सुदीप नाईक यांनी केली दुरुस्तीची मागणी
पणजी : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ वीच्या 'इतिहास व राज्यशास्त्र' पुस्तकातील चुकीची घटनात्मक माहिती देण्यात आली आहे. अस्तित्वात नसलेल्या तरतुदीबाबत चुकीची माहिती देण्यात आल्यामुळे ती चूक त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे माजी महासचिव आणि सध्या सहाय्यक प्राध्यापक सुदीप नाईक यांनी केली आहे.
इयत्ता ९ वीच्या 'भारतीय लोकशाहीचे स्तंभ' (Chapter 3: Political Science) या पाठात, लोकसभेतील उर्वरित दोन जागा अँग्लो-इंडियन समुदायातून राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. जर त्या समुदायाचे प्रतिनिधित्व लोकसभेत नसेल तर, अशी माहिती पृष्ठ क्रमांक ७७ वर दिलेली आहे.
दरम्यान नाईक यांनी याबाबत मंडळाच्या निदर्शनास आणून देत ही तरतूद आता अस्तित्वात नाही, १०४ वा घटना दुरुस्ती विधेयक २०१९, जी २५ जानेवारी २०२० पासून लागू झाली, त्याद्वारे लोकसभेतील अँग्लो-इंडियन नामनिर्देशित जागा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सदर माहिती ही घटनात्मकदृष्ट्या चूक आणि विद्यार्थ्यांना दिशाभूल करणारी आहे असे म्हटले आहे. इयत्ता ९ वीच्या नवीन पुस्तकांमध्ये वैदिक कालावधीसारख्या भारताच्या प्राचीन इतिहासावर आधारित धडे समाविष्ट केल्याबद्दल गोवा बोर्डचे नाईक यांनी अभिनंदन केले आहे पण घटनात्मक तथ्यांमध्ये अचूकता अत्यावश्यक आहे. चुकीची माहिती विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर आणि नागरिकशास्त्राच्या समजुतीवर परिणाम करू शकते असे म्हटले आहे.