लोकनेता होण्यासाठी

या संपूर्ण यात्रेत काँग्रेसने राहुल गांधी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी स्वतःला बदलण्यासाठी केलेला हा प्रयोग किती यशस्वी झाला हे पुढे कळेल. पण विरोधी पक्षांमधून एक देशव्यापी चेहरा होण्यासाठी जे करण्याची गरज होती, त्यात काही प्रमाणात का होईना काँग्रेस सफल झाली आहे.

Story: अग्रलेख |
30th January 2023, 11:02 pm

गेल्यावर्षी ७ सप्टेंबरला सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप झाला. पाच महिने ही यात्रा देशभर सुरू होती. कन्याकुमारी ते काश्मीर असा राहुल गांधी यांनी पायी प्रवास करत भारत जोडो यात्रा पूर्ण केली. रथ, सायकल, वाहनांमधून होणाऱ्या यात्रा आणि पायी चालत अनेक गाव, शहरे, राज्ये फिरून सुमारे ४ हजार किलोमीटर चालून पूर्ण करण्यात आलेली यात्रा यात बराच फरक आहे. या यात्रेतून काँग्रेसला काय मिळाले किंवा मिळणार त्यापेक्षाही देश समजून घेण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेली पदयात्रा फार महत्त्वाची आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना मिळालेला लोकांचा पाठिंबा, लोकांचा सहभाग त्यांना राजकीयदृष्ट्या अजून परिपक्व करण्यासाठी मदत करेल यात शंका नाही. राहुल गांधी यांच्या यात्रेत भाजप आणि मोदी यांच्या राजवटीच्या विरोधातील अनेकांनी हात धुऊन घेण्याचा प्रयत्नही केला. पण कशाचाच परिणाम राहुल गांधी यांनी आपल्यावर करून घेतला नाही. १२ राज्ये, दोन संघ प्रदेश, ७५ जिल्हे, सुमारे शंभर सभा, १३ पत्रकार परिषदा, चालताना २७५ पेक्षा जास्त नियोजित संवाद, १०० पेक्षा जास्त बैठकांमधून त्यांनी लोकांशी तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधला. त्यांच्या सुरक्षेबाबत अनेकदा वाद निर्माण झाले. काश्मीरमध्ये पंधरा मिनिटे सुरक्षाच नव्हती, अशा प्रकारचा प्रसंगही आला. देशाने यापूर्वी अनेकदा रथयात्रा वगैरे पाहिल्या आहेत. मोठमोठे रोड शो पाहिले, पण पायी चालत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडोसारखी यात्रा करण्याचा संकल्प पूर्ण करून देशातील राजकीय पटलावर पुन्हा नव्या चर्चेतून काँग्रेस समोर आली. त्याचे फळ काँग्रेसला कधी मिळते ते पहावे लागेल.      

एका बाजूने भारत जोडेची पायी यात्रा आणि दुसऱ्या बाजूने काही राज्यांमधील निवडणुका झाल्या. अन्य काही राज्यांमध्ये आता निवडणुका होणार आहेत. भाजपसह इतर राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या राज्यांमधील विधानसभा, पालिका निवडणुंकावर लक्ष केंद्रित केलेले असताना राहुल गांधी यांनी या कालावधीत आपली भारत जोडो यात्रा पूर्ण करण्यावर लक्ष दिले. २०१४ आणि २०१९ मध्ये काँग्रेसला जनतेने सलगपणे नाकारल्यानंतर २०२४ मधील लोकसभा निवडणूक काँग्रेसला अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. काळाच्या ओघात एकदा राजकीय पक्ष मागे पडला तर तो पुन्हा उभा करणे हे नवा पक्ष स्थापन करण्यासारखेच कठीण काम असते. काँग्रेसला काळाच्या ओघात मागे न ढकलता पुढे नेण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद चांगला मिळाला असला तरी त्याचे परिणाम निवडणुकांमध्ये दिसतील का, ते पाहणे महत्त्वाचे आहे. लोकसभेत काँग्रेसकडे फक्त ५२ जागा आहेत. जागांप्रमाणे भाजपची टक्केवारी ५६ टक्के इतकी आहे. त्यामुळे इतर सर्व पक्षांपेक्षा जागांच्या टक्केवारीत भाजप पुढे आहे. फक्त भाजपला त्याचे मित्र पक्ष सोडून जात असल्यामुळे अशा गोष्टींचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. भारत जोडोला विरोधी पक्षांपैकी अनेकांनी पाठिंबा दिला असला तरी निवडणुकीच्या दरम्यान हे सगळे विरोधी पक्ष एकत्र येतील का, हाही एक जटिल प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी एक सूचक प्रतिक्रिया भारत जोडो यात्रा संपताना दिली. ‘ही यात्रा मी माझ्यासाठी किंवा काँग्रेससाठी काढलेली नाही, ही देशातील जनतेसाठी आहे. देशाचा पाया उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात उभे राहणे हाच आपला उद्देश आहे,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

कुठलाही बडेजावपणा न दाखवता राहुल गांधी यांनी ही यात्रा पूर्ण केली. यात्रेत अनेकदा त्यांच्याकडून राजकीय विधाने मिळवण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न केला पण त्यांनी राजकारण टाळले. राजकारण वगळून इतर अनेक विषयांवर राहुल गांधी बोलले. यात्रेच्या समारोपावेळी मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. या संपूर्ण यात्रेत काँग्रेसने राहुल गांधी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी स्वतःला बदलण्यासाठी केलेला हा प्रयोग किती यशस्वी झाला हे पुढे कळेल. पण विरोधी पक्षांमधून एक देशव्यापी चेहरा होण्यासाठी जे करण्याची गरज होती, त्यात काही प्रमाणात का होईना काँग्रेस सफल झाली आहे. ब्रँडिंगसाठी पैसाही पाण्यासारखा खर्च करावा लागतो, पण तसे ब्रँडिंग करणे काँग्रेसला जमलेले नसले तरीही यात्रेदरम्यान लोकांमध्ये मिसळून लोकांशी संवाद साधण्याऱ्या राहुल गांधी यांच्या लोकनेता होण्याच्या कल्पनेमुळे सध्या सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे आहेत.