बॉलिवुडचा ‘पप्पू पेजर’ सतीश कौशिक यांचे निधन

|
09th March 2023, 11:04 Hrs
बॉलिवुडचा ‘पप्पू पेजर’ सतीश कौशिक यांचे निधन

बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक सतीश कौशिक यांनी या जगाचा निरोप घेतला असला तरी चित्रपट विश्वातील त्यांच्या योगदानासाठी ते सदैव स्मरणात राहतील. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून त्यांनी खूप ओळख निर्माण केली. त्यांनी जवळपास ४० वर्षे लोकांचे मनोरंजन केले. एवढा लांबचा प्रवास करणे त्यांच्यासाठी इतके सोपे नव्हते.
सतीश कौशिक यांनी दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. कॉलेज सोडल्यानंतर, ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अँड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीटीआय) मध्ये सामील झाले, कारण त्यांना अभिनेता व्हायचे होते. मात्र, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला.
केवळ ८०० रुपये घेऊन गाठलेली मुंबई
अभिनेता होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सतीश कौशिक दिल्लीच्या करोलबागहून मुंबईत आले तेव्हा त्यांच्या खिशात फक्त ८०० रुपये होते. या पैशांसह ते मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीने खूप नाव कमावलेच, पण त्या ८०० रुपयांचे रूपांतरही त्यांनी कोटींमध्ये केले. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या जवळपास ५० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
पहिला दिग्दर्शकीय चित्रपट ठरला ‘डिझास्टर’
सतीश कौशिक यांनी १९८३ मध्ये आलेल्या ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर ते त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या मासूम चित्रपटातही दिसले. याशिवाय त्यांनी एकापेक्षा जास्त हिट चित्रपटांमध्ये काम केले. आणि त्यानंतर १९९३ मध्ये त्यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. हा चित्रपट अनिल कपूर आणि श्रीदेवी यांना घेऊन बनवण्यात आला होता. मात्र, सतीश कौशिक यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच चित्रपट ‘डिझास्टर’ ठरला.
बोनी कपूर यांची मागितली माफी
सतीश कौशिक यांच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट बोनी कपूर यांनी तयार केला होता. त्याचवेळी, चित्रपट रिलीज झाल्यानंतर २५ वर्षांनी, २०१८ मध्ये सतीश कौशिक यांनी बोनी कपूर यांची माफी मागितली. त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, “होय, २५ वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर एक ‘डिझास्टर’ झालेले. ते माले पहिले ‘मुल’ होते आणि नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहील. श्रीदेवी मॅडमला मिस करत आहे आणि बोनी कपूर यांची मी माफी मागतो ज्यांनी मला ब्रेक दिला.
सतीश यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. १९७२ मध्ये त्यांनी दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या पश्चात पत्नी शशी आणि ११ वर्षांची मुलगी वंशिका कौशिक असा परिवार आहे.