पर्यटकांना जपा; गोव्याची बदनामी थांबवा!

कोविडचा काळ वगळला तर इतर वर्षांमध्ये गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढतच आहे. पण म्हणून उठसूठ कायदा हातात घेऊन पर्यटकांवर जीवघेणे हल्ले करणे, खून करणे, त्यांची वेगवेगळ्या कारणांमुळे लुबाडणूक करणे या गोष्टी चालू द्यायच्या नाहीत याचे भान सरकारने ठेवायला हवे. पर्यटकांना अपमानित करण्याचे थांबायला हवे. त्यांच्यावरील हल्ले वेळीत थांबायला हवेत.

Story: उतारा | पांडुरंग गांवकर |
18th March 2023, 11:26 pm
पर्यटकांना जपा; गोव्याची बदनामी थांबवा!

पर्यटकांना मारहाण, अपमान आणि त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांमुळे गोव्याची सध्या बरीच बदनामी होत आहे. फक्त गोव्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही गोव्यात पर्यटकांवर होणाऱ्या अत्याचारांना ठळकपणे प्रसिद्धी दिल्यामुळे हा विषय गेला आठवडाभर गाजत आहे. हणजुणेतील ज्या रिसॉर्टमध्ये घटना घडली तेथे पर्यटकांवर सुरीने हल्ला झाला. पण तो हल्ला होऊ नये यासाठी हॉटेल व्यवस्थापनाने दक्षता म्हणून अगोदरच पोलिसांना बोलावणे योग्य समजले नाही. सगळा प्रकार घडल्यानंतर पोलीस आले. पोलिसांनीही पर्यटक कुटुंबाच्या तक्रारीनुसार काही आवश्यक कलमे लावण्यास हयगय केली. प्रकार समोर आल्यानंतर एका उपनिरीक्षकाचे निलंबन झाले. तो बळीचा बकरा ठरला. त्याच दिवसांत जुने गोवे येथे पर्यटक कुटुंबाचा तेथील सुरक्षा रक्षकांसोबत झालेला वाद व्हिडिओद्वारे समोर आला. काही दिवसांपूर्वी सोनाली फोगट या भाजपच्या महिला नेत्याचा गोव्यात मृत्यू झाला होता, तेव्हापासून गोव्यात काहीना काही गोष्टी घडत आहेत. पर्यटन क्षेत्रात एरव्ही रोजच अशा गोष्टी घडत असतात. सोशल मीडियामुळे काही गोष्टी उजेडात येतात. पण अनेक गोष्टी पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मिटतात किंवा उजेडात येत नाहीत. पर्यटन राज्य असल्यामुळे पर्यटकांवर खापर फोडण्यापेक्षा सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असते हे आधी लक्षात घ्यायला हवे. सरकारच सुरक्षेत कमी पडत असेल तर त्याचे खापर पर्यटकांवर फोडून चालणार नाही. सुरक्षित पर्यटन गोव्यात होईल याची काळजी घ्यावी लागेल. पण या गोष्टीकडेच लक्ष दिले गेले नाही. गोव्यात येणारा पर्यटक सीमेवरील चेकनाक्यापासूनच लुटीचा बळी ठरतो. काही पर्यटक गोवा सोडून जाईपर्यंत कुठल्या ना कुठल्या अपप्रवृत्तींचा अनुभव घेतातच. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्यास सरकारची बदनामी होईलच. पण राज्याचीही बदनामी होत राहील.

गोव्यात येणारा नव्वद टक्के पर्यटक हा देशी असतो. २०१९ च्या तुलनेत सात लाखांच्या आसपास विदेशी आणि सत्तर लाखांपेक्षा जास्त पर्यटक देशी होते. त्यामुळे देशी पर्यटकांविषयी गोव्यातील काही लोकांची जी भावना आहे ती बदलावी लागेल. पर्यटन क्षेत्रातील उलाढालीत सर्वात मोठा वाटा देशी पर्यटक उचलतो. गेल्या काही वर्षांमध्ये कॅसिनोंमुळे आर्थिक स्थितीने मजबूत असलेले लाखो देशी पर्यटक गोव्यात येतात. त्यामुळे विदेशीच पर्यटक जास्त पैसा गुंतवतो असे नाही, तर देशी पर्यटकही सर्वाधिक पैसे गोव्यात पर्यटनाच्या माध्यमातून खर्च करतो हे सत्य आहे. त्यामुळे एक-दोन घटनांमुळे ‘हे देशी पर्यटकच वाईट’ असा अंदाज लावता येणार नाही. ज्या पद्धतीने हणजुणेतील प्रकारानंतर सोशल मीडियावर देशी पर्यटकांविरुद्ध मते व्यक्त होत आहेत ते पाहता अनेकांना देशी पर्यटकच नकोत की काय असे वाटते. पण पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा सध्याच्या स्थितीत महत्त्वाचा व्यवसाय आहे. आपला काही पर्यटनाशी संबंध नाही म्हणून ते पर्यटकच नको असे म्हणता येणार नाही. राज्याची अर्थव्यवस्थाच नव्हे तर रोजगाराच्या दृष्टीने गोव्यातील लाखो लोक पर्यटनावर अवलंबून आहेत. गोव्यातील सर्वांकडेच पर्यटन व्यवसायाचा कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून संबंध येतो. गोव्याच्या हितासाठी पर्यटन व्यवसायाची प्रगती व्हायला हवी आणि चांगले पर्यटक येतील, त्यांना शिस्त लागेल अशा पद्धतीने सरकारच्या संबंधित खात्यांनी काम करावे लागेल. एखाद्या देशी पर्यटकाने काही गैर केले तर जे ८०-९० लाख देशी पर्यटक येतात ते सर्वच वाईट ठरत नाहीत. सगळ्याच गोष्टीच्या दोन बाजू असतात.

विदेशातून येणारे अनेक पर्यटक ड्रग्ज विक्रीच्या किंवा अन्य गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या हाती लागतात. पोलीस स्थानकांमध्ये विदेशी पर्यटक जे ड्रग्जसारख्या गुन्ह्यांत सापडतात त्यांची वार्षिक सरासरी ३८ इतकी आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये ड्रग्जच्या प्रकरणांतच २३१ विदेशी नागरिक सापडले. रशिया, नायजेरिया, इस्राईल अशा वेगवेगळ्या देशांतील हे लोक आहेत. अन्य गुन्ह्यांमध्ये सहा वर्षांमध्ये ३८७ विदेशी नागरिकांवर पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. आता या सहाशे विदेशी पर्यटकांमुळे आठ- दहा लाख विदेशी पर्यटक येतात त्यांना वाईट म्हणता येणार नाही. पण गोवा हे गुन्हेगारीचे केंद्र न होता चांगल्या पर्यटनाचे केंद्र व्हायला हवे. त्यासाठी गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला जबाबदारीचे पर्यटन म्हणजे काय, ते कळायला हवे. त्यासाठी जागृती करणे, चांगले पर्यटक येतील यासाठी प्रयत्न करणे आणि गोव्यात त्यांना सुरक्षित पर्यटन करता येईल इतके सुरक्षित वातावरण तयार करणे गरजेचे आहे. गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांना तितक्याच गंभीरतेने कायद्याचा दणका देण्याची गरज आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये ड्रग्ज माफियांचे रॅकेट, स्कार्लेट किलिंगचे प्रकरण, नायझेरियनांवरील हल्ले अशा अनेक कारणांमुळे विदेशातही गोव्याचे नाव बदनाम झाले. पण म्हणून गोव्याचे नुकसान झालेले नाही. पर्यटकांच्या संख्येत घट झाली नाही. कोविडचा काळ वगळला तर इतर वर्षांमध्ये गोव्यात देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढतच आहे. पण म्हणून उठसूठ कायदा हातात घेऊन पर्यटकांवर जीवघेणे हल्ले करणे, खून करणे, त्यांची वेगवेगळ्या कारणांमुळे लुबाडणूक करणे या गोष्टी चालू द्यायच्या नाहीत याचे भान सरकारने ठेवायला हवे. पर्यटकांना अपमानित करण्याचे थांबायला हवे. त्यांच्यावरील हल्ले वेळीत थांबायला हवेत. किनारी भागांमध्ये बेकायदा गोष्टींचे निर्माण झालेले अड्डे मोडून काढावे लागतील. पर्यटन क्षेत्रात खरोखरच गुंड प्रवृत्ती डोकावत असतील तर त्यांना वेळीच ठेचायला हवे. अन्यथा गोव्याची बदनामी होत राहील आणि एक दिवस पर्यटन क्षेत्रालाही उतरती कळा लागेल. गोव्याची आणि पर्यटन क्षेत्राची प्रतिमा चांगली रहावी यासाठी सरकारने योग्य ते धोरण तयार करायला हवे. फक्त बोलून काही होणार नाही. प्रत्यक्ष कृती हवी.