वेळसांव दगडफेक; संशयितांची हजेरी

समज देऊन सुटका : षड् यंत्र रचल्याचा वकिलांचा दावा


24th March 2023, 12:19 am
वेळसांव दगडफेक; संशयितांची हजेरी

प्रतिनिधी । गोवन वार्ता

वास्को : वेळसांव पाळे येथे रेल्वे कंत्राटदाराच्या कामगारांवर दगडफेक केल्याप्रकरणी तसेच जेसीबीची मोडतोड केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावलेले ओलान्सियो सिमोईस, आर्व्हिल दोरादो रॉड्रिग्ज, कार्मिल डिसोझा, फ्रान्सिस ब्रागांझा यांनी गुरुवारी वास्को रेल्वे पोलीस स्थानकात उपस्थिती लावली. त्यांनी मांडलेली बाजू तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी यांनी ऐकून घेतली. त्यानंतर त्यांना अशा प्रकारची कृती करू नका, असा समज देऊन काही अटींचे पालन करण्यास सांगण्यात आले. मात्र सदर तोडफोड, मारहाणीत अशिलांचा सहभाग नसल्याचा दावा संशयितांचे वकील लिओना बार्रेटो यांनी केला. त्यांच्याविरोधात पुरावा नसून, त्यांना फसविण्यासाठी सदर डाव रचण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.       

वेळसांव येथे रेल्वे दुपदरीकरणाला सतत विरोध होत आहे. तेथे कंत्राटदार व काही स्थानिक यांच्यात सतत वाद होतात. रविवारी (१९) दुपारी कंत्राटदाराचे कामगार वेळसांव पाळेच्या रेल्वे बायपास पुलाजवळ काम करत होते. त्यावेळी जमावाने दगडफेक करून त्यांना पिटाळून लावले होते. दोन कामगार किरकोळ जखमी झाले होते. तेथील जेसीबीवर दगडफेक करून मोडतोड करण्यात आल्याचा दावा  सूर्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे अभियंते दिनेश कुमार दिलिप सिंह यांनी पोलीस तक्रारीत केला होता. त्यांनी ओल‌न्सियो, दोरादो, बार्रेटो, डिझोझा यांच्यासह आणखी दहा व्यक्ती असल्याचे नमूद केले होते.        

या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी चार जणांना नोटीस बजावली होती. त्यानुसार ते चौघेजण आपल्या वकिलासह गुरुवारी वास्को रेल्वे पोलीस स्थानकात उपस्थित राहिले.

आपले आशील सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांच्याविरोधात षड् यंत्र रचण्यात आले आहे. घटनेसंबंधी जी वेळ दाखवण्यात आली आहे, त्यावेळी संशयित तेथे उपस्थित नव्हते. फक्त त्रास देण्यासाठी सदर तक्रार तयार करण्यात आली आहे.

— अॅड. लिओना बार्रेटो, संशयितांचे वकील


हेही वाचा