' तुमच्यासाठी काय पन..! '

Story: वाचू आनंदे | अक्षता किनळेकर |
25th March 2023, 11:40 pm
' तुमच्यासाठी काय पन..! '

"कल्पना ही आविष्कारांची जननी आहे. कल्पना ही एक उत्तम शक्ती आहे. '' म्हणूनच तर आपण 'कल्पनाशक्ती' असा शब्द अनेक वेळा बोलताना, लिहिताना  वापरतो. या जगात वस्तूंचा आविष्कार व संपूर्ण जगाची प्रगती ही माणसांच्या कल्पनाशक्तीमुळे, बुद्धिमत्तेमुळेच साध्य झाली आहे. माणसाच्या या नवीन- नवीन कल्पना करण्याच्या शक्तीमुळे नशिबात नसलेल्या गोष्टींची कल्पना करून माणसांनी  अनेक स्वप्ने साकारली आहेत  आणि  नकारात्मक कल्पना करून, स्वतःला ' low vibration ' मध्ये ठेवून अपयशसुद्धा  माथी ओढून घेतले आहे.'' what you think you become " तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता किंवा तुम्ही जसा विचार कराल तसेच तुमच्यासोबत घडणार. या कल्पनाशक्तीने सर्व शक्य असते.

लेखनालासुद्धा कल्पनेची गरज भासते. लेखन देखील दोन प्रकारचे आढळते एक सत्य परिस्थितीवर आधारित व दुसरे काल्पनिक. आपल्या कल्पनेचा वापर करत लेखक श्री पांडुरंग शि. खांडेपारकर यांनी अशाच काल्पनिक तथा विलक्षण कथा लिहिल्या आहेत. श्री पांडुरंग शि. खांडेपारकर यांनी अनेक वृत्तपत्रात ललित लेखन केले आहे. 'अडुळशाची फुले ' व ' कोणे एके काळी ' हे ललित साहित्यास वाहिलेली त्यांची पुस्तके आहेत. 'अधिक मास '  हा कथासंग्रह देखील त्यांचा प्रकाशित झाला आहे.

' तुमच्यासाठी काय पन....' या त्यांच्या  कथाशिदोरीत एकूण दहा कथा आहेत. सर्व कथा या दीर्घ कथा आहेत. लेखक पांडुरंग शि. खांडेपारकर यांच्या  या पुस्तकातील कथा या राजामहाराज्यांच्या  काळात प्रवास करत - करत  स्वातंत्र्यपूर्वकाळात येवून  पोहचतात. त्यानंतर पुस्तकाच्या शेवटी सद्य काळात येवून थांबतात.... या सर्व कथांचे एक साम्य म्हणजे या सर्व कथा काल्पनिक आहेत. लेखक गोमंतकातील असल्यामुळे इथल्या परिस्थितींचा, लोकांचा प्रभाव त्यांच्या लेखनावर झालेला दिसून येतो. तुमच्यासाठी काय पन...' या कथासंग्रहात काही पात्रांची नावे ही ख्रिस्ती धर्मातील आहेत. काही कथांत पोर्तुगीज काळाचे वर्णन देखील आढळते.

या कथा संग्रहातील पहिली कथा म्हणजे ' माझं काय चुकलं ' ही एका राजकुमारीच्या दासीची कथा आहे. दासी आपल्या जिवापेक्षा राजकुमारीवर प्रेम करायची. राजकुमारीचे लग्न ज्यावेळेस ठरते त्यादिवशी राजकुमारीसोबत तिलाही राजकुमारीच्या सासुरवाडीत पाठवले जाते. राजकुमारीची काळजी व तिची रक्षा,  या गोष्टीचा हव्यासच दासीला लागतो. तिच्या आनंदासाठी  कोणत्याही थराला जाण्याची दासीची तयारी असते. राजकुमारीच्या ज्येष्ठ मुलालाच राज्य मिळावे अशी तिची इच्छा असते. ते राज्य दुसऱ्या राणीच्या मुलाला देण्याचा निर्णय होतो त्यावेळेस ती पेटून उठते. या सर्व गोंधळात राजाचा मृत्यू होतो. राजकुमारीच्या ज्येष्ठ मुलाला इच्छा नसूनही राजकुमारीच्या हट्टामुळे  ज्येष्ठ मुलाला राज्यकारभार दिला जातो. संपूर्ण राज्याची घडी विस्कटल्यामुळे दासीला दोष दिला जातो. लहानपणापासून केवळ राजकुमारीच्या सुखासाठीच विचार केल्यामुळे. या वेळेस सुद्धा राजकुमारीच्या प्रेमापोटीच  हे तिने सर्व केले होते.

मी माझ्या  राजकुमारीसाठी केले. 'माझं काय चुकलं 'असं म्हणत ती स्वतःच्या मनाला प्रश्न करते.

भावनेचा अतिरेक झाला की माणूस कोणत्याही थराला कसा जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक म्हणजे 'माझं काय चुकलं ' ही कथा.

' जॉर्जचा नवा सिद्धांत ' या कथेत, माणसांचे  एकाच घटनेकडे बघण्याचे दृष्टिकोन कसे वेगवेगळे असतात यावर लेखकाने दृष्टिक्षेप टाकला आहे.

' रेशीमगाठी ' ही एका महेश नावाच्या मुलाची प्रेमकथा आहे. या कथेत कधी कुणाला कोण भेटणार व कोण सोडून जाणार हे कसे नशीबच ठरवत असते. नशिबाला कुणीही फसवू शकत इत्यादी गोष्टींचे ज्ञान लेखक पात्रांद्वारे वाचकाला देऊन जातात.... महेश नावाचा व्यक्ती महाविद्यालयात असताना मीरा नावाच्या मुलीच्या प्रेमात असतो.... परंतु प्रेम कधी ओठांवर न आल्यामुळे त्या प्रेमाला तिथेच पूर्णविराम लागतो. त्यानंतर महेशला प्रतीक्षा नावाच्या मुलीचे स्थळ येते.... महेश मुलीपेक्षा कमी शिकल्यामुळे ती आपल्याला नकारच देणार असा विचार करून मागे वळतो. खूप वर्षांनी पुन्हा प्रतिक्षेशी महेशची भेट होते. महेश यावेळेस एका चांगल्या पदावर असतो प्रतीक्षा महेशच्या  व महेश प्रतीक्षाच्या, दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात. ज्यावेळेस ते लग्न करायचे ठरवतात त्यावेळेस प्रतिक्षाची नोकरीची बदली दुसऱ्या राज्यात होते. तिथेच तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरते. महेश आतून पिचून जातो... महेशने प्रतीक्षावरती खरे प्रेम केलेले असते... काही वर्षांनंतर महेश स्वतःला सांभाळतो अशा एक दिवशी पुन्हा एकदा महेशची भेट महेशच्या पहिल्या प्रेमाशी म्हणजेच मिराशी होते. व त्यांचे लग्न ही ठरते.

' रंकाचा राव ' या कथेत केवळ पंधरा वर्षाचा स्वातंत्र्य सैनिक पोर्तुगीजांच्या डोळ्यात धूळ झोकून मुंबईला पळून जातो. तिथे राहून शिक्षण प्राप्त करतो. मुंबईतील व्यापाऱ्याच्या मुलीवर त्याचे प्रेम जडते.. मुलगा तेवढा श्रीमंत नसल्यामुळे मुलीचे वडील मुलाला धमकावतात अशा वेळेस तो मुलगा परिश्रमाने व बुद्धीमुळे अवघ्या काही दिवसात मोठा व्यापारी होतो व मुलीच्या वडिलांचे मन जिंकतो. परिश्रमाने रंकाचा राव होतो.

या जगात अलौकिक ऊर्जा असते. काही विश्वास ठेवतात काही विश्वास ठेवत नाही. ज्या व्यक्तीला या अलौकिक शक्तीची प्रचिती येते त्या व्यक्तीला समाजातील माणसे कसे वेड्यात पाडतात... त्या व्यक्तीने आपला अनुभव पटवून देण्याचा कितीही जरी प्रयत्न केला तरीही माणसे त्याच्यावर कसा विश्वास ठेवायला तयार नसतात याचे चित्रमय शैलीत लेखकाने वर्णन केले आहे.

'तुमच्यासाठी काय पन' या कथेत माधवराव व विश्वासराव खूप जवळचे मित्र असतात. दोघेही शेजारी- शेजारी संसार थाटतात. विश्वासराव आपल्या घराच्या बाजूला एक झाड लावतो ते झाड मोठे होऊन त्याची सारी पाने माधवरावाच्या अंगणात पडू लागतात. माधवरावाच्या मोलकरणीला रोज झाडू मारावी लागते या कारणास्तव ती माधवरावाच्या बायकोचे कान भरून तिला ते झाड विश्वासरावांना सांगून कापायला लावते. या झाडामुळे जिवलग मित्रांची मैत्री तुटते. माधवराव व  विश्वासराव झाड कापण्यासाठी म्युनसिपाल्टीची मदत घेतात. परंतु वेळेवर म्युनसिपाल्टीची मदत न मिळाल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो, नुकसान होते.... याचे वर्णन या कथेत आढळते. म्युनसिपाल्टीचा एक सदस्य 'तुमच्यासाठी काय पन...' असे म्हणत नेहमी विश्वासरावाला धीर द्यायचा... शेवटी कसेबसे ते झाड विश्वासराव कसे कापून घेतो व भांडण थांबवतो हे सर्व वर्णन वाचताना वाचकांचे उत्तमरित्या मनोरंजन होऊन जाते.

साध्यासुध्या प्रसंगांद्वारे या कथा लेखकाने उभ्या केल्या आहेत. माणसांचे हेवेदावे, एकमेकांवरचे प्रेम, प्रेमाचा अतिरेक इत्यादी सर्व भावभावना लेखनाने सुंदरपणे हाताळल्या आहेत. प्रत्येक कथेला न्याय देण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. ओघवत्या भाषेत कथा असल्यामुळे या कथा लेखकाला आकर्षित करतात. श्री पांडुरंग शि. खांडेपारकर यांनी मराठी काल्पनिक कथा दालन आणखीन समृद्ध केले आहे. अद्वितीय शीर्षक, कथा विस्तार, रोचक वर्णन, अनोख्या कल्पना या सर्व गुणांमुळे वाचकाला हा कथासंग्रह आवडेलच.