तडजोड - जगण्याची गुरुकिल्ली

तडजोड करणं यात कमीपणा नाही तर निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. फक्त कधी वाकायचं आणि कधी ताठ उभं राहायचं हे कळलं पाहिजे. तडजोड हा उत्तम मार्ग असला तरी तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे.

Story: मनातलं |
27th July, 03:05 am
तडजोड - जगण्याची गुरुकिल्ली

पल्यापैकी प्रत्येकाला जीवनात नेहमीच सुखाचे क्षण असावेत असं वाटत असतं. आणि ते मिळवण्यासाठी आहे त्या परिस्थितीवर मात करत तडजोड करत नवीन मार्ग शोधत जीवन प्रवास हा सुरूच ठेवावा लागत असतो. परिस्थितीशी जुळवाजुळव ही करावीच लागते. ती  कुठल्या स्वरूपातली असेल सांगता  येत नाही. काही जण ती मनापासून करतात तर काहींना मनाविरुद्ध करावी लागते. असं म्हणतात जीवनाच्या वाटेत जिथे तडा जाईल असे वाटते तिथे जोड देणे म्हणजे तडजोड स्वीकारणे होय. येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत पुढे मार्गक्रमण करायचं असेल तर थोडं तुझं थोडं माझं असं म्हणत एकमेकांना सावरून घेत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणत वाटचाल केली की ती वाट सहज सोप्पी होते. कधी कधी एका घरात राहूनही नाही जुळत दोघांचे स्वभाव.  एकाला अति स्वच्छता  लागते तर दुसऱ्याला अघळ पघळ पसारा घालायला आवडतो. अशावेळी दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत भांडणाला आमंत्रण देण्यापेक्षा जे काही आहे ते तडजोड करत स्वीकारलं पाहिजे. दोघांनी आपल्या दिशेने एक पाऊल  पुढे टाकलं की कुठेतरी तो पॉइंट येतो जिथे दोघांची मते आणि मने जुळतील. पण त्यासाठी स्वत:मध्ये बदल करायची इच्छा आणि तडजोड करायची तयारी असली पाहिजे. कधी कधी या तडजोडी आपोआप जुळून येतात तर कधी कधी त्या मुद्दाम घडवून आणाव्या लागतात. तडजोड ही तेवढ्या काळापुरती मनाने केलेली सोय किंवा समन्वय असतो. अशावेळी मनातल्या अहंकाराला बाजूला ठेवता आलं पाहिजे. 

आजकालची तरुण पिढी पाहता आयटी क्षेत्रामुळे जगाच्या कुठल्या कुठल्या भागात जाऊन सेटल झालेली दिसतात. तिथले हवामान थंडी, बर्फ, वादळवारा,तिथली राहायची पद्धत, खायची पद्धत आशा प्रत्येक गोष्टीत त्यांना तडजोड करावी लागते. जिथे राहतो तिथली भाषा थोडीफार तरी शिकून घ्यायला हवी. ज्या प्रमाणे ते पूर्वीचे जीवन जगत होते तसे जगणे शक्य होत नाही, पण स्वत:च्या प्रगतीसाठी त्यांनी ती स्वेच्छेने स्वीकारलेली तडजोड असते. त्यातही एक आनंद असतो. म्हणून ती बाधक वाटत नाही. आपल्या वयाप्रमाणे प्रत्येकाने आपल्या राहणीमानात ही अशी तडजोड स्वीकारली पाहिजे. चाळीशीनंतर चश्मा किंवा वयामुळे दातांना कवळी बसवणे, गुडघेदुखी किंवा पायाच्या प्रॉब्लेममुळे  नीट चालता येत  नसेल तर काठीचा  आधार घेणे अशा गोष्टींबद्दल लाज बाळगून  चालत नाही त्या तडजोडीत सोय महत्त्वाची ठरते. कधीकधी कामाच्या ठिकाणी टीम वर्कला  महत्त्व असतं. अशावेळी स्वत:ची मते बाजूला  ठेवून यश मिळण्यासाठी फायदा होण्यासाठी थोडीफार तडजोड करावीच लागते. पण तडजोड करणे म्हणजे समर्पण करणे असे म्हणणे चुकीचे ठरेल. तडजोडीत थोडी त्यागाची भावना असते पण पूर्णपणे समर्पण नसावे. मनाविरुद्ध जर तडजोड स्वीकारली गेली असेल तर मनात तो रोष तसाच धुमसत राहतो. 

समाधानकारक  उपाय शोधण्यासाठी आपण तडजोड करायला तयार होतो, एकत्र काम करायला तयार होतो पण त्यासाठी काही तरी सोडून द्यायला आपण तयार असतो.  हे कधीकधी एक तर्फी असू शकते. तडजोड एकानेच करून चालत नाही. दोन्ही बाजूने सारखाच प्रतिसाद यावा लागतो. परस्पर व्यवहार असेल किंवा द्या आणि घ्या अशा स्वरूपातली असेल तेव्हाच ती यशस्वी होते. नातेसंबंधातली तडजोड ही बरेच वेळा  राग आणणारी असू शकते. विशेषतः जर एक व्यक्ति दुसऱ्या व्यक्तिपेक्षा जास्त तडजोड करत असेल तर. 

एकानेच  जास्त त्याग केला आहे हे बघून त्याला मनातून दुख होते. संताप येतो नातेसंबंध तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. लग्नापूर्वी संध्याला चित्रकलेची अतिशय आवड होती पण लग्नानंतर तिने संसारात पडल्यावर पाहिलं घरातल्या कुणाला किंवा नवऱ्यालाही चित्रकलेची अजिबात आवड नाही, तिने चित्रं काढण्यात वेळ घालवलेला आवडत नाही त्यावरून घरात भांडणे होतात,  त्यामुळे तिने आपल्या या आवडत्या छंदाला कायमचे बंदिस्त करून टाकले पण तिच्या मनात तो रोष किंवा  ते दु:ख तिला सतत टोंचणी लावत असे. तिने केलेली तडजोड ही जबरदस्तीची ठरल्याने मनात रोष राहिला. जिथे व्यक्तीचा आदर, मानसन्मान टिकून राहत असेल तिथे तडजोडीची किंमत वाढते. आपल्या जोडीदाराला गाण्याची आवड असेल तर त्याच्या या गुणाला प्रोत्साहन मिळाले तर त्याची किंवा तिची आवड जोपासली जाईल हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी तिलाही थोडी तडजोड करावी लागेल त्यालाही तिला सांभाळून घ्यावे लागेल. तिथे दोघेही गायक असतील तर आपला आपला इगो बाजूला ठेवत एकमेकांच्या गुणांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे. दोघांच्या आवडीनिवडी सेमच असतील असे होत नाही. त्याला समुद्रावर किंवा मोकळ्या हवेत फिरायला जायला आवडत असेल आणि तिला चित्रपट पाहायची आवड असेल तर दोघांनी एकमेकांसाठी तडजोड करत काहीतरी सोल्यूशन शोधून काढले पाहिजे तर दोघांचा संसार सुखाचा होईल. तडजोड म्हणजे दृष्टिकोण बदलणे, काहीतरी तोडगा काढणे. विवाह असुदे की, कौटुंबिक जीवन तिथे तडजोड म्हणजेच आयुष्य असं समीकरण ठरतं, कारण इथे गरज असते ती स्वत:सोबत इतरांनाही समजून घेण्याची. प्रत्येक माणूस हा काही परिपूर्ण नसतो काही न काही न्यूनता प्रत्येकात असतेच तिला समजावून घेत जगणं इथे खरा कस लागतो आपल्या तडजोडीचा.  आपला जन्म कुठे कुठल्या घरात कुठल्या वातावरणात झाला  या मुळेही आपल्या जीवनात तडजोडीची गरज पडू शकते. 

प्रत्येक तडजोडीची व्याख्या वेगळी असते. कधी कुठल्या कुटुंबात अपंग व्यक्ति असू शकते, कधी खास मूल जन्माला येतं अशा वेळी घरातल्या सगळ्याच जणांना आपल्या आपल्या बाजूने तडजोड करावी लागते तिथे काही पर्याय नसतो. आपल्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात बदल घडवणारी तडजोड कधी कधी स्वीकारावी लागते. दोन भिन्न धर्म असणाऱ्या व्यक्तींनी लग्नगाठ बांधली तर तिथे त्यांच्या धर्माप्रमाणे वागावं लागतं ही तडजोड स्वीकारवीच लागते. जे आहे ते गॉड मनात पुढच्या दिवसाची वाट बघणं म्हणजे एक प्रकारे आपल्या इच्छा-आकांक्षांची भविष्याशी केलेली तडजोड असते. तडजोड करणं यात कमीपणा नाही तर निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. फक्त कधी वाकायचं आणि कधी ताठ उभं राहायचं हे  कळलं पाहिजे. तडजोड हा उत्तम मार्ग असला तरी तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे.


प्रतिभा कारंजकर, फोंडा.