देशप्रेमी भारतीयांचं तीर्थक्षेत्र : सेल्युलर जेल

शेवटपर्यंत ज्यांनी आपल्या मातृभूमीशी निष्ठा दाखवली त्यांच्या या बलिदानाचा मान ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निदान एकदा तरी अंदमानचा दौरा करावा.

Story: प्रवास | भक्ती सरदेसाई |
25th March 2023, 11:37 pm
देशप्रेमी भारतीयांचं तीर्थक्षेत्र : सेल्युलर जेल

सेल्युलर जेल… इथे आमच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचं काळीज ठेवून लढलेल्या वीरांना रक्त आटेपर्यंत कष्ट झेलावे लागले. किती जणांनी यात आपला जीव गमावला. जे जगले त्यांच्या वाट्याला मरणाहूनही वाईट नशीबी आलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. शेवटपर्यंत ज्यांनी आपल्या मातृभूमीशी निष्ठा दाखवली त्यांच्या या बलिदानाचा मान ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निदान एकदा तरी अंदमानचा दौरा करावा. ‘काल’ पाणी पहावं. स्वातंत्र्य वीरांना आदरांजलीच असेल ही. ज्यांची दखल आपली राजकारणी सरकार घेऊ शकलं नाही, अशा या महात्म्यांना, हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी. 

सेल्युलर जेलमध्ये पाय टाकताच मन उदास झालं. एक क्षण असाही विचार मनात आला की परतावं इथूनच. कारण ऐकिवात होतंच की कल्पनाही न करता यावी इतका अमानुष व्यवहार इथल्या कैद्यांवर केला होता. त्या ऐकलेल्या गोष्टींना आज चेहरा मिळणार होता. पण इथवर येऊन परतणं चुकीचं वाटत होतं. मग पावलापाठी पाऊल टाकत स्वतःला पुढे नेत राहिले.

गेट मधून आत गेल्या गेल्या सेल्युलर जेल ही त्रिकोणी आकाराची आहे असा भास होतो. पण खरंतर मध्ये एक गोलाकार इमारत नि त्याला मध्यबिंदू मानून उभ्या अनेक इमारती (म्हणजे वरून पाहिलं तर एखाद्या लहान मुलाने काढलेल्या सूर्यासारखी) अशी हिची रचना. त्यामुळे दोन विंगांमधली जागा ही त्रिकोणी वाटते. 

चालत चालत मध्यवर्ती इमारतीकडे जात असताना उजवीकडे पाहिलं तर एका मोठ्या चक्राला बांधलेला पुतळा दिसला. आजूबाजूला सुद्धा पुतळे होते. बैलाला घाण्याला जुंपावं तसं या मानवी पुतळ्यांना बांधलं गेलं होतं. तेल काढण्याची कृती दाखवणारं एक दृश्य तयार केलं होतं. बाजूच्या पुतळ्यांच्या पाठीवर चाबुकाने मारणारा फिरंगी सैनिक इतक्या वर्षांनंतरही, या दुष्कृत्यावर प्रकाश पाडत होता. माझं मन कळवळलं, पण ही तर फक्त सुरुवात होती. 

जसं जेलच्या जवळ पोहोचले तसं माझं मन अजूनही अस्वस्थ झालं. आपण सावरकरांची खोली पाहायला आत जातोय हे या मनाला माहीत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर. विनायक दामोदर सावरकर. देशभक्त, क्रांतिकारक, साहित्यिक, वक्ता, कवी, नाटककार, इतिहासकार, तत्वनिष्ठ राजकारणी, आणि समाजसुधारक. एक असं व्यक्तिमत्व जे पुन्हा होणे नाही. सावरकरांचं नाव घेतलं की, त्यांची त्रिखंडात गाजलेली समुद्रातील उडी आठवते. आणि त्याच समुद्राला “सागरा, प्राण तळमळला” म्हणून कळकळीने रचवलेलं गीतही आठवतं. त्यांनी रचलेल्या ‘जयोस्तुते’चा अर्थही कळण्यापूर्वीपासून आम्ही ते शाळेत ‘असेंबली’ला मोठ्यामोठ्याने गात आलो आहोत. अशा थोर माणसाला जिथे दोन जन्मठेपा झाल्या, जिथे कारावास भोगावा लागला, अशा खोलीत आता आपण जाणार. जिथे त्यांनी कितीशीच वर्षं ब्रिटिशांच्या जुल्मांना दुजोरा न देत, अभिमानाने घालवली, अशा खोलीत. जिथे त्यांनी आपलं तारूण्य भूमातेला अर्पण केलं, अशा खोलीत. जिथे कमलाकाव्याने जन्म घेतला, अशा खोलीत. या विचारांनीच मन भरून आलं.

‘कमला काव्य’ हे सावरकररचित खंडकाव्य. अत्यंत नाट्यमय घटनायुक्त असलेल्या या काव्याच्या रचनेचा इतिहासही तितकाच नाट्यमय आहे म्हणे. सावरकरांची साहित्याची आवड लक्षात घेऊन, त्या वेळेच्या वॉर्डनने त्यांना वही, पुस्तक, ‘पेन’ इत्यादी न देण्याचा हुकुम सोडला होता. त्या वॉर्डनच्या नाकावर टिच्चून सावरकरांनी या कारागृहाच्या भिंतीवर कोरून या काव्याच्या काही ओळी रचल्या. दुसऱ्या दिवशी आपली फटफाजिती झालेली पाहून वॉर्डनने ती भिंत आपल्या शिपायांकडून साफ करून घेतली. परत पूर्ववत झालेली भिंत पाहून सावरकरांनी दुसरं कडवं लिहिलं. परत वॉर्डनने ते पुसून काढलं. असा त्यांचा दर दिवशीचा खेळ सुरू झाला. वॉर्डनच्या दुष्ट प्रवृत्तीमुळे सावरकरां हस्ते दर दिवशी एक कडवं लिहिलं जाई. पाहता पाहता ८८० चरण लिहून झाले. आणि कुशाग्र बुद्धी लाभलेल्या सावरकरांनी लिहिलेला दर एक चरण पाठ केला असल्याने कमला काव्य अमर झालं. पुढे सुटका झाल्यावर त्यांनी हे नीट लिहून काढलं. आणि एक अनोखा विक्रम केला. 

क्रमशः