ड्रग्जविना सनबर्न आयोजित करण्यात कोण कमी पडतेय?

Story: अंतरंग |
25th July, 12:02 am
ड्रग्जविना सनबर्न आयोजित करण्यात कोण कमी पडतेय?

सनबर्नच्या आयोजकांकडून वेबसाइटवर जाहिरात देऊन आगाऊ तिकीट विक्री सुरू केली. त्यातच दक्षिण गोव्यात किटल येथील जागेवर मागितलेली परवानगी पण आयडीसीने नाकारल्याचे सांगण्यात आले. पण एकंदरच दक्षिण गोव्यातील लोकांच्या विरोधाची किनार पाहता या महोत्सवातील ड्रग्जची देवाणघेवाण हाच मुद्दा मुख्य असल्याने राज्यात ड्रग्जवरील कारवाईत पोलीस कमी पडतात का? ड्रग्जविना महोत्सव होत असल्यास त्याला कुणाची हरकत असू नये, पण हा विश्वास देण्यात राज्य सरकार, पोलीस प्रशासन कमी पडतेय का? हा प्रश्न साहजिकपणे पुढे येत आहे.

दक्षिण गोव्यात सनबर्न होणार असल्याचे जाहीर होताच दक्षिणेतील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. सनबर्न हा संगीत महोत्सव नसून ड्रग्ज महोत्सव असल्याचे संबोधत नागरिकांच्या विविध गटांकडून निदर्शने करण्यात आली. आता विविध ग्रामसभांमधून सनबर्नला विरोध असल्याचे ठराव संमत केले जात आहेत. याआधी अॅड. राधाराव ग्रासियस यांनी दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजित करून लोकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये, असा इशारा सरकारला दिला होता. तसेच हा महोत्सव गुजरातला नेण्याची मागणीही केली होती. त्यानंतर दक्षिणेसह उत्तर गोव्यातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे समाजमाध्यमांवर व्यक्त होत सनबर्नला विरोध दर्शवलेला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दक्षिण गोव्यातील नागरिकांनी एकत्र येत आंदोलनही करत ड्रग्जशी संबंध असणारा सनबर्न नको, असे सांगितले. 

यावेळी आपच्या नेत्यांनी या निदर्शनाला पाठिंबा दिला होता. तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांना निवेदन सादर करत सनबर्नसाठी परवानगी जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही अटी-शर्थीवर देण्यात येऊ नये. परवानगी न घेता तिकीट विक्री केली जात असल्याने आयोजकांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.

कुडतरी, काणा बाणावली, आंबेली, वेळ्ळी, चांदर, तळावली या ग्रामपंचायतींकडून सनबर्न विरोधात ठराव संमत करण्यात आले आहेत. कुडतरी ग्रामसभेतही सनबर्न विरोधात काँग्रेस नेते मरिनो रिबेलो यांनी मत मांडले. त्यावेळी आयडीसीचे अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्याशी रिबेलो यांचा शाब्दिक वादही झाला. रेजिनाल्ड यांच्याकडे सनबर्नबाबत स्पष्टीकरण मागितले होते. आता रेजिनाल्ड यांनी सनबर्नसाठी आयडीसीकडे परवानगी मागण्यात आलेली होती, पण ती मंडळाने दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सनबर्नचा विषय आला असता संगीत महोत्सवाला विरोध नाही पण त्या संगीत महोत्सवाच्या आडून होणारे ड्रग्ज व इतर अवैध धंदे यामुळे युवा पिढीला धोका असल्याचे सांगत सनबर्न विरोधात ठराव संमत करण्यात आलेले आहेत.

शांत अशा दक्षिण गोव्यात सनबर्न आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत काँग्रेस व आपच्या नेत्यांनीही सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. ड्रग्जच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठीच हा महोत्सव गोव्यात होत असल्याचा आरोप माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी करत ड्रग्जवर बंदी घालण्यात आल्यास या महोत्सवाला कुणीही येणार नसल्याचे म्हटले आहे. लोकांचा ड्रग्जला विरोध असल्याने सरकारने ड्रग्जवरील कारवाई कडक केल्यास संगीत महोत्सवाला विरोध होणार नाही. नाहीतर यापुढेही जागा बदलली तरी हा विरोध सुरू राहील. पण दरवर्षी लोकांच्या विरोधानंतरही सनबर्नला उशिरा परवानगी मिळते व महोत्सवही होतो, असे २०१२ पासून सुरू आहे. त्यामुळे यावेळी परवानगी मिळेलच असे आयोजकांचे मत आहे. पण सनबर्न ड्रग्जविना होणार याची हमी लोकांना देणार कोण, हा प्रश्न कायम राहतो.


अजय लाड, 

(लेखक दै. गोवन वाार्तचे दक्षिण गोवा ब्युरोचिफ  आहेत.)