शहर भक्तीमय : भजने, शास्त्रीय गायकांच्या बैठका, दर्शनासाठी रांगा
देव दामोदरपुढे श्रीफळ ठेवताना प्रशांत जोशी. (अक्षंदा राणे)
.....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : येथे १२६ व्या श्री देव दामोदर सप्ताहाला मोठ्या भक्तीभावामध्ये बुधवारी दुपारी आरंभ झाला. श्री देव दामोदर भजनी सप्ताह शिखर समितीचे अध्यक्ष व उद्योजक प्रशांत जोशी यांनी देव दामोदरपुढे श्रीफळ अर्पण केल्यावर २४ तासांच्या भजनी कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. भजने, शास्त्रीय गायकांच्या बैठका, दर्शनासाठी लागलेल्या रांगा यामुळे शहर भक्तीरसामध्ये न्हावून निघाले. सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सरकारी यंत्रणा लक्ष ठेवून होती. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी समितीतर्फे दक्षता घेण्यात आली होती.
मंदिरात भजन कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्थानिक गायक व भाविक. (अक्षंदा राणे)
देव दामोदरपुढे श्रीफळ अर्पण केल्यावर २४ तासांच्या भजनी कार्यक्रमाला आरंभ झाला. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, नगरसेविका श्रद्धा आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक दीपक नाईक, उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र गुरव, सरचिटणीस संतोष खोर्जुवेकर आदी उपस्थित होते.
यंदा मंदिरातील कार्यक्रमाला गर्दी न करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. काही प्रतिबंध घालण्यात आल्याने गर्दी टाळली गेली. मंदिराबाहेरील मंडपात पंख्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. खबरदारीची उपाययोजना म्हणून स्वातंत्र्य पथ व एफ. एल. गोम्स मार्गावर काही ठिकाणी ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यावरून निरनिराळ्या सूचना व माहिती देण्यात येत होती. एकंदर या व्यवस्थेबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.
सायंकाळपासून दैवज्ञ ब्राह्मण समाज, विश्वकर्मा ब्राह्मण समाज, फैलवाले समाज, गाडेकार समाज, नाभिक समाज, बाजारकर समाजातर्फे निरनिराळ्या ठिकाणी प्रसिद्ध गायकांच्या गायनांच्या बैठका झाल्या. या बैठकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
फेरी ५ ऑगस्टपर्यंत
दरम्यान, देव दामोदरपुढे ठेवण्यात आलेले श्रीफळ गुरुवारी सागराला अर्पण केल्यावर मंदिरात गोपालकाला होऊन भजनी सप्ताहाची समाप्ती होईल. सप्ताहानिमित्त थाटण्यात आलेली फेरी ५ ऑगस्टपर्यंत राहणार आहे.