आधुनिक युगातील रंगभूमीतील बदल आणि आव्हाने

'जागतिक रंगभूमी' या खास सदरातील लिहिलेल्या तीन लेखांचा आजच्या या लेखाने मी शेवट करतो. उद्या २७ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक रंगभूमीच्या World Theatre Day) हार्दिक शुभेच्छा!!!

Story: जागतिक रंगभूमी | श्रीधर कामत बांबोळकर |
25th March 2023, 11:48 pm
आधुनिक युगातील रंगभूमीतील बदल आणि आव्हाने

'Cultural attitude is the spine drama.' - थॉमस पार्क्स

भरतमुनींपासून शेक्सपियरन, रेस्टॉरेशन काळातील नेपथ्य आणि इब्सेनच्या प्रभावाने निर्माण झालेली रंगभूमी, नव्या कल्पना याकरिता नाट्यलेखनातही पुष्कळ परिवर्तने होतायत. लोकनाट्य, दशावतारी, यक्षगान आदी रंगतंत्राचा वापर नाट्यतंत्रातून होतोय.

बदलाच्या बाबतीत विसाव्या शतकातल्या अनपेक्षित वादळांना कारणीभूत ठरलेल्या दोन बाबी म्हणजे या शतकाच्या पहिल्या भागातली दोन महायुद्धे आणि दुसऱ्या भागात जन्माला आलेले संगणक तंत्रज्ञान. या शतकात विकसित झालेल्या तंत्रज्ञानामुळे माणसाच्या हातातील भयानक अस्त्रांनी त्याला जागतिक केले. म्हणूनच त्याचे परिणाम इतके खोल आणि सगळीकडे पसरणारे झाले आणि माणसाचे जीवन तळापासून ढवळून गेले.

मागोमाग झालेल्या संगणक तंत्राने या बदलाला पराकोटीचा वेग दिला आणि यातून सगळीकडे एक नवीन विश्वव्यापी संस्कृती आणि सभ्यता विस्तारित झाली. परंपरागत आचार, विचार, शिष्टाचार, संस्कार, संबंध आणि निष्ठा यांना धक्का देत नवे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली. या प्रक्रियेतून नवे तणाव, नवी आव्हाने आणि विसंगती जन्माला येणे अपरिहार्य ठरल्या. यामुळे माणसाच्या मनाची जी फरफट होतेय तिचे पडसाद कला-साहित्य आणि पर्यायाने रंगभूमीवर पडणे हे स्वाभाविक आहे.

आज आमच्या सांस्कृतिक जीवनात झालेल्या बदलांमधे 'सीडी रॉम' आणि 'इंटरनेट' यांचा परिणाम सगळ्यांपेक्षा जास्त जाणवतो अशी दाट शक्यता आहे. सध्या उसळलेल्या उदारीकरणाच्या लाटेने आमच्या आजवरच्या बहुतेक रिती, सामाजिक सवयी आपल्याला बुडवून सगळीकडे पसरवल्या. १९व्या शतकात शेक्सपियर, विसाव्या शतकात इबसेन, बेकेट, ब्रेक्थ, तसेच २१व्या शतकात अमेरिकेतल्या चालू यशस्वी कलाप्रकारांची छाप पडण्याची भीती आहे. मायकल जॅक्सनला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यास हे खरे दिसते.

याच कारणास्तव रंगकर्मी आणि नाट्य लेखकांसमोर हे आवाहन आहे. नाटक म्हणजे लोकांच्या रुचीवर टिकणारे साहित्य आणि लोकांसोबत संवाद साधण्याचे प्रभावी जिवंत माध्यम. विविध दृष्टिकोनातून प्रगल्भ असलेल्या भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टी नाटकांमधून सदैव टिकवून ठेवायला हव्यात. संस्कृती म्हणजे 'आम्ही कोण?' याचे दर्शन घडवून मानवी नाती घट्ट करावी लागतील. जागतिकीकरणानंतर जगभर एकच संस्कृती म्हणजे भोगवादी जीवनशैली करण्याकडे कल वाढलाय. संस्कृतीचे वाढलेले रिमिक्स पाहून मूळ रूपच हरवणार नाही ना, अशी भीती वाटते. चंगळवादात मूळ रूप हरवलेल्या समाजाची वाट आत्मनाशाकडे जाणार हे सत्य. ह्या परिस्थितीत रंगकर्मी, नाटककार नवी दिशा दाखवण्याचे कार्य करू शकतात.

नाटकाच्या नजरेने भाषा खूप महत्त्वाची असते. भाषेचे मूळ स्थान रंगभूमीमध्ये असावयास हवे, नाही तर बोलीभाषा नष्ट होणार. जागतिकीकरणाच्या वातावरणात बोलीभाषा कमी होणार आणि रंगभूमीवरच भाषा जिवंत राहणार. म्हणूनच आपापल्या गावात काम करीत राहणे महत्त्वाचे. तिथूनच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जरूर जावे. हेच एक नव्या शतकातले रंगकर्मीं समोरचे आव्हान.

सामूहिक मागणीनुसार, सामूहिक गरजेप्रमाणे उद्याच्या रंगभूमीवरचे काही प्रकार संपणार पण त्याचबरोबर सामूहिक मागणीप्रमाणे रंगभूमी काही नवे रूप घेऊन पुढे येणार. रंगभूमी आर्थिक दृष्टीने नुकसानीची. नाटक करून पोट भरत नाही. परंतु रंगभूमी संस्कार करते. सर्वांसमोर प्रश्न उभं करते. रंगभूमी ही एकच समाजाची कला. जोपर्यंत मनुष्य जात जिवंत असणार तोपर्यंत रंगभूमी निर्माण होत राहील.

मराठी रंगभूमीचे सातत्य इतरांना प्रेरणादायक 

१९३० ते १९५० हा मराठी रंगभूमीचा काहीसा विस्कळीत काळ. सिनेमाची भूल घालणारे नवे कला माध्यम मराठी नाटकाच्या आड आले. अशा आव्हानात्मक काळात काही महत्त्वाचे प्रयत्न झाले. मामा वरेरकर, प्र. के. अत्रे, गो. म. रांगणेकर, अनंत काणेकर अशा नाटककारांनी केलेली कामगिरी त्या विशिष्ट काळाच्या संदर्भात उल्लेखनीय स्वरूपाची झाली.

ह्याच काळात मराठी रंगभूमीचा शतकोत्सव साजरा करण्यात आला. डॉ. अमृत नारायण भालेराव यांनी घेतलेल्या पुढाकाराने मराठी रंगभूमीच्या नव्या युगाची सुरुवात झाली. पूर्वीचे नाटक संपते की काय असे वाटत असतानाच आत्माराम भेंडे यांच्या संस्थेने मौल्यवान कार्य करताना वेगळ्या विषयांची, शैलींची नाटके रंगभूमीवर आणली. भेंडे यांनी केलेल्या 'डावरेची वाट', 'आई', 'झोपलेले नाग', 'सशाची शिंगे' आदी नाटकांचे प्रयोग रंगभूमीची उभारणी करणारे ठरले. यांच्याशिवाय वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर आदी नाटककरांचे लेखन ह्याच दशकाच्या आधी सुरू झाले.

पुण्यात 'प्रोग्रेसिव ड्रामॅटिक असोसिएशन' ही संस्था १९५१ या वर्षी स्थापन झाली. प्रा. भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू यांचे योगदान नवी दिशा दाखवणारे ठरले. १९६० या वर्षी भाषावार प्रांतरचना होऊन महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर रंगभूमीच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य करणारी 'रंगायन' ही संस्था स्थापन झाली. भारतीय विद्या भवनच्या एकांकिका स्पर्धातून एकत्र आलेल्या कलाकार मंडळींनी नव्या नाट्यसंस्था निर्माण केल्या. या कलाकारांमध्ये दामू केंकरे यांच्यासारखे स्वयंभू नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार यांनी वेगळ्या शैलीचे प्रयोग केले.

१९६० ते १९८० या काळात प्रायोगिक नाटककारांची दिग्दर्शकांची पिढी निर्माण केली. विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी हे अगोदरच लिहीत होते. 'राजमुकुट' (मॅकबेथ), 'ऑथेल्लो' ह्या नाट्यकृती वि. वा. शिरवाडकरांच्या भाषा वैभवाकरिता, ताकदीच्या व्यक्तिरेखांमुळे लक्षात राहिल्या. परंतु त्यापेक्षा 'किंग लियर'च्या आधारे रचलेली 'नटसम्राट' ही नाट्यकृती या कालखंडात रंगभूमीचे मानदंड ठरली. मराठी रंगभूमीवर गडकरी यांच्या 'एकच प्याला' नंतर नटसम्राट ही शोकांतिका निर्माण झाली.

प्रायोगिक रंगभूमीचा विकास घडविण्यासाठी 'छबीलदास' चळवळीचा मोठा वाटा आहे. १९७४ ते १९८४ पर्यंत 'आधे अधुरे', 'उध्वस्त धर्मशाळा', 'जुलूस', 'हृवदन', 'पाहिजे जातीचे' अशा प्रकारची नाटके सादर करण्यात आली. या सगळ्या प्रयोग करणाऱ्यांना एकत्र आणणारी एक यंत्रणा म्हणजे सरकारची महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर योगदान देणाऱ्या काही महत्त्वाच्या संस्था म्हणजे 'आनंद संगीत मंडळी', 'कला वैभव', 'भद्रकाली', 'नाट्यसंपदा', 'चंद्रलेखा', 'इप्टा', 'मुंबई मराठी साहित्य संघ', 'दि गोवा हिंदू असोसिएशन' आदी.


मुंबईत कामगार रंगभूमीला मोठी परंपरा आहे. उत्सव व स्पर्धा या स्तरावरही नाटके होतात. संगीत नाटक ही मराठी रंगभूमीची एका काळातील वैभवशाली देणगी आहे. परंतु ह्या कालखंडात ते नाटक कमी होत गेले. विद्याधर गोखले, बाळ कोल्हटकर, दारव्हेकर यांनी हे सांभाळायचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षेप्रमाणे जरी अल्प प्रतिसाद मिळाला, तरी पारंपरिकतेला फाटा देणाऱ्या नाटकाच्या संगीताचे प्रयोग भास्कर चंदावरकर, जितेंद्र अभिषेकी, पुरु बेर्डे यांनी मागील काही वर्षांत केले. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, शिलेदार कुटुंबीय, छोटा गंधर्व, रामदास कामत आदी नाट्यसंगीत कलाकारांनी जुनी संगीत नाटके या कालखंडात मोठ्या प्रमाणात जपली.

नाटकाच्या बाहेरील रूपापेक्षा नाटकाचे आतील रूप महत्त्वाचे याची जाणीव आता वाढलीय. विषय, आशय, मांडणी यात वेगवेगळे प्रयोग करणारी प्रायोगिक रंगभूमीची चळवळ आजच्या रंगभूमीवर प्रभाव करणारी ठरलीय.

गोव्याची कोंकणी 'रंगमाची' फुलते

४३ वर्षांपूर्वी ‘कला अकादमी गोवा’तर्फे सुरू केलेल्या राज्य नाट्यस्पर्धेमुळे कोंकणी नाटक इतर भारतीय भाषांच्या पंगतीला बसले. आधुनिक कोंकणी नाटकाचा इतिहास शणै गोंयबाब उर्फ वामन रघुनाथ वालावलकार यांच्या काळापासून सुरू केला जातो. कला अकादमीच्या नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने कोंकणी नाट्यरचना करणारे बहुआयामी प्रतिभेचे एक भारतीय नाटककार पुंडलिक नायकांच्या रूपाने आम्हाला लाभले. कोंकणी रंगभूमीला त्यांनी आधुनिक स्तरावर पोहोचविले, राष्ट्रीय स्तरावरील संहिता निर्माण केल्या. आपली खास शैली आणि नाट्यतंत्र निर्माण केले. 'महाकवीची प्रतिभा असलेला हा लेखक २१व्या शतकात प्रयोगशील राहून कोंकणी नाटकाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणार याचा मला थोडाही संशय नाही.' असे डॉ. नंदकुमार कामत या विचारवंतांनी नायकांच्या नाटकाचे अध्ययन करताना लिहिलंय.

उत्सवी रंगभूमीवरून कोंकणी नाटक आपला पाया घट्ट करायला लागले. कला अकादमीचा 'रंगमेळ' रिपर्टरी कंपनीची नाटके विविध महोत्सवांत सादर करून प्रशंसेस पात्र ठरली. दत्ताराम बांबोळकर, एन. शिवदास, विष्णू वाघ आणि इतरांनी सातत्याने नवनवीन विषय आणि आशय घेऊन प्रभावी लेखन केले. प्रकाश वझरीकार आणि अविनाश च्यारीसारखे नाटककार लोककलेचा शोध घेताना स्थानिक प्रश्नासोबतच वैश्विक मूल्यांना नाटकातून मांडून कोंकणी नाटकाला नवे आयाम देण्याचा ते प्रयत्न करतात. प्रकाश थळी, वसंत सावंत यासारखे रंगकर्मी दुसऱ्या भाषांतील नाटके रूपांतरित किंवा भाषांतरित करून कोंकणी रंगभूमी प्रगल्भ करण्याची चांगली कामगिरी करतात.

'तियात्र' हा गोव्याच्या रंगभूमीवरील कोकणीतील एक खास असा नाट्यप्रकार. तियात्राच्या माचयेला १०० वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे. तियात्राची रंगभूमी ही कोकणीतली एकमेव व्यावसायिक रंगभूमी. १८८२ वर्षी मुंबईत 'इटालियन भुरगो' नावाचं पहिलं तियात्र लुकासीन रिबैर या गोवेकराने स्वतः लिहून सादर केलं.