जीवनाने निराश केले तरी हार न मानणार्‍या शांता लागू

आपले शरीर जेव्हा आपल्यासोबत असते तेव्हा आपण कितीही काम करू शकतो पण जेव्हा एखाद्या अपघाताने शरीरावर आणि मनावर आघात होतो आणि शरीर साथ द्यायचे सोडते, तेव्हा आपले तेच काम चालू ठेवण्यासाठी मनात प्रचंड जिद्द लागते. एकीकडे शरीराच्या वेदना सांभाळताना आपले काम सांभाळत जिद्दीने परत आपले विस्कटलेले जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.

Story: तू चाल पुढं |
27th July, 04:10 am
जीवनाने निराश केले तरी हार न मानणार्‍या शांता लागू

लेखिका शांता लागू यांची कहाणी ही अशीच आहे. मराठी/संस्कृत विषय घेऊन एम.ए. ची पदवी घेतलेल्या शांताताई यांना कॉलेजमध्ये असतानाच साहित्य लेखनाची भारी आवड होती. गोव्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात अनेक सदरे लिहीत असतानाच पुस्तक परीक्षण करण्याचे त्यांचे कामही चालू होते. त्याच बरोबर कथा, कविता लिहिणे हे ही चालू होते.

सर्व काही सुरळीत चालू असताना ३ मार्च २०१५ रोजी त्यांच्या “ आरसा बिलोरी “ या विडंबन काव्य आणि चारोळ्याच्या पुस्तकाचे प्रकाशन माजी कायदा मंत्री श्री. रमाकांत खलप यांच्या हस्ते होणार त्या दोन दिवस आधी म्हणजेच १ मार्च रोजी घरातच वयाच्या ६२ व्या वर्षी त्या घसरून पडल्या आणि त्यांचा पाय अक्षरश: उलटा झाला आणि मांडीचे हाड मोडले. त्यामुळे ऑपरेशनची पाळी ओढवली आणि मांडीत दोन सळया आणि चार स्क्रू असलेली फ्रेम घालावी लागली.

चार-पाच महिने झाल्यावर त्या वॉकर घेऊन चालू लागल्या. परंतु परत दुखायला लागल्यावर फ्रेम तुटल्याचे निमित्त झाले. या दरम्यान त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या. परंतु या दरम्यान त्यांना कायमचा बिछान्याचा आधार घ्यावा लागला. त्यांना उठून बसणे ही मुश्किलीचे होऊन बसले. तरीही त्यांनी हार मानली नाही. आयुष्याच्या संध्याकाळी शरीरावर झालेला आघात हा प्रचंड वेदना देणारा होता, तरीही त्यांनी मनाची उभारी कायम ठेवत आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड दिले. लिहायची आवड रक्तात भिनल्याने उठायला होत नसले तरीही झोपूनच पोटावर पॅड ठेवून त्या लिहू लागल्या. आपल्या वेदना त्यांनी लिहित्या होताना झटकून टाकल्या आणि नव्या उमेदीने आलेल्या कठीण प्रसंगाला सामोरे गेल्या. त्यांनी लिहिलेले हे लिखाण अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत राहिले.

शरीरावर झालेला आघात हा एव्हढा मोठा होता की त्यानंतर त्या साहित्याच्या क्षेत्रात बाहेर वावरू शकल्या नाहीत. याची खंत त्यांच्या मनात असली तरी लेखन मात्र चालू राहिले, हा आनंद ही त्यांना मानसिक आधार देऊन गेला. याच लेखनाने त्यांनी जीवनातील ऊर्जा आणि आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. ज्या पुस्तकाचे प्रकाशन व्हायाच्या आधी दोन दिवस त्यांच्या वर हा बिकट प्रसंग ओढवला, त्या पुस्तकाचे प्रकाशन पुढे रद्द झाले पण त्यांच्या या विडंबन काव्य पुस्तकासाठी आचार्य अत्रे प्रतिष्ठान पुणे यांचा विडंबनकार आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाला.

जगी सर्व सुखी असा कोण आहे ? असे सांगताना शांता ताई म्हणतात , “ प्रत्येकाच्या वाट्याला आलेले दु:ख हे वेगवेगळे असते. प्रत्येक जण आपापल्या आघाडीवर लढत असतो. लढाईत जसे हातातले शस्त्र टाकून चालत नाही, तसेच जीवनाच्या लढाईत ही हातातले शस्त्र टाकून चालत नाही.” आणि त्यांनी हे अक्षरश: खरे करून दाखवताना आपल्या हातातील शस्त्र म्हणजे आपल्या लेखणीला कधीच विराम दिला नाही. साहित्य हे आपल्याच विचारांचे प्रतिबिंब असते असे मानणार्‍या शांताताई आपल्या साहित्यातून समाजाला काहीतरी चांगले देण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलेल्या आहेत.

शांताताई यांच्या एकूण चार कविता, एक विडंबनाचे भारुड, एक अभंग यांची गीते झाली आहेत. त्यातील एक प्रेमगीत “ कोलाज “ या अल्बममध्ये गेले असून द्वंदगीत सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. बाकीची गीते, भारुड, अभंग गीता गद्रे या गायिकेने गायिली आहेत.

आता या घटनेला दहा वर्षे झाली असून शांता ताई आता आधाराने उठू शकतात. वॉकर घेऊन चालू शकतात. साहित्याचा दर्जा राखण्यासाठी, मराठी भाषेचे रक्षण करण्यासाठी भाषेचे जतन आणि संवर्धन आपणच करायला हवे. वाचकांना चांगले वाचायला मिळाले तर वाचक नक्कीच वाचतात. अंतःकरणापासून लिहिले तर ते नक्कीच दर्जेदार लिखाण होते असे मनोमन मानणार्‍या शांताताई शरीर साथ देत नसले तरी ही आज वयाच्या ७२ व्या वर्षीही सातत्याने लेखन करत आहेत. त्यांच्या या लिखाणाला सलाम.


कविता प्रणीत आमोणकर, रावणफोंड, मडगाव