अश्विनमुळे भारताला दिलासा

डावात घेतले ६ बळी : उस्मान-ग्रीनमुळे ऑस्ट्रेलियाच्या सर्वबाद ४८० धावा

|
10th March 2023, 11:42 Hrs
अश्विनमुळे भारताला दिलासा

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद ३६ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव ४८० धावांवर आटोपला, ज्यामध्ये उस्मान ख्वाजाने १८० धावांची दमदार खेळी केली, तर कॅमेरून ग्रीनच्याही फलंदाजीतून ११४ धावा झाल्या. 

भारतीय संघाच्यावतीने रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत ६ विकेट्स आपल्या नावावर केल्या. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय संघाच्या गोलंदाजांकडून थोडी चांगली कामगिरी होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीन या जोडीने त्यांना विकेट घेण्याची एकही संधी दिली नाही. पहिल्या सत्राअखेर संघाची धावसंख्या ४ विकेट गमावून ३४७ धावांवर पोहोचली होती.

ग्रीनचे दुसऱ्या सत्रात शतक

उपाहारानंतर खेळाचे दुसरे सत्र सुरू होताच ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण करण्यास फारसा विलंब केला नाही. यानंतर, ग्रीन ११४ च्या वैयक्तिक स्कोअरवर खेळत असताना, अश्विनच्या लेग साइडकडे जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात त्याने त्याचा झेल यष्टिरक्षकाकडे सोपवला.

ऑस्ट्रेलियन संघाला ३७८ धावांवर पाचवा धक्का बसला, तर यानंतर फलंदाजीला आलेला अॅलेक्स कॅरीही खाते न उघडता अश्विनचा बळी ठरला. त्याचवेळी, ३८७ च्या स्कोअरवर कांगारू संघाला मिचेल स्टार्कच्या रूपाने ७ वा धक्का बसला. चहापानाच्या वेळी खेळ थांबला, तोपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ७ विकेट गमावून ४०९ धावा केल्या होत्या.

मर्फी, लियॉनमुळे ४५० धावांचा टप्पा पार

दिवसाच्या शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा डाव लवकरच गुंडाळतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि उस्मान ख्वाजा १८० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर सुरुवातही अशीच झाली. पण इथून पुढे नॅथन लियॉन आणि टॉड मर्फी यांच्यात ९व्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी पाहायला मिळाली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला ४५० धावांचा टप्पा पार करता आला. ऑस्ट्रेलियन संघाला ४७९ धावांवर ९वा धक्का बसला जेव्हा टॉड मर्फी ४१ धावांची इनिंग खेळून अश्विनचा बळी ठरला, तर कांगारू संघाचा पहिला डाव ४८० धावांवर आटोपला.

भारताकडून या डावात रविचंद्रन अश्विनने ६, महम्मद शमीने २ तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्यकी १ विकेट्स घेतल्या. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात बिनबाद ३६ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा १७ तर शुभमन गिल १८ धावा करून नाबाद खेळत आहे.