सर्वसमावेशकता हा जीवनाचा भाग होण्याची गरज

राज्यपाल : धारबांदोडा येथे रंगला विशेष मुलांचा ‘तुम भी चलो हम भी चले’


53 mins ago
सर्वसमावेशकता हा जीवनाचा भाग होण्याची गरज

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : संघटितपणे राहिलाे तरच आपण प्रगती करू शकतो. गोवा घडवण्यासाठी सर्वसमावेशकता हा फक्त विचार असून चालणार नाही, तर तो जीवनाचा भाग बनला पाहिजे. सर्वसमावेशकतेसाठी विशेष मुलांना समान संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे मत राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केले. धारबांदोडा येथे रिजोनिया कंपनीच्या ‘तुम भी चलो, हम भी चले’ कार्यक्रमता प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.


या कार्यक्रमाला सभापती गणेश गावकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, आमदार कृष्णा साळकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य मोहन गावकर, रूपेश देसाई, सरपंच महेश नाईक, बालाजी गावस, रिजोनिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शर्मा आणि इतर उपस्थित होते.


नृत्य दिग्दर्शिका ममत चंडेल यांच्या मार्गदर्शनाखाली संजय स्कूल (पर्वरी), आशादीप तसेच अन्य संस्थांमधील विशेष मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीत आणि कला या फक्त मनोरंजन करणाऱ्या गोष्टी नाहीत, तर त्या शांती, आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या साधना आहेत. कला, संगीत यांच्या शिक्षणाने विशेष मुलांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होण्याला मदत होईल. सर्व क्षेत्रांत विशेष मुलांना संधी दिली पाहिजे, हा संदेश देणारा हा कार्यक्रम आहे, असे कौतुकोद्गार राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी काढले.


सावर्डे मतदारसंघात रोजगार निर्माण होण्यासाठी रिजोनियासारखे प्रकल्प झाले पाहिजेत.या प्रकल्पांमुळे विकासाला हातभार लागण्यासह रोजगार निर्माण होतील, असे प्रतिपादन माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी केले. विशेष मुलांमध्ये कोणतीच कमतरता नसते. त्यांच्यामध्ये वेगळीच ऊर्जा असते. त्यांची कला पाहिल्यानंतर बरेच काही शिकायला मिळते, असे आमदार कृष्णा साळकर यावेळी म्हणाले.
देश वेगाने प्रगती करत आहे. रिजोनिया कंपनीने धारबांदोडा येथे सबस्टेशन उभारण्यासाह ४०० केव्हीची वीजवाहिनी उभारली आहे. हा प्रकल्प गोवा आणि देशासाठी मौल्यवान आहे, असे उद्गार रिजोनिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शर्मा यांनी काढले.


देश घडवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक : सभापती
विशेष मुलांची देखभाल घेण्यासाठी आई-वडील बरेच कष्ट घेत असतात. विशेष मुलांमध्येही कला असतात, क्षमता असते. समाज व देश घडवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक असते. विशेष मुलांना संधी मिळाली तर समाज व देशासाठी ते बरेच काही करू शकतात, असे मत सभापती गणेश गावकर यांनी मांडले.
विशेष मुलांची कला पाहून आम्हाला वेगळाच आनंद झाला. विशेष मुलांमध्ये कला आणि गुणवत्ता असते, हे या कार्यक्रमातून दिसून आले. अशा मुलांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे.
_ सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री

हेही वाचा