एटीके बागान आयएसएल चॅम्पियन

गतविजेत्या बंगळुरू एफसीवर मात : पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा विजय

|
18th March 2023, 11:53 Hrs
एटीके बागान आयएसएल चॅम्पियन

न्यूज डेस्क। गाेवन वार्ता

मडगाव : हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) ची फायनल कमालीची चुरशीची झाली. हिरो आयएसएलच्या दुसऱ्या टप्प्यात अविश्वसनीय कामगिरी करून सर्वांना अचंबित करणाऱ्या बंगळुरू एफसीने दमदार खेळ केला. मात्र अखेर यात एटीके मोहन बागानने विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले.

एटीके मोहन बागानकडूनही तितकाच तोडीसतोड खेळ झाला. सुनील छेत्री (पेनल्टी) आणि रॉय कृष्णा यांनी बंगळुरूला दोन वेळा आघाडी मिळवून दिली आणि दोन्ही वेळेस एटीकेकडून दिमित्री पेट्राटोसने पेनल्टीवर गोल करून बरोबरी मिळवली. १२० मिनिटांच्या खेळात ही बरोबरीची कोंडी न सुटल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. एटीके मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथने बंगळुरू एफसीच्या ब्रुनो सिल्वाचा प्रयत्न रोखला अन् त्यानंतर पाब्लो पेरेझचा प्रयत्न चुकला. एटीके मोहन बागानने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा जिंकून किताब पटकावला.

गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सामना रोमांचक होणार, यात कोणालाच शंका नव्हती. पहिल्याच मिनिटाला बंगळुरू एफसीला धक्का बसला अन् त्यांचा युवा खेळाडू शिवा नारायणन याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि त्यामुळे दिग्गज सुनील छेत्रीला लगेच मैदानावर बदली खेळाडू म्हणून उतरावे लागले. सहाव्या मिनिटाला एटीके मोहन बागानने गोल करण्याची निर्माण केलेली संधी थोडक्यात हुकली. १३व्या मिनिटाला कॉर्नरवरून दिमित्री पेट्राटोसचा प्रयत्न गोलरक्षक गुरप्रीत संधूने रोखला, परंतु त्यानंतर तो रोखण्याच्या प्रयत्नात रॉय कृष्णाचा हात लागला अन् एटीके मोहन बागानला पेनल्टी मिळाली. पेट्राटोसने या संधीचं सोनं केलं अन् गोल करून एटीके मोहन बागानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यंदाच्या पर्वात एटीकेने १० वेळा पहिला गोल केला अन् त्यातले ९ सामने त्यांनी जिंकले आहेत. त्यामुळे ही आघाडी मिळताच शांत स्वभावाचे मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी जल्लोष केला.

२४व्या मिनिटाला छेत्री चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरला होता, परंतु एटीकेच्या प्रितम कोटालने तितकाच सुरेख बचाव केला. २५व्या मिनिटाला हर्नांडेझने फ्री किकवर मारलेला ऑन टार्गेट प्रयत्न एटीकेचा गोलरक्षक विशाल कैथने अप्रतिमरित्या रोखला. यंदाच्या पर्वात विशाल सर्वाधिक १२ क्लीन शीट राखले आहेत आणि हा आयएलएलच्या एका पर्वातील मोठा विक्रम आहे. विशाल यंदाच्या पर्वात गोल्डन ग्लोव्ह्जच्या पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर आहे. ४१व्या मिनिटाला हर्नांडेझचा फ्री किकवरील आणखी एक प्रयत्न विशालने रोखला. ४५+२ मिनिटाला सुभाषिश बोसकडून पेनल्टी क्षेत्रात रॉय कृष्णाला लाथ लागली अन् बंगळुरूला पेनल्टी मिळाली. छेत्रीने यावर गोल करून पहिल्या हाफमध्ये १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरून आयएसएल फायनलमध्ये गोल करणारा छेत्री चौथा खेळाडू ठरला. तसेच एकाच क्लबकडून खेळताना सर्वाधिक ४९ गोलचा विक्रमही आज छेत्रीने नावावर केला.

५४व्या मिनिटाला रॉय कृष्णाचा बंगळुरूला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मध्यंतरानंतर दोन्ही संघ चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी खेळताना दिसले. ५७व्या मिनिटाला लिस्टन कोलासोने चांगला क्रॉस दिला होता, परंतु गुरप्रीतने तो रोखला. ६१व्या मिनिटाला कोलासोने वेगवान शॉट मारला, परंतु गुरप्रीतने त्याच्या उंचीचा पुरेपूर वापर करून गोल अडवला. रिबाऊंडमध्ये पेट्राटोसला संधी मिळाली होती, परंतु तो चुकला. एटीके मोहन बागानची आघाडी घेण्याची सुवर्ण संधी हुकली. ६५ व्या मिनिटाला ह्युगो बौमोसने १८ यार्ड बॉक्सवरून प्रयत्न घेतला, परंतु तो गोलपोस्टवरून गेला. बंगळुरूने ७८व्या मिनिटाला २-१ अशी आघाडी घेतली. कॉर्नरवर आलेल्या क्रॉसवर रॉय कृष्णाने अचूक हेडर मारला अन् बंगळुरूचे चाहते आनंदाने नाचू लागले. पण, माजी संघाविरुद्ध गोल केल्याने रॉय कृष्णाने जल्लोष नाही केला.

८४व्या मिनिटाला पाब्लो पेरेझने १८ यार्ड बॉक्समध्ये कियान गिरीला पाडले अन् एटीकेला पेनल्टी मिळाली.  पेट्राटोसने ८५व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. आता खेळातील गती अचानक वाढली अन् दोन्ही संघ विजयी गोल करण्याच्या प्रयत्नात दिसले. दोन्ही संघ उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवून फायलमध्ये आले आहेत. ९०व्या मिनिटाला रॉय कृष्णा पेनल्टी क्षेत्रात शिरला, परंतु एटीकेच्या तीन बचावपटूंनी त्याला अडवले. ९०+३ मिनिटाला पेट्राटोसचा गोलचा प्रयत्न प्रबीर दासने गोलपोस्टच्या तोंडावर रोखला अन्यथा एटीकेकडून विजयी गोल झालाच होता. ४ मिनिटांच्या भरपाई वेळेत एटीकेचे दोन प्रयत्न फसले अन् सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत गेला.

पहिल्या पंधरा मिनिटांतही ही बरोबरीची कोंडी सुटली नाही. १०६ मिनिटाला रॉय कृष्णा आघाडी गोल करण्याच्या अगदी नजीक पोहोचला होता. ११० व्या मिनिटाला एटीकेच्या मनवीरला हेडरवर गोल करण्याची संधी पेट्राटोसने निर्माण करून दिली, परंतु तो चुकला. ११९व्या मिनिटाला पेट्राटोसने ऑन टार्गेट प्रयत्न केला अन् गुरप्रीतच्या हातून तो निसटला. सुदैवाने तो गोलजाळीत गेला नाही. आता सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला आणि फायनलचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागण्याची ही तिसरी वेळ ठरली.