समजूतदार बायको

Story: गजाल | गीता गरुड |
25th March 2023, 11:45 pm
समजूतदार बायको

प्रकाश व त्याचे मित्र एका खोलीत चारपाचजणं मिळून रहायचे. मुंबईत एवढ्याशा खुराड्याचीही भाडी अमाप. बायकोला, मुलाला मुंबईला घेऊन यायचं मनात होतं त्याच्या पण घरात म्हातारी आई, गुरंढोरं, शेतीचा व्याप हे सारं समोर दिसायचं नि तो आपला बिऱ्हाड मुंबईला घेऊन यायचा विचार परतवून लावायचा.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तो गुढीपाडव्याला गावी गेला होता. प्रकाशने मानग्याच्या काठीच्या टोकाला नवं कोरं केशरी कापड बांधलं. त्यावर बताशाची माळ, पांढऱ्या देवचाफ्याची माळ, आंब्याच्या पानांचा टाळ, कढीलिंब बांधून त्यावर आमसुलाने घासून लख्ख उजळवलेला गढू ठेवून त्याने गुढीची पूजा केली. म्हातारी लेकाचं करणं कौतुकाने बघत पायरीवर बसली होती. गुढीच्या पाटावर निरंजन, उदबत्तीचा दरवळ, गुळखोबऱ्याचा नैवेद्य, भोवताली काढलेली रांगोळी, आकाशाच्या रंगपटावर दिमाखात उभी ठाकलेली पिढ्यानपिढ्यांच्या नोंदी सांगणारी गुढी पहाताना नेहमी खोकत असणाऱ्या म्हातारीचा जीव कसा सुखात न्हात होता. सणाच्या दिवशी लेक घरी आल्याने ती आपलं दुखणंखुपणं विसरली होती. 

शिरवळ्या, नारळाच्या दुधाचा गुढीला नैवेद्य दाखवून मग लेकासोबत गप्पा मारत प्रकाश  मनसोक्त जेवला. संध्याकाळी कोपऱ्यांत लेकाच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळला.

रात्री म्हातारी म्हणाली, "परकासा, ह्यो सर्दीखोकलो जाना नाय रे."

"डाक्टरकडे जावया काय?"

"नुको तो डाक्दर. काय ती वषदा दिता तेना काडीचो गुन नाय."

"मग बरा कसा वाटतला आये तुका?"

"झिला, माका ना कुर्ले हाड रे. लय दिस झाले रसो खाऊक नाय कुर्लेचो. खाईनसारो वाटताहा."

"गो छाया, आयेक कुर्ले व्हये हुते तर हाडलेस नाय कित्या?"

"रे तिका कित्या करवादतस? तिच्या कारनान तर मिया जिता गमतय तुका. पैसे सोपलले तेकारनान हाडूक नाय तिना. तुया पाठवतस तेच्यात भागवता ती पन लोकांची लग्ना, तेंच्या पोरांची बारसीबिरशी इली, आजून कायमाय इला काय खर्च जास्तीचो व्हता. बायलेर रागेजू नये. तुझ्या वाटेहारी डोळे लावून आसता मा ती. माका बरा नाय तर माहेराकव जाव्क नाय. भाऊ न्हेऊक इललो तेका मामीक बरा वाटला काय येतय सांगान पाठवून दिल्यान"

प्रकाशचं लक्ष छायाकडे गेलं. ती मागिलदारी झाडांना पाणी घालत होती. 'सदीची कामात आसता नायतर हिची थोरली भैन मुंबयक दिली हा ती. तिचो घो मोठ्या पोस्टवर असा. भारी भारी साडये हाडून दिता तिका. माका मातर हिच्यासाठी काययेक करूक जमना नाय. भाऊ बेगिन वर गेले, तेकारनान शिकूची इच्छा असानसुदीक बारावीतना शाळा सोडूची लागली. नोकरीत काय राम असा पन धरला तर चावता नि सोडला तर पळता तेतुरली गत.'

प्रकाश स्वत:शीच बोलत होता.

रात्री प्रकाशने छायाला सांगितलं, "उद्या बाजारात जावया. तुका चार बरेशे साडये घी. मेचिंग ब्लाऊजपीस, परकर, सगळा काय ता घेवया."

"बाबांनू, माका रंगाचे बाटले हाडूक सांगल्यानी हत चित्रकलेच्या बाईंनी." झिल मधेच बोलला.

त्याच्या केसांतून आपल्या हाताची बोटं फिरवत प्रकाश म्हणाला, "हाडतय हा तुझ्यासाठी रंगाचे बाटल्ये. आता नीज बघू."

छायाने सकाळी लवकर उठून चुलीत आग घातली. बिडाचा तवा तापत ठेवला. दळलेल्या तांदळाच्या पीठात मीठ, पाणी घालून घावण्याचं पीठ तयार केलं नि घावणे काढले. केळीच्या पानातून कैरीची चटणी नि घावणे नवऱ्याला वाढले. सासूला चहासोबत दिले. वाड्यातलं आवरून बरीशी साडी नेसून ती प्रकाशसोबत बाजाराला निघाली.

संसाराला आवश्यक त्या त्या वस्तू छाया घेत होती. मोलभाव करून सगळ्या जिनसा तिने घेतल्या. प्रकाश पैसे द्यायचं काम करत होता. मासळीबाजारात जाऊन डझनभर खाडीच्या कुर्ल्या तिने आठवणीने घेतल्या. प्रकाशच्या लक्षात आलं, छायाने आपल्या स्वत:साठी काहीच खरेदी केलं नाही. तो तिला कोल्ड्रिंक पिऊया म्हणाला तर त्या पैशात घराकडे खारी, बटर घेऊन जाऊया म्हणाली.

प्रकाशनेच मग अबोलीचा लांबलचक वळेसर घेऊन तिला माळायला लावला. तो वळेसर माळताना तिरक्या नजरेने प्रकाशकडे बघत ती खुदकन हसली.

प्रकाशला छायासाठी दोन भारीतल्या म्हणजे किमान लग्नाकार्याला नेसता येतील अशा साड्या घ्यायच्या होत्या पण तेवढ्याच पैशात छायाने आपल्यासाठी दोन बऱ्यापैकी साड्या आणि सासूसाठी दोन छापील लुगडी, पोलक्यासाठी कापडं घेतली. मग  झिलाच्या मागणीनुसार रंगाच्या बाटल्या नि ब्रश घेतले. 

ती दोघं स्टँडवर आली तेव्हा गाडी निघून गेली होती. पुढच्या गाडीची वाट बघत तिथल्या बाकड्यावर दोघंजणं बसली. तिथे समोरच्या बाकड्यावर एक आधुनिक पेहरावातलं जोडपं बसलं होतं. "ती बगलस छाया, तुझ्या माटुंग्यातल्या भैनीसारी दिसता."

"व्हय ओ." छाया तिला निरखित म्हणाली.

"मिया मुंबयत खोली घितल्यार तुका नि बाबूक घेऊन गेलं आसतय मगे तूव अशीच मार्डन दिसलं आसतस ना."

"का ओ, अशी साडीतली मिया तुमका बरा दिसनय नाय."

"तसा नाय गो, पन मनात येयेकदा यता तुझा लगीन मोठ्या हाफिसरावांगडा झाला आसता तर.."

"ओगीच कायतरी मनात आणू नुको. तुमी काय कमी आसास काय हाफिसरापेक्षा! तायग्याचा लगीन झाला खरा हाफिसरावांगडा. लोकांका तिचे साडये, डागडागिने गमतत पन मुंबयत थय झिलाक भारी शाळेत घातल्यानी हा. तेची फी, परत त्यो अभ्यास शिकवूक येना नाय म्हनान झिलाक ट्युशन लावल्यानी तेची फी, शाळेच्या बसची फी, ट्युशनसाठी लावलल्या रिक्षेची फी. येवढा सगळा करून झिलाक मार्कव व्हये तसे पडनत नायत म्हनान नाराज आसता. तेपरीस गावातली शाळा बरी. आपलो झिल निसर्गाच्या शाळेत शिकता. शिष्यवृत्ती परीक्षेक बसवूक सांगल्यानी हा तेचे सरांनी. ट्युशन नाय नि फ्युशन नाय. आजयेची काळजी घिता. वाण्याकडसून सामान घेऊन येता, बरूबर हिशेब करता. ढोरावासरांवयनी माया करता. ही अशी जडणघडण थय होवची नाय. माजा आयकशात तर तुमीव हयसर नोकरी बघा."

"ग्रेज्युएशन तरी करुक व्हया होता. जमलाच नाय बघ." प्रकाश खाली मान घालत म्हणाला."

"शिकाक वयाची अट नसता. इच्छा असात तर शिकू शकतास."

प्रकाशने छायाच्या डोळ्यांत पाहिलं. ती जे बोलत होती ते पोटतिडकीने बोलत होती. प्रकाशच्या बाजूला बसलेले एक वयस्कर माणूस त्या दोघांचं बोलणं मघापासून ऐकत होते. प्रकाशच्या खांद्यावर थोपटत ते प्रकाशला म्हणाले, "झिला, खऱ्या अर्थान नशीबवान आसस तुया. नक्षत्रावानी बाईल गावली हा तुका. नायतर आमची सूनबाय. हयल्या मराठी शाळेत पोरग्याक नाय पाठवुचय अशा हट्टाक पेटली नि घोवाक मुंबयक बदली घेव्क लावल्यान. थयसर हेच्या भयनीची चललीहा तसलीच गत. हायफाय शाळा, ट्युशन, मॉम नि ड्याड. सगळी इंग्रजी संस्कृती. हय आमी म्हातारी खोडा नातवाच्या आठवनीन पिटी पिटी डोळ्यातसून दुखा काढतव. आमी शीक पडलव तर आमका पानी देव्क कोन नाय. बैल दोन होते तेव झेपत नाय म्हनान इकून टाकले. संसार करुचो कोनी, म्हाताऱ्या मानसांनी! चेडू आसा. ता दिलल्या घरचा. कवातरी सणाक दोन दिस रवाक येता."

 इतक्यात गाडी आली. त्या आजोबांचा निरोप घेऊन ही दोघं गाडीत बसली. ऊन चांगलंच लागत होतं. चामड्याची सीट गरम लागत होती. बाहेर ऊसाचा रस, बिस्कीट अशा फेरीवाल्यांच्या हाळी चालू होत्या. मधे उभ्या असलेल्या माणसांची रेटारेटी, कंडक्टरचा तिकीट तिकीट आवाज या सर्वात, प्रकाश असूनही नसल्यासारखा एकटक आपल्या छायाकडे पहात होता. समजूतदार बायको मिळाली म्हणून ईश्वराचे आभार मानत होता.

घरी आले तर बाबू नि आज्जी जेवायला बसली होती. "जेवूक बसलास ता बरा केलास वायच उशीर झालो आमका." छाया म्हणाली.

"व्हय तर ह्यो झिल तुझो थारो करता हा! आजये तुका जेवूक वाढतय. गोळये घेवचे आसत ना म्हनाक लागलो. मुंबरात सुकाटव भाजून कपो काढून दिल्यान बघ."

छायाने झिलाच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला. 

"आये, मीव हडे खय नोकरी गावता काय चवकशी करतय. बस झाली जीवाची मुंबय. आता आपल्या घरात रवतलय. बायकोक पदवीधर घो व्हयो झालो हा. आता पदवी मिळवूचेसाठी अभ्यास करूचा मनार घितय."

छायाकडे बघत हसतहसत प्रकाश म्हणाला. 

प्रकाश नि छायाचं छोटसं घर सुखासमाधानाने उजळून निघालं.समाप्त