दुरीगोत्सव

पूर्वीच्याकाळी आजच्यासारख्या बक्षीसपात्र स्पर्धा नसल्या तरी धार्मिक कार्याच्या वेळी चढाओढी असत. खरोखरच पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या या उत्सवांचे आयोजन म्हणजे केवळ विरंगुळा नसून जीवन जगत असताना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी लागलेली चुरस असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

Story: लोकसंस्कृती | पिरोज नाईक |
25th March 2023, 11:24 pm
दुरीगोत्सव

हिंदू संस्कृतीमध्ये जे सण-उत्सव साजरे केले जातात. त्या पुष्कळ सण उत्सवामध्ये स्पर्धात्मक चुरस अनुभवायला मिळते. आजच्या युगाला तर स्पर्धात्मक युग असे म्हणतात. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चढाओढ पहावयास मिळते. पूर्वी राजे - महाराजे स्वयंवराच्यावेळी पण लावत. जो कोणी जिंकेल त्याच्या गळ्यात माळ पडत असे. स्पर्धा चुरस ही खेळीमेळीच्या वातावरणात स्वत:ची प्रगती करून घेण्याची गुरूकिल्ली आहे. चढाओढ म्हटली की त्यात सराव हा आलाच स्पर्धेत अपयश आले तरी केलेला सराव फुकट न जाता प्राविण्य आत्मसात करून घेता येते. पूर्वीच्याकाळी आजच्यासारख्या बक्षीसपात्र स्पर्धा नसल्या तरी धार्मिक कार्याच्या वेळी चढाओढी असत. खरोखरच पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या या उत्सवांचे आयोजन म्हणजे केवळ विरंगुळा नसून जीवन जगत असताना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी लागलेली चुरस असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

प्राचीन काळात आजच्या सारखी यंत्र-सामुग्री नव्हती. माणूस हा स्वत:च एक यंत्र होता. आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर तो यंत्रासारखा राबत होता. मोठमोठी झाडे तोडणे, तोडलेले विशाल वृक्ष वाहून नेणे, दगड फोडणे, दगड उचलणे, खड्डे खणणे ही सारी कामे तो शक्तीने नव्हे तर युक्तीने करायचा. म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. प्रत्येकाचा व्यवसाय वेगवेगळा असतो. परंतु वेळ प्रसंगी त्याला सुद्धा ही कला अवगत असावी म्हणून उत्सवाच्यावेळी असे कार्यक्रम आयोजित केले जात. देवावरील श्रद्धेमुळे या धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन प्रत्येक माणूस माैजमजा करून आनंद लुटत व कार्यक्रमाची रंगत वाढवित असे. शिगावमध्ये साजरा केला जाणारा ‘दुरीगोत्सव’ हा सुद्धा अशाच एक चुरस लावणारा व सांघिक शक्तीच्या काैशल्याचे प्रदर्शन करणारा व इतरांनाही काैशल्याचे धडे देणारा धार्मिक उत्सव.

खनिज संपत्तीने व्यापलेला शिगाव-कुळे हा वैभव संपन्न गाव सांगे तालुक्यात आहे. झाडाझुडपांनी व लतावेलींनी वेढलेला, जंगल संपत्तीने युक्त असलेल्या या गावातील कष्टकरी समाज वर्षभरातील ताणतणाव विसरून दैनंदिन जीवनात थोडी कायापालट म्हणून वर्षाच्या शेवटी शिमगोत्सवासारख्या पारंपरिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन स्वत:ची संस्कृती वैभव संपन्न करण्यासाठी आपल्या रूढी परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करतो.

शिगावात ‘श्री रंगाई शांतादुर्गा देवी’ चे विलोभनीय मंदिर पहावयास मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात शिमगोत्सवाच्या वेळी दोन मूर्ती पहावयास मिळतात. त्यातील एक मूर्ती पूर्वजांनी नार्वेहून चोरून आणली ती कोणीही नेऊ नये म्हणून उत्सवानंतर पेटीत बंद करून ठेवतात असे सांगण्यात येते. मंदिर परिसरात श्री गणेश, श्री कवडेबाल श्री राखणदेव, श्री मन्यादेव, श्री सिमेदेव, श्री सटीची खुट्येमाया, श्री जल्मीदेव, श्री कुड्ड्याआजी, श्री सिद्धदेव, श्री मारूतीराय, जळींचो देव, श्री तीर्थापंटो, श्री केळाय देवी, श्री सातेरी,  श्री माळाय, शिरा सड्यादेव, वाघ्रो, पांडव, मांडागुरु, सटीदेवी, पूर्वा देव अशा एकवीस देवांची पाषाणे व नागमूर्ती एकाच ठिकाणी पहावयास मिळते. येथे होळी पाैर्णिमेनंतर ‘दुरीगोत्सव’ साजरा करतात. दुरीगोत्सवाच्या आदल्या दिवशी देवीचा कळसोत्सव असतो या दिवसापासून गडे सोवळे पाळतात. सात्विक आहार घेतात. दुरीगोत्सवाच्या दिवशी गड्यांचा उपवास असतो. या दिवशी गावातील भाविक एकत्र जमून रानात जातात. रानातून एक भला मोठा सावरीचा वृक्ष तोडून आणतात. फक्त तोडण्याचेच काम करीत नसून वर्षात १०० शंभर नवीन रोपांची लागवड करतात. हा जवळजवळ दोन फूट व्यासाचा मिठीत न मावणारा बारा ते १५ मीटर उंच असलेला वृक्ष मंदिराकडे आणून स्वच्छ करतात त्याची साल काढून गुळगुळीत करतात. त्याच्या वरच्या टोकाला तीन ‘केकली’ ठेवतात. या एका केकल्याच गोडवेलीचे आसन करून ठेवतात हि गोडवेल टणक असते. ती सहजासहजी तुटत नाही वृक्षाचा वरच्या टोकाला गुढी बांधतात. या गुढीच्या टोकाला असलेल्या गोंड्यावर सूर्य व चंद्र यांचे प्रतीक आहे ही गुढी शिगाव भाविकांना फोंड्यातील साैंदेकर राजघराण्याने दिली असल्याचे सांगण्यात येते. त्याच्याखाली अबोली फुलांचा हार व नारळ बांधतात. हा देवाचा प्रसाद मिळवण्यासाठी गड्यांची चुरस लागलेली असते.

उत्सवाच्या रात्री शांत आल्हाददायी वातावरणात तास - दोन तास खपून हा सजवलेला वृक्ष मंदिर परीसरातील पारंपरिक जागेवर मोठ्या शिताफीने उभा करतात. कोणत्याही यंत्राचा वापर न करता एवढा विशाल वृक्ष उभा करण्यामागे येथील प्रत्येक व्यक्तीचे कसब दडलेले पहावयास मिळते. उभ्या केलेल्या वृक्षाची पूजा आरती झाल्यावर गाऱ्हाणे घालून नारळ वाढवितो. व दुरीगोत्सवाला सुरुवात होते. एक व्यक्ती दोरीच्या सहाय्याने वर चढून फांद्याच्या बेचक्यात बसते. भरलेली पाण्याची कळशी वर घेते. व त्या सावरीच्या वृक्षावर सर्व बाजूंनी पाणी ओतते. पाणी पडल्यामुळे मुळातच बुळबुळीत असलेले सावरीचे खोड अधिकच निसरडे होते. खाली वृक्षाच्या बुंध्याजवळ असलेल्या गड्यांना वर असलेला देवाचा काैल मिळवायचा असतो. त्यासाठी तो जिकरीचे प्रयत्न करतो आपले कसब पणाला लावतो. कवेत न मावणाऱ्या निसरड्या वृक्षावर चढताना खरचटतो, खाली पडतो. पण दैवी कृपेने त्याला काहीच इजा होत नाही. एकमेकांच्या खांद्यावर, पाठीवर राहून जिद्दीने वर चढण्याचा प्रयत्न करतो. काैल आपल्यालाच मिळावा यासाठी चढाओढ लागते. जिद्दिने वर चढणाऱ्याचे पाय ओढून त्याला खाली आणला जातो. रस्सीखेच चालूच असते. प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यातील एक गडा जिद्दीने वर जातो व काैल घेऊनच खाली येतो. जमलेल्या भाविकांकडून  टाळ्यांच्या कडकडाटातून त्याचे अभिनंदन होते.

‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणतात तेच खरे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे म्हणतात. यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रयत्नांची - जिद्दीची गरज असते. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्ग नियमांचे पालन करून एकजुटीने केलेल्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून साजरा केला जाणारा हा पारंपरिक दुरीगोत्सव जिद्दीने पुढे चला, यश तुमच्या पदरात नक्कीच आहे हा संदेश देऊन जातो.