एक अधुरी कहाणी…

…..त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता काळजावर जीवघेणा ओरखडा उमटविणारा तो फोन आला आणि माझ्या वर्तमानाला कुरतडवून टाकणाऱ्या वेदनेची थंड लहर नसानसात भिनून गेली.. तोंडात शब्द नव्हते… डोळे सताड उघडे… जगण्याची ती तडफड… आणि व्यक्त ही न होणारा आकांत… माझं मन आक्रंदत होतं… देवा संपव एकदाची तडफड… कर मोकळे आत्म्याला….नाहीतर मग उठवून तरी बसव… नव्याने आयुष्य जगण्याला…

Story: स्मृती | पौर्णिमा केरकर |
24th March 2023, 11:55 pm
एक अधुरी कहाणी…

तुम्ही दोघेही भरल्या संसारातून उठून जाण्याच्या आदल्याच दिवशी आपण सगळेच भेटलो होतो... कधी नव्हे ते तुमच्या घरी एकत्रित जमलो होतो...त्यासाठी आई निमित्तमात्र होती. नियतीनेच आमची अशी भेट ठरवली होती का? की तो भेटण्याचा निव्वळ योगायोग होता? हे कोडं मला अजूनही उलगडत नाही. तुम्ही भरल्या संसारातून न बोलता. न सांगता उठून गेलात. जिवंतपणी कधीच कोणाला न दुखविणारे आता तर आम्हाला चिरवेदना दिलीत. त्या रक्तबंबाळ आठवणी देह-मनाची चिरफाड करून टाकतात… नको वाटतात आठवणी… नको वाटतात ते क्रूर क्षण, ज्या क्षणांनी तुम्हाला आमच्यापासून तोडलं.

त्यांना गाडून टाकता आले असते तर तेही केलं असतं. नुसती छळवणूक मांडली!!! खूप काही तरी खोल आणि उत्कट राहिलं असणार तुझ्या जगण्यात. बरीचशी स्वप्ने असतील जोडीनं बघितलेली. चिवटपणे जगत होतीस. भीती, निराशा, अस्वस्थता, सततची अनामिक काळजी, आनंदाच्या प्रत्येक क्षणीची खंत तुझ्या जगण्याला कायमच वेढून राहिली होती. भावोजींच्या रूपाने एक आश्वासक सहजीवन होतं. तुझा खंबीर आधार होते ते… तरीही असुरक्षितता तुझ्या नजरेतून जाणवायची. 

पणजीला जाताना माझा मधला दुपारचा मुक्काम तुझ्याकडे असायचा… मी येणार हे कळताक्षणीच तुझ्या जीवाची घालमेल सुरू व्हायची. बसस्टॉपवरून माझी ने आण करण्याची जबाबदारी तू परस्पर भावोजीवर सोपवायचीस… मी कितीही विरोध केला तरीही ऐकत नासायचीच. आमचा दोघींचाही जन्म एका मागोमागचा… सुखदुःखाची वीण ही तशीच. माझ्यापेक्षाही तुझी वाचनाची आवड दांडगी. दादांनी दुकानातून आणलेल्या वाण सामानाच्या पुड्या सोडून ते पेपर तू वाचत बसायचीस. लिहायचीस… तशीच भावनिक जगायचीस.

तुझ्या जगण्याचा भावनिक अनव्यार्थ तेव्हा कधी लावता आला नाही. प्रत्येकालाच त्याच्या आवडीचे करून खाऊ घालणे हा जणू तुझा छंदच होता… कोणाला काय आवडते याचे अगदी तू निगुतीने भान ठेवलेस. त्याप्रमाणे ते ज्याचे त्याला करून घातलेस… तुला माणसे प्रिय होती. ती तू जपलीस… त्यांना संभाळलेस… त्यांचं हवं नको बघितलेस… 

तू गेलीस आणि घर रिते झाले. निर्जीव वाटतात आता सगळ्याच गोष्टी. नाही वाटत बघावसं तुझ्याशिवाय तुझं स्वयंपाकघर. सगळं सामान कसं साग्रसंगीत भरून ठेवायचीस. किती प्रेमाने, आपुलकीने फिरायचा तुझा हात घरातील प्रत्येक वस्तूवर. देवावर तुझी असीम श्रद्धा… त्याला सुद्धा तुमची दया आली नाही. देवापेक्षा ही नियती प्रखर ठरली. आजही अपघातांच्या बातम्या वाचनात येतात… प्रत्येक वेळी उद्ध्वस्त व्हायला होते…  माणसं गेली की ती एकटी एकटी जात नसतात… त्यांच्यात गुंतलेल्यांना उद्ध्वस्त करूनच जातात. वेदनेचे पीळ सुटता सुटत नाहीत. काळीज पिळवटून काढतो आणि आठवणी तर आयुष्यभराची सोबत करतात. दुःख प्रेमाची किंमत जाणवून देतात… वेदना माणसाला… नात्यांना जवळ आणते... पण त्यासाठी त्याची जबर किंमत मोजावी लागते. नात्याना आयुष्य असते… ती जुनी होत जातात.

कितीही घट्ट विणली तरीही ती विरतात... पण म्हणून ते कधी आपल्याला सोडून जाते असे नसतेच… शरीर मनाच्या अव्यक्त जाणिवांना त्याचा पडलेला विळखा हा चिरंतन असतो. एक समंजस आणि स्विकारशील दृष्टी तुझ्याकडे होती. नात्यांचा गोतावळा जपून ठेवायचीस तुझ्या कसोशीच्या प्रयत्नात, तुझ्या हक्काच्या माणसांवर तू रागवायचीस. हे रागावणं वरवरचं होतं याची जाणीव त्यांनाही होतीच. याच तर आठवणी आता आतून आतून कुरतडून टाकतात जाणिवांना आणि मग छळू लागतो प्रत्येक क्षण तुमच्या आठवणींचा.

अपघातांचे सत्र अजूनही सुरूच आहे. बातम्या येतच असतात. स्पिड ब्रेकरमुळे अपघात, धोकादायक वळणामुळे अपघात, अरुंद रस्त्यामुळे अपघात… एकुलता कमावता मुलगा अपघातात गेला त्याची हृदय पिळवटून टाकणारी बातमी काळीज चिरीत जाते. तो बेफाम चालवायचा… त्याने हेल्मेट घातले नव्हते, नियमांचे उल्लंघन करून तो चालवायचा… अपरिपक्व मुलाने चालविलेला वाहनांमुळे झालेला अपघात… अशा बातम्या वाचनात येत नाहीत.

दुसऱ्यांच्या चुकीने एखादं कुटुंब उद्ध्वस्त होतं ते कायमचंच... 

गेलेली जातात, मागे राहिलेल्यांचे काय? वेदनेचा अथांग डोह… त्याचा कोठे तळ गवसणार? घटना घडून जाते, त्या क्षणांचा चटका जवळच्या-दुरच्यांना बसतो. सांत्वनासाठी आपुलकीने सारेच येतात त्या वेळची ती शांतताच नकोशी वाटते. जीवघेणी, तगमग, नको वाटतात तेच तेच प्रश्न, सहानुभूती… अगोदरच कोलमडून गेलेल्या शरीर मनाला झेपत नसतात नात्यांचे बंध. दुःखाने आतून आतून कोसळायला झाले तरी ते दाखवावे लागते रडून, आकांत करून… नाहीतर मग आनंदाच्या सर्वच क्षणांना सुरुंग लावीत त्याचे प्रदर्शन मांडावे लागते. माणसं अवतीभवती असताना सतत ती असतीलच हे गृहीत धरले जाते… ती वजा होतात आपल्या आयुष्यातून तेव्हा ती प्रत्येक क्षणी सलत राहतात… अश्वस्थाम्याच्या जखमेसारखी!

तुम्ही अचानक भरल्या संसारातून उठुन गेलात… घराला निर्जीव करून गेलात… रजत, रोहीतबरोबर तुमच्यावर मनस्वी प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्याच काळजाला डाग देऊन गेलात..! सहन होत नाही तुम्ही आमच्याबरोबर नाही हे वास्तव स्वीकारणे…

अशी कितीतरी घरं विस्कळीत होत असतील अपघात सत्राने… तरीही सुधारणा होत नाही. अपघातांचे सत्र कमी होण्याऐवजी वाढतच आहे… रस्ते जास्तीत जास्त रुंद होताहेत… वाहनेही वाढत आहेत… परंतु वाहकाची मनोवृत्ती बदलत नाही. माणुसकीच संपलेली जणू. तरुणाई हातात वाहन आले की बेफाम होते… कायदा हातात घेत नियमांना हरताळ फासून वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरून चकवा देत जातात. 

शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयीन कुमारवयीन विद्यार्थी तर हवेतूनच गाडी चालवतात. मुलांच्या हातात अशी अवेळी गाडी देऊन घराण्याला कोणती प्रतिष्ठा मिळणार आहे? वशिला असला की झाले, इथं कोणालाही गाडी चालविण्याचा परवाना मिळतो. दारू पिऊन वाहाने हाकणे ही तर नित्याचीच बाब. रस्त्याच्या कडेने चालताना तर कायम असुरक्षितता वाटते. आपल्याबरोबरीने इतरांचा जीव ही मौल्यवान आहे. ही शिकवण, असे संस्कार रुजवायला हवेत. 

कुटुंबाबरोबरीने शाळा महाविद्यालयात "रोड कल्चर" सक्तीचेच व्हायला हवे. काहिच गुन्हा नसताना हकनाक अश्राप जीव बळी जातात. कुटुंब कोलमडून पडते. मन खंबीर असेल, आजूबाजूच्या माणसात माणुसकी असली तर नव्याने उभं राहता येते. मात्र असे झाले नाही तर… कल्पना ही करवत नाही!

तुमची पोकळी माझ्या जीवनात कायमच राहील. आपल्यामधील नात्याचा तू भरभक्कम आधार होतीस. हक्काची भांडायची जागा म्हणजे तू होतीस. बालपणीच्या आवडीचा मायेचा घास म्हणजे तू होतीस. माझ्या लग्नानंतरही तूच मला खायला प्यायला आवडणाऱ्या पदार्थांची आठवण ठेवलीस आणि तेवढयाच मायेने करून वाढलेसही. स्वयंपाकघर तुझा श्वास होता. देवघराएवढेच तुला स्वयंपाकघर प्रिय होते. तुमच्या जाण्याने या दोन्ही जागा रिकाम्या झाल्यात. ती घालमेल, तो उत्साह, नवीन पदार्थ करायची ती धडपड, ते रागावणं, घाबरणं... सगळं… सगळं… निमालं आहे!!!

घर, भिंती, सामान… सगळं जागच्या जागी आहे. मात्र तुमचा स्पर्श त्यावरून फिरत नाही. कोणीही थांबले नाही, सगळेच धावत आहेत. मीही त्यात आहे, परंतु अवतीभोवती तुम्ही नाहीत हे सतत जाणवत राहते. तेच तुमचं अस्तित्व, तोच तुमचा अव्यक्त सहवास. मीही चिरंतनाचे वरदान घेऊन आलेली नाही, पण तुम्ही अर्ध्यावरच डाव मोडून गेलात. शरीराने तुम्ही नाहीत हे वास्तव पचवता येणार नाहीच, मात्र त्या क्षणापासून ते अगदी अंतापर्यंत तुम्ही नसानसात भिनलेलेच राहणार. फक्त ते पचविण्याची, सहन करण्याची ताकद मिळू दे… बस एवढंच!!!!