजे सरावाचे) सागर क्रमून ते साधक पैलतीराला पोचतात हे निश्चित. स्वतःला निर्लेप, विशुद्ध करून त्यांनी जीवनाचा हा प्रपंच जोखलेला असतो आणि या सगळ्यातून तावून-सुलाखून, अनुभवसिद्ध होऊन मग ते स्वतःच परब्रह्म होऊन राहिलेले असतात, असा योगमार्गाच्या उद्देशाचा सारांश श्रीकृष्णांनी पार्थाला विदीत केला. इथे श्रीमद्भग्वद्गीतेचा पांचवा अध्याय संपला.                              

ते ऐकून मर्मज्ञ कौन्तेय अंतरांत विस्मय पावला. हे कृष्णाने ताडले. मग त्यावर त्यांची जी मार्मिक चर्चा झाली, ती आपण पुढील म्हणजे सहाव्या अध्यायात पाहू. (क्रमशः)