हातावरचे घाव सोसत सासू सुनेची जोडी जपतेय आपली हस्तकला

मडगाव पॉवर हाऊस सर्कल येथून रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो बगल रास्ता आहे, तिथे रेणुका हाजगोलकर आणि पूजा हाजगोलकर ही सासू सुनेची जोडी अतिशय उत्साहात त्यांची ही पारंपरिक बांबूकला जपताना, स्वत: बांबूच्या विविध वस्तू हौसेने तयार करून त्याची विक्री करताना मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह आनंदाने करत आहेत.

Story: तू चाल पुढं | कविता प्रणीत आमोणकर |
18th March 2023, 12:39 am
हातावरचे घाव सोसत सासू सुनेची जोडी जपतेय आपली हस्तकला

जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण झपाट्याने होत असताना यात काही हस्तकौशल्याची कारागिरी आणि ही कारागिरी सांभाळून त्यावर आपला उदरनिर्वाह करणारे कारागीर मात्र हळूहळू लुप्त होत जात आहे, हे मान्य करावेच लागेल. बांबूकला ही त्यातील एक कला. बांबूच्या वस्तू या अतिशय आकर्षक असल्या तरी जेव्हापासून प्लॅस्टिकचा शोध लागला, तेव्हापासून हळूहळू या कलेकडे दुर्लक्ष होत गेले.

पूर्वीच्या काळी, खास करून खेड्यापाड्यातून बांबूचा गृहपयोगात वापर अनेक ठिकाणी होताना दिसायचा. घर बांधणीसाठी, घराच्या समोर अंगणात मांडव घालण्यासाठी, घरातील शोभेच्या तसेच रोजच्या वापरातील वस्तू करता, इतकेच नव्हे तर छोट्या ओढ्यावर किंवा वहाळावर जा ये करण्यासाठी छोटासा साकव करण्यासाठी तसेच पोकळ बांबूतून पाणी वाहून नेण्यासाठीही याचा उपयोग केला जाई. जेव्हा मनुष्य इहलोकला जातो, तेव्हा त्याची अंत्ययात्रा सुद्धा याच बांबूच्या शिडीवरून केली जाते आणि आजही ती प्रथा कायम आहे, हे तर सर्वश्रूत आहे.

बांबूच्या लहान टोपल्यांचा उपयोग काजू मोसमात काजू गोळा करण्यासाठी, भाजी ठेवण्यासाठी,  भिजवलेल्या कडधान्याला मोड आणण्यासाठी, भाताची पेज किंवा निवळ काढण्यासाठी, घरगुती सामान वाहून नेण्यासाठी केला जातो. तर मोठ्या टोपल्यांचा उपयोग शेतात नारळ / लाकडे गोळा करण्यासाठी, शेतातील भात गोळा करण्यासाठी वापरल्या जातात. आजकाल घरातही शोकेसमध्ये टीव्हीचा रिमोट ठेवण्यासाठी, मनगटावरील घड्याळे ठेवण्यासाठी छोट्या बांबूच्या टोपल्यांचा उपयोग होताना दिसतो. या छोट्या विणलेल्या बांबूच्या टोपल्या दिसायलाही आकर्षक असल्याने त्या शोकेसची आणि पर्यायाने दिवाणखान्याचीही शोभा वाढवतात. लग्नसमारंभात जेव्हा हळदीचा कार्यक्रम असतो, तेव्हा मुसळाने धान्य भरडण्याचा कार्यक्रम असतो. हे धान्य ज्यात ठेवले जाते, ते म्हारवण आणि लामणदिवा ज्यात ठेवला जातो, ती रोवळीसुद्धा खास बांबूचीच लागते असा प्रघात आहे.

असे असले तरी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत का होईना, काही कलाकार आपली ही पारंपरिक कला संवर्धित करून ती पुढे नेण्याचा प्रयत्न मात्र कसोशीने करताना दिसतात. मडगाव पॉवर हाऊस सर्कल येथून रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो बगल रास्ता आहे, तिथे रेणुका हाजगोलकर आणि पूजा हाजगोलकर ही सासू सुनेची जोडी अतिशय उत्साहात त्यांची ही पारंपरिक बांबूकला जपताना, स्वत: बांबूच्या विविध वस्तू हौसेने तयार करून त्याची विक्री करताना मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह आनंदाने करत आहेत.

रेणुका आणि पूजा ही सासू सुनेची जोडी आपल्या हातावरचे घाव आणि त्याचे चटके  सोसत आपली परंपरागत चालत आलेली बांबूची हस्तकला जपताना बांबूच्या अनेक कलात्मक वस्तू तयार करत आहेत. यातून मिळणारे उत्पन्न हे अगदीच नगण्य असले तरी त्यांच्या चेहर्‍यावर जे समाधान आहे, ते लाखमोलाचे आहे, असे मला त्यांच्या चेहर्‍याकडे पाहताना वाटले.

रेणुका आणि पूजा या दोघी सासू सुना मिळून बांबूच्या लहान मोठ्या टोपल्या आणि त्यावरची झाकणे, रोवळी, फुलांचे बुके बनवण्यासाठी लागणार्‍या परड्या, धान्य पाखडायचे सूप, लग्न कार्यासाठी लागणारे सर्व तर्‍हेचे बांबूचे सामान, पंखे, कंदील, आकाशदिवा, झाडू आदी सर्व हस्तकलेच्या या वस्तू इतक्या सहजतेने बनवतात की त्यांच्या हातातील ही कला पाहून आपण थक्क होतो.

बांबूच्या या सर्व वस्तू बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. मी जेव्हा त्यांना भेटले, तेव्हा रेणुका यांनी नुकतीच एक मोठी टोपली विणण्यास घेतली होती. तर पूजा या एक छानशी कलात्मक अशी टोपली विणण्यात गर्क होत्या. बोलता बोलता पूजा यांनी ती टोपली पूर्ण केली, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद हा डोळ्यांतून ओसंडून वाहत होता.

रेणुका या गेली २० वर्षे आपला हा बांबूकामाचा पारंपरिक व्यवसाय जतन करताना तो संवर्धितही करत आहेत आणि आता त्यांना जोडीला आपल्या सुनेचीही चांगली साथ मिळाली आहे. पूजा यांच्या आई वडिलांचाही हाच पारंपरिक व्यवसाय असल्याने पूजाही या कामात निष्णात आहेत. त्यामुळे या सासू सुनेच्या जोडीच्या या कामातील उत्साह दुणावला.

बांबूच्या या विविध वस्तू दिसायला आकर्षक दिसल्या तरी त्यामागे त्यांची जीवतोड मेहनत असते. आधी बांबू तोडण्यापासून तयारी करावी लागते. तो बांबू तोडून आणल्यावर त्याच्यापासून पातळ पट्ट्या काढाव्या लागतात. धारदार कोयत्याचे हे काम असल्याने आणि बांबूच्या पट्टयाही धारधार असल्याने हाताला बरेचसे घाव सहज होतात आणि हे घाव आपल्या हातावर सहज झेलताना रेणुका आणि पूजा या दोघींचे हात अतिशय कठीण बनले आहेत. असे असले तरी आपला हा पारंपरिक व्यवसाय करताना त्या आपले काम मात्र अतिशय इमान इतबारे करत आहेत.

रेणुका यांना जशी आपल्या सुनेची छान साथ मिळाली तशीच साथ त्यांना त्यांचे पती नागेश आणि मुलगा शिवा यांची उत्तम साथ मिळत आहे. रेणुका यांना त्यांचे पती, मुलगा, सून यांची साथ मिळाल्याने त्यांचे हे चौकोनी कुटुंब आपल्या या पारंपरिक व्यवसायाची जपणूक करताना आनंदाने आपली उपजीविका करताना दिसतात. आपली ही हस्तकला जपताना मिळालेल्या उत्पन्नात रोजची भाकर आपल्या कुटुंबासोबत खाताना ते आपले सुखी समाधानी आयुष्य जगत आहेत याची खात्री त्यांच्या चेहर्‍यावरचे समाधान पाहून नक्कीच मिळते.