म्हापसा मार्केटमध्ये तंबाखूजन्य पदार्थ जप्त

पालिकेकडून दुकान सील; पोटमाळ्यावर सापडले घबाड

|
30th January 2023, 11:58 Hrs
म्हापसा मार्केटमध्ये तंबाखूजन्य पदार्थ जप्त

म्हापसा मार्केटमध्ये दुकानाच्या पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थ. 

प्रतिनिधी। गोवन वार्ता             

म्हापसा  : येथील बाजारपेठेत मार्केट सबयार्डच्या प्रवेशद्वाराजवळ एका स्वीट मार्टच्या पोटमाळ्यावर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थ म्हापसा पालिकेने छापा मारून जप्त केला. सदर दुकान सीलही करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी उशिरा प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, नगरसेवक विराज फडके, पालिका  निरीक्षक नरसिंह राटवड यांनी ही कारवाई केली.            

सार्वजनिकस्थळी तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास कायद्याने गुन्हा आहे. तरीही पालिका मार्केटमध्ये सर्रासपणे या पदार्थाची विक्री केली जाते. दुकानाच्या पोटमाळ्यावर साठवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थ सापडल्याने यास दुजाेरा मिळत आहे. सिगरेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांचा यात समावेश आहे. पालिकेकडून या मालाची गोळाबेरीज केली नसली तरी हा माल लाखाच्या घरात असू शकतो. यासंदर्भात म्हापसा पालिकेकडून मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार आहे.              

पालिकेचे मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर म्हणाले, मार्केटमध्ये अतिक्रमाणावर आम्ही अचानक कारवाई मोहीम राबवली होती. यावेळी काही ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार आम्ही सदर माल जप्त केला. एका स्वीट मार्टच्या शेजारी एकजण तंबाखूजन्य पदार्थ विकत होता. चौकशीवेळी दुकानाच्या पोटमाळ्यावर तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवल्याचे समजताच हा संपूर्ण माल जप्त करून दुकानाला सील ठोकले आहे.