ज्योतिर्वैद्यक (भाग -१)

ज्योतिषशास्त्राविषयी लोकमानसात उत्सुकता, जिज्ञासा, श्रद्धा, गैरसमज, विरोध, अज्ञान अशा संमिश्र भावना आहेत. प्राचीन काळी अनेक भारतीय शास्त्रांप्रमाणेच ज्योतिषशास्त्रसुद्धा प्रगत असे कालविधानशास्त्र होते.

Story: ग्रंथोपजीविये | वैद्य. रश्मिना आमोणकर |
25th March 2023, 11:38 pm
ज्योतिर्वैद्यक (भाग -१)

ग्रह, राशि, नक्षत्र या वरून कालगणना, पावसाचा अंदाज, रोग, शेतातील पीक, विषबाधा, गर्भधारणा, औषधनिर्माण, शुभ-अशुभ शकुन इत्यादि अनेक विषयांचे ज्ञान होऊ शकते. पाराशर संहिता, वराहमिहिरकृत् बृहत् संहिता अशा प्राचीन संहितांचा व आताच्या काळातील ज्योतिषविषयक ग्रंथांचे अध्ययन केल्यास ज्योतिषशास्त्र हे भविष्यकथनापुरतेच मर्यादित नसून आरोग्य प्राप्ती व रोगचिकित्सा या साठी देखील फार उपयुक्त शास्त्र आहे असे दिसून येते. पूर्वी वैद्यांना ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असायचे व त्याचा रोगचिकित्सेत उपयोग देखील करायचे. अशा वैद्यांना ज्योतिर्वैद्य म्हणत असत.

शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष ही वेदाची सहा अंगे आहेत. त्यांना वेदांग असे म्हणतात. त्यापैकी ज्योतिष हे वेदपुरुषाचे नेत्र मानले आहेत. ज्योतिष शास्त्रावरूनच काळाचे ज्ञान होते व उचितकाळी उचित कर्म करता येते म्हणून वेदोक्त कर्मे करण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे.

आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो. काही ऋषींच्या मते हा ऋग्वेदाचा उपवेद किंवा पाचवा वेद मानला जातो. म्हणूनच आयुर्वेदातील  रोग, औषध, चिकित्सा यांच्या सखोल ज्ञानासाठी ज्योतिषशास्त्र हे पूरक शास्त्र ठरते.

आपल्या हातून घडलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मावरून पुण्य किंवा पापाचा विचार होतो. कर्मविपाक म्हणजे आपण केलेल्या कर्माचा परिणाम. वाईट कृत्ये, पापकर्मे केल्यास शरीराला रोग भोगावे लागतात. पूर्वजन्मकृत् कर्मफलांना दैव असे म्हणतात. दैवाचा विचार मानवाच्या जन्मकुंडलीवरून करता येतो, तसेच मानवाच्या कुंडलीतील ग्रह व नक्षत्र यांच्या स्थितीवरून रोग साध्य आहे कि असाध्य याचा देखील निर्णय होऊ शकतो.

चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदय, अष्टांगसंग्रह व अन्य अनेक आयुर्वेदीय ग्रंथामध्ये ग्रह, नक्षत्र, राशि, दैव, पाप यांचा उल्लेख आलेला आहे. बृहत् निघण्टु रत्नाकर, वैद्यचिंतामणि अशा ग्रंथामध्ये तर कर्मविपाक व रोग यांचा संबंध प्रस्थापित केलेला आहे.

ग्रहेष्वनुगुणेष्वेक दोषमार्गो नवः सुख: । (अभ्यंगहृदयम्)

सूर्य आदि ग्रह अनुकूल असणे, अनुकूल राशीत असणे, कुंडलीत अनुकूल स्थानात असणे हे रोगाला सुखसाध्य (लवकर बरे होणारे) ठरवतात. या उलट प्रतिकूल ग्रहांमुळे रोग असाध्य होतात. तसेच अरिष्टलक्षणे उत्पन्न झाल्यास रोग असाध्य होतो. अरिष्ट लक्षणांचे ज्ञान सामुद्रिक शास्त्र व ज्योतिषशास्त्रावरून होऊ शकते.

मानवाच्या जन्म तारीख, जन्मवेळ व जन्मस्थानावरून जन्मकुंडलीची मांडणी केली जाते. कुंडलीत बारा स्थाने असतात. प्रत्येक स्थान व राशींवरून कालपुरुषाचे अवयव दर्शविलेले आहेत. 

पहिल्या स्थानावरून शरीराची प्रकृति व डोके, चेहऱ्याची ठेवण याचा विचार होतो. दुसऱ्या स्थानावरून डोळे व वाणी यांचा बोध होतो. तिसऱ्या स्थानावरून कानाचे रोग,  स्वरभेदसारख्या आवाजाशी संबंधीत रोगांचा विचार होतो. आयुर्वेदातील शालाक्यतंत्र या शाखेतील म्हणजे कान-नाक-घसा यासंबंधी रोगांचा विचार करताना प्रथम तीन स्थाने महत्त्वाची आहेत.

चौथ्या स्थानावरून स्तन, छाती, फुप्फुस या अवयवांचा विचार होतो. बांळतिणीला दूध पुरेसे येणार कि नाही किंवा स्तनरोग व स्तन्याचा विचार चतुर्थस्थानावरून करावा. पंचमस्थानावरून पोट व हृदयविकार पाहतात. तसेच पूर्वजन्माच्या कर्मामुळे काही रोग झाला असेल तर त्याचा विचार देखील पंचमस्थानावरून पाहण्याचा प्रघात आहे. सहावे, आठवे व बारावे स्थान रोगांविषयी विचार करताना प्रामुख्याने पाहिले जाते कारण ही स्थाने अशुभ मानली आहेत. व्यसन, मृत्यु, रोग, विषबाधा, अपघात, जखम, रक्तस्राव अशा अशुभ गोष्टींचा विचार या स्थानांवरून केला जातो.

षष्ठ स्थानावरून पोट व कंबरेचे आजार तसेच व्यसन पाहतात. 

रोगाः सर्वे ऽपि मन्देऽग्नौ सुतरामुदराणि तु । (अष्टांगहृदयम्).

सर्व रोग हे जाठराग्नि म्हणजेच पचनशक्ती नीट नसल्यामुळे होतात. 'उदररोग’ म्हणजेच पोटात पाणी साचणे हा गंभीर स्वरूपाचा आजार होण्यामागे दारूचे व्यसन हे देखील कारण आहे. 

सातव्या स्थानांवरून गर्भाशय व वृक्क, वृक्करोग म्हणजे अश्मरी (मूतखडा), PCOD, Cyst, Fibroid, Chocolate cyst इ. स्त्रियांचे आजार, कंबरदुखी इत्यादी रोगांचा विचार करतात.

आठव्या स्थानावरून मूळव्याध, भगन्दरसारखे गुदस्थानाचे रोग व गुप्तरोगांचा विचार होतो. गर्भाशय व वृषण संबंधी रोग काही ज्योतिषी अष्टम स्थानावरून पाहतात. तसेच AIDs, Cancer, इत्यादि दीर्घकाळ टिकणारे आजार, मृत्युनंतर होणारे शवविच्छेदन,मृत्युचे कारण, मृत्युच्या वेळेची स्थिती याविषयीचे ज्ञान या स्थानावरून होते. माणसाच्या आयुर्मर्यादेचे ज्ञानदेखील यावरून केले जाऊ शकते. 

नवव्या स्थानावरून मांडयाचा विचार होतो. उरुस्तंभासारख्या आयुर्वेदात वर्णन केलेल्या रोगाचा विचार नवव्या स्थानावरून करावा. दशमस्थानावरून गुडघे बघतात. आमवात, संधिवात, क्रोष्टुकशीर्ष असे गुडघ्यांना त्रासदायक रोग दशम स्थानावरून अभ्यासले जाऊ शकतात. 

अकराव्या स्थानावरून पोटऱ्यांचा विचार करतात. तसेच पंचमस्थानाच्या समोरासमोर असल्याने एकादश स्थानावरून पचनक्रियेचा देखील विचार होतो. बाराव्या स्थानावरून पावलांचा विचार करतात. खूप दिवस बऱ्या न होणाऱ्या पायाच्या भेगा (पाददारी), पार्ष्णिशूल (Calcaneal spur म्हणजेच पायाच्या खोटा दुखणे) यासारख्या पावलांच्या रोगाचे निदान या बाराव्या स्थानावरून होते.

कालपुरुषाचे राशीदर्शित अवयव खालीलप्रमाणे आहेत.

 मेष-डोके, वृषभ-तोंड, मिथुन-छाती, कर्क-हृदय, सिंह-कुक्षि/पोट, कन्या-कंबर, तूळ-बस्ति (मूत्राशय), वृश्चिक-गुप्तेन्द्रिय, धनु- मांडया, मकर-गुडघे, कुंभ- पोटऱ्या, मीन-पावले.

बारा स्थानात कुठली राशी व कुठला ग्रह कुठे पडला आहे त्यावरून रोगांचे अचूक ज्ञान होऊ शकते. ज्योतिषशास्त्र हा फार विस्तृत विषय आहे. ग्रहांची रत्ने व धातू, नक्षत्रांवरून रोगनिदान, नक्षत्रवृक्षांचा चिकित्सेत उपयोग, पंचकर्म करण्यासाठी उत्तम मुहूर्त याविषयी पुढील लेखात  माहिती दिली जाईल.