नारळाच्या करवंटीपासून साकारले कलाविश्व .. सोनाली शेटगावकर यांनी ....

नारळाच्या करवंटीपासून सुबक शोभेच्या आणि रोजच्या वापरातील वस्तू तयार करणारे हस्तकला कलाकार आता नाममात्र असले तरी काही कलाकार मात्र आपली ही कला प्राणपणाने जपताना, त्यात समरसून काम करताना दिसतात. सोनाली या त्यांच्यापैकी एक हस्तकला कलाकार आहेत.

Story: तू चाल पुढं | कविता प्रणीत आमोणकर |
25th March 2023, 12:24 am
नारळाच्या करवंटीपासून साकारले कलाविश्व .. सोनाली शेटगावकर यांनी ....

गाेवा म्हटले की नजरेसमोर नारळांची झाडे आपसूकच येतात. गोमंतकीयांच्या रोजच्या जेवणात नारळाला अढळ असे स्थान आहे. नारळ फोडल्यावर त्याच्या आतले  पांढरे शुभ्र खोबरे जेवणात वापरले की उरलेली करवंटी सर्वसाधारणपणे फेकून दिली जाते. किंवा काही ठिकाणी तिचा उपयोग जळणासाठी केला जातो. एकदा का नारळातील खोबरे वापरले, की मग त्या करवंटीला काही मोल उरत नाही.

या निकामी ठरलेल्या करवंटीपासून विविध शोभेच्या वस्तू बनवण्याची कला ही अवघ्या काही कलाकारांच्या अंगी आहे आणि हे असे कलाकार गोव्यात क्वचितच पाहावयास मिळतात. हे असे कलाकार हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच असतील. गोव्यात दर दिवशी जेवणात नारळाचा वापर हा हमखास असल्यामुळे रोज अशा  शेकडो करवंट्या कचर्‍यात फेकल्या जात असतील किंवा जळण म्हणून जळताना त्यांची राख होत असेल. ही काहीच मोल नसलेली, साधी सुधी करवंटी प्रत्येक जण नेहमीच पहातो. आणि नकळत तिच्याकडे दुर्लक्ष ही करतो.

परंतु जेव्हा ही काहीच मोल नसलेली ओबडधोबड अशी करवंटी जेव्हा सोनाली शेटगांवकर यांच्या हातात पडते, तेव्हा त्या निकामी अशा करवंटीचे रूपांतर एका छानशा सुंदर वस्तूत होऊन जाते आणि त्याच निकामी ठरलेल्या करवंटीचे मोल अधिक होऊन जाते. आणि एरव्ही कचर्‍यात फेकली जाणारी, किंवा जळण म्हणून वापरली जाणारी ही करवंटी शोभेची वस्तू बनून एका छानशा ठिकाणी विराजमान होते.

चोपडेच्या पुढे मोरजे येथे राहणार्‍या सोनाली शेटगावकर या साध्या करवंटीपासून आकर्षक वस्तू बनविण्यात तरबेज आहेत. साध्या निकामी ठरलेल्या करवंटीपासून त्या पेन स्टँड, टेबल लॅम्प, हँगिंग लॅम्प, मोबाइल स्टँड, पेपर स्टँड, फ्लॉवर पॉट, मेणबत्ती स्टँड इतकेच नव्हे तर अनेक प्रकारच्या शोभेच्या वस्तू अतिशय कलात्मकरीतीने बनवतात. एका साध्याशा करवंटीला त्यांनी आपल्या हातात घेतले, की त्या करवंटीला सुरेख आकार देऊन काहीतरी वेगळी अशी कलाकृती बनवण्याचे कसब सोनाली यांच्या अंगी वसले आहे.

गेली २५ वर्षे सोनाली हा व्यवसाय करत आहेत. त्यांना या कामात त्यांच्या दोन मुली श्वेता आणि संतोषी तसेच त्यांचे पती सोनू हे ही उत्साहाने सामील होऊन मदतीचा हात देतात . दोन्ही मुली या उच्च शिक्षित असून त्या भरतनाट्यम नृत्यातही पारंगत आहेत. तरीही आपल्या आईला त्या उत्साहाने मदतीचा हात देतात, हे खरंच कौतुकास्पद आहे.

सोनाली यांनी आपल्या घराच्या पुढेच आपले दुकान थाटले आहे, तिथे त्या या नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या सर्व वस्तू विक्रीसाठी ठेवतात. या वस्तू बनवण्यासाठी लागणार्‍या  करवंट्यांना सर्वप्रथम घासून गुळगुळीत करून घेतात. नंतर त्यांना आपल्या कल्पकतेची जोड देताना त्याला मनपसंत आकार देतात. त्यानंतर  मनाप्रमाणे वस्तू तयार झाली की त्याला पॉलिश किंवा वॉर्निश लावले, की सुंदर असा आकार प्राप्त केलेली ती वस्तू अधिकच शोभिवंत होऊन जाते. सोनाली यांनी करवंटीपासून बनवलेले कासव, बगळा,  बदक, करकोचा, घुबड आदी विविध पक्षी, पाणी भरण्याची सुरई, जहाज या वस्तू इतक्या सुंदर आणि आकर्षक आहेत की, त्या  पाहताना त्यांच्या कल्पकतेची आणि कलात्मकतेची पुरेपूर खात्री पटते.

सोनाली यांनी बनवलेल्या शोभेच्या वस्तूं पैकी पेन स्टँड, मेणबत्ती स्टँड, टेबल लॅम्प, हंगिन लॅम्प या वस्तूंना जास्त मागणी आहे. सोनाली यांनी गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेर ही अनेक ठिकाणी आपल्या या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले आहे. मुंबई, भोपाळ, दिल्ली, गुजरात आदी ठिकाणी भारावलेल्या प्रदर्शनात त्यांना उत्तम प्रतिसाद लाभला. तेथील काही ग्राहक त्यांना आपल्या आवडीनुसार काही वस्तू बनवून देण्याच्या ऑर्डर ही देतात.

नारळाच्या करवंटीपासून सुबक शोभेच्या आणि रोजच्या वापरातील वस्तू तयार करणारे हस्तकला कलाकार आता नाममात्र असले तरी काही कलाकार मात्र आपली ही कला प्राणपणाने जपताना, त्यात समरसून काम करताना दिसतात. सोनाली या त्यांच्यापैकी एक हस्तकला कलाकार आहेत.  त्यांच्या कलेचे मोल हे इतरांना नगण्य असले तरी त्यांच्या दृष्टीने ही कला अनमोल आहे. टाकावूतून टिकाऊ बनवण्याचे कसब त्यांच्या हाती असल्याने त्या निसर्गाच्या प्रती आपले देणे या कलेच्या रूपाने देताना आपल्याला दिसतात .