कोविडचा पुन्हा धोका

गोव्याचा विचार करायचा झाल्यास गोव्यातही कोविडचे रुग्ण काही प्रमाणात वाढत आहेत. मडगाव, पणजी, शिवोली, म्हापसा अशा आरोग्य केंद्रांमध्ये कोविडचे रुग्ण जास्त प्रमाणात नोंद आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेच्या आसपास झाली आहे. गेले काही दिवस कोविडचे रुग्ण अगदी कमी होते. पण गेल्या आठ दिवसांमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गोव्यातील आरोग्य खात्याने कोविडच्या नियंत्रणासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत.

Story: संपादकीय |
24th March 2023, 12:05 Hrs
कोविडचा पुन्हा धोका

कोविडचा धोका अजून संपलेला नाही, त्यामुळे आरोग्य आणीबाणीस सज्ज राहा अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आरोग्य क्षेत्राला दिल्या आहेत. कोविड आणि इन्फ्लूएंझाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे देशात पुन्हा आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. कारण कोविडने यापूर्वी ज्या पद्धतीने दोन वर्षे ठाण मांडून सर्वांना हतबल केले होते ते पाहता कोविडचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसायला लागल्यानंतर आरोग्य यंत्रणेला सर्वांत आधी सतर्क केले जाते. गेले काही दिवस देशात कोविडचे आणि इन्फ्लूएंझाचे रुग्णही मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. कोविडच्या काळात देशाच्या आरोग्य यंत्रणेचा कसा फज्जा उडाला त्याचे सारेच साक्षीदार आहेत. म्हणूनच कोविडचे रुग्ण वाढायला लागल्यानंतर सर्वांनीच सतर्क होऊन लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचा पर्याय स्वीकारावा. हेच सर्वांच्या सुरक्षेच्या आणि हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

इन्फ्लूएंझाचे दोन रुग्ण हरियाणा आणि कर्नाटकमध्ये दगावल्यामुळे हा फ्लूही चिंतेचे कारण ठरला आहे. कोविड, एच-३ एच-२ आणि अॅडिनोव्हायरस असे तीन प्रकारचे विषाणू सध्या फोफावत असल्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. पंतप्रधानांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व सुविधा सुसज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

करोनाचा उद्रेक २०२० पासून सर्वांनीच पाहिला आहे. सध्या कोविडच्या रुग्णांमध्ये लक्षणांचा प्रभाव कमी दिसतो. एच-३ एच-२ मध्येही सर्दी खोकला, अंग दुखणे, ताप येणे, जुलाब यासारखी लक्षणे दिसतात. लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. अॅडिनोव्हायरसमध्येही सर्दी-खोकला-ताप ही लक्षणे आहेत. या व्हायरसमुळे डोळ्यांना त्रास जाणवतो. गेले काही आठवडे देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये या व्हायरसनी डोके वर काढले आहे. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास योग्य ती खबरदारी घेतानाच वैद्यकीय सल्ला घेणे आणि चाचणी करणे अशा गोष्टी तत्काळ करण्याची गरज आहे. कोविडमध्ये डेल्टाचा व्हेरिएंट आहे. कोविडच्या रुग्णांमध्ये सगळीकडे वाढ होत आहे. देशात दिवसाला आता तेराशेच्या आसपास रुग्ण सापडत आहेत त्यामुळे कोविडच्या रुग्णांमध्ये यापुढेही वाढ होऊ शकते. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने चाचणी-शोध-उपचार-लसीकरण आणि कोविडमुळे घ्यायची दक्षता या गोष्टींकडे सर्व राज्यांनी लक्ष द्यावे, असे म्हटले आहे. आरोग्य आणीबाणी निर्माण झाल्यास रुग्णालये सुसज्ज आहेत का, ते पाहण्यासाठी इस्पितळांनी मॉकड्रिल घेण्याची सूचना केंद्राने केली आहे. जिनोम सिक्वेंसिंगसाठी येणाऱ्या नमुन्यांमध्ये नवा व्हेरिएंट आढळल्यास तत्काळ त्याचा पाठपुरावा करावा, रुग्णांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या आवारात मास्क घालण्यास सांगावे, अशा अनेक गोष्टी केंद्राने राज्यांना कळवल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने कोविडचे वाढते रुग्ण तसेच इतर विषाणूंचा वाढता प्रसार आणि वाढचे रुग्ण गांभीर्याने घेतले आहेत. गोव्याचा विचार करायचा झाल्यास गोव्यातही कोविडचे रुग्ण काही प्रमाणात वाढत आहेत. मडगाव, पणजी, शिवोली, म्हापसा अशा आरोग्य केंद्रांमध्ये कोविडचे रुग्ण जास्त प्रमाणात नोंद आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या दीडशेच्या आसपास झाली आहे. गेले काही दिवस कोविडचे रुग्ण अगदी कमी होते. पण गेल्या आठ दिवसांमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गोव्यातील आरोग्य खात्याने कोविडच्या नियंत्रणासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. पण गोव्यात कोविडचा पुन्हा उद्रेक झाला तर गोव्यातील आरोग्य यंत्रणा त्याचा सामना करण्यासाठी सक्षम आहे की नाही, त्याबाबत मॉकड्रिल घेऊन पहावे लागेल. कोविडच्या काळात गोव्यात ऑक्सिजनबाबत झालेला गोंधळ कोणी विसरलेले नाही. कोविडने गोव्यात सुमारे चार हजार लोकांचा बळी घेतला आहे. सुमारे २.६० लाख लोकांना आतापर्यंत गोव्यात कोविडची लागण झाली आहे. त्यामुळे गोव्याने कोविडबाबत जास्त सावधगिरी बाळगायला हवी. रुग्ण कमी सापडतात म्हणूनही दुर्लक्ष करता येणार नाही. केंद्रानेच कोविडचे वाढते रुग्ण गांभीर्याने घेतल्यामुळे राज्यानेही आपल्याकडे असलेल्या सुविधांचा आढावा घ्यावा. सध्या तापमान बदल होत असल्यामुळे फ्लूचे विषाणू आजारी व्यक्ती, अॅलर्जी असलेल्या व्यक्ती तसेच मुलांना लवकर लक्ष्य करतात असे वैद्यकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे सगळ्याच वाढत्या विषाणूंच्या साथींमुळे सरकारी यंत्रणा आणि नागरिकांनीही सावध राहायला हवे.