मुख्यमंत्र्यांचे उद्गार : आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक आणि वेलनेस संमेलनाचे उद्घाटन

संमेलन स्थळावरील विविध स्टॉलची पाहणी करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आचार्य बालकृष्ण व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्याला आयुर्वेद आणि आरोग्य पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या क्षेत्रातील डॉक्टर, संशोधक, उद्योजकांनी पुढाकार घेऊन राज्यात या क्षेत्रातील प्रकल्प सुरू करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. पहिल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक आणि वेलनेस संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पतंजलीचे आचार्य बालकृष्ण, खासदार सदानंद शेट तानावडे, डॉ. राजेंद्र बडवे, डॉ. स्नेहा भागवत, डॉ. पी. के. प्रजापती, प्रतिमा धोंड व अन्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने नुकतेच गोवा वेलनेस आणि आयुर्वेद धोरण २०२६ जारी केले आहे. यानुसार आयुष व संलग्न क्षेत्रातील डॉक्टरांना गोव्यात आपली प्रॅक्टीस करणे सुलभ झाले आहे. नवीन धोरणाद्वारे गोव्याची ओळख केवळ सी, सन अँड सँड अशी राहणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गोव्यात आयुर्वेदिक संशोधन, निसर्गस्नेही प्रकल्प, कौशल्य विकास, जबाबदार पर्यटनाला सरकार नेहमीच पाठिंबा देईल. या धोरणाचा सर्व भागधारकांनी फायदा करून घ्यावा. यापुढे हे संमेलन दरवर्षी गोव्यात आयोजित केले जाणार आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आयुर्वेद केवळ एक औषधप्रणाली नसून जगण्याची शैली आहे. यामध्ये शरीर आणि मन, निसर्ग आणि मानवाचा समतोल आहे. आयुर्वेद आजार बरा करण्यासोबत आरोग्याची काळजीही घेते. ही औषधप्रणाली सहज आणि किफायतशीर दरात उपलब्ध आहे. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आयुर्वेद आपल्या प्राचीन संस्कृतीच्या मुळाशी नेते. युवा पिढीने या परंपरेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतीय औषधप्रणालीला यापुढेही राज्य सरकार पाठिंबा देणार आहे.
मधुमेह रुग्णांची संख्या चिंताजनक : आचार्य बालकृष्ण
पतंजलीचे संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले की, गोव्यात दर चारपैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धतीद्वारे हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. काही पाश्चात्त्य संस्था भारतीय आयुर्वेदिक औषधांचे पेटंट घेण्याचे प्रयत्न करत आहेत. याकडेही लक्ष दिले पाहिजे.
कर्करोगाचे प्रमाण कमी करणे शक्य : डॉ. राजेंद्र बडवे
डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले की, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात तसेच गोव्यात प्रति एक लाख लोकांमागे कर्करोगाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. आयुर्वेद, योग्य जीवनशैली यांच्या साहाय्याने कर्करोग होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांनी कमी करता येऊ शकते.