मडगाव बसस्थानकानजीक कचऱ्याच्या ढीगाला आग

पाच गाड्या पाणी मारूनही आग थांबेना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th March 2023, 12:32 Hrs
मडगाव बसस्थानकानजीक कचऱ्याच्या ढीगाला आग

कदंब बसस्थानकानजीक कचऱ्याच्या ढीगाला लागलेली आग.       

मडगाव : येथील कदंब बसस्थानकानजीक पालिकेच्या जागेवर ज्याठिकाणी आधी खासगी बस उभ्या केल्या जात होत्या त्याठिकाणी आता पालिकेकडून कचरा टाकण्यात येतो. मडगावात शिमगोत्सवाची धूम असतानाच शनिवारी दुपारी साठवण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढीगाला आग लागण्याची घटना घडली. अग्निशामक दलाकडून पाच गाड्या पाण्याचा मारा करण्यात आल्यावरही धूर येत असून आगीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू होता.
मडगाव कदंब बसस्थानकानजीक ज्याठिकाणी आधी खासगी बस उभ्या केल्या जात होत्या त्याठिकाणी काही काळापासून पालिकेकडून कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याठिकाणी असलेल्या खासगी बसेस आता कचरा टाकण्यात येत असल्याने बाहेरील जागेवर पार्क केल्या जात आहेत. मडगाव येथे शिमगोत्सवाची धूम असताना तसेच फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर आयएसएलचा सामना आयोजित केलेला असतानाच कदंब बसस्थानकानजीक साठवणूक केलेल्या कचऱ्याच्या ढीगाला शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांकडून आग लागल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाला देण्यात आल्यावर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग लागलेल्या कचऱ्याच्या ढीगावर पाण्याचा मारा केला. सायंकाळी उशिरापर्यंत तीन गाडी पाण्याचा मारा करण्यात आलेला होता. मात्र, तरीही आगीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यात आलेले नव्हते. आणखी दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आलेल्या होत्या.
अग्निशामक दलाच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. कचऱ्यात आतपर्यंत आग गेलेली असल्याने पाणी मारल्यानंतरही धूर येत असून आग लागत आहे. सदर आग विझवण्यासाठी मातीचा भराव टाकण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.