गोव्यातील मृदेचे बिघडते आरोग्य

आपल्या पूर्वजांनी मातीत सृजनत्वाचा साक्षात्कार अनुभवला होता आणि त्यासाठी बहुप्रसवा म्हणून मातीच्या ठायी मातृशक्तीचे दर्शन घेतले होते. आज मातीकडे पाहण्याची ही दृष्टी आणि आपल्या समाजाची धारणा बदलत असल्याने, मृदेचे आरोग्य संकटग्रस्त झालेले आहे. याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर सिमेंट काँक्रिटच्या वाळवंटात संघर्ष करावा लागेल.

Story: विचारचक्र |
24th July, 12:31 am
गोव्यातील मृदेचे बिघडते आरोग्य

वृक्षवल्लीच्या भरणपोषणाच्या दृष्टीने त्या त्या प्रदेशातील मृदा महत्त्वाचे कार्य बजावत असते आणि त्यासाठी भारतीय धर्म-संस्कृतीने मातीला आपल्या अस्तित्वाचा पोषक घटक मानला आणि त्यामुळे मृण्मयी सांतेर त्यांनी शक्तिरुपिणी सृजनत्वाचे रूप म्हणून पुजले. दक्षिण भारताल रेणुका तसेच यल्लम्मा, गोवा-कोकणात सातेरी, भूमका, माऊली म्हणून मृण्मयी वारुळाचे पूजन इथल्या लोकमानसाने शेकडो वर्षांपासून केले आणि मातीतल्या सजीव तत्वाविषयीचा उत्कट आदरभाव व्यक्त केलेला आहे, परंतु असे असताना आज भारतभरातून मातीतले सृजनत्व लोप करण्याचे एकूण प्रकार वाढत चाललेले आहेत. जागतिक पातळीवर आज वाळवंटीकरण सक्रिय असून, सुजलाम सुफलाम् म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या देशाचे वाळ‌वंट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, ही खरेतर गंभीर चिंतेची बाब आहे. वाळवंटीकरणाची प्रक्रिया थोपवण्यासाठी आज प्राधान्यक्रमाने प्रयत्न करण्यात आम्ही अपयशी ठरलो तर वर्तमान आणि आगामी काळात पेयजलाबरोबर इथे अन्नधान्यांसह फळे, फुले मिळणे दुरापास्त होईल, यात तिळमात्र शंका नाही.

आपल्या भारतीय लोकमानसाने मातीधारण‌ करणाऱ्या धरित्रीला भूमाता म्हणून सनातन काळापासून पाहिले आणि तिच्यातले सृजनत्व जोपासण्यासाठी आणि जोजवण्यासाठी अश्विन नवरात्रातल्या उत्सवांच्या माध्यमातून सांगड घातली. परंतु आज मातीतल्या सृज‌नशक्तीला नष्ट करण्याचे उपद्‌व्याप आपण आरंभलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी निरंतरपणे जलसिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी देशभर महाकाय धरणांची, जलाशयांची साखळी निर्माण केली. त्यासाठी हरित क्रांतीची साथ धरली. जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या अन्नधान्यांच्या प्रजातींची लागवड यशस्वी व्हावी यासाठी तृणनाशक, कीटकनाशक, रासायनिक खतांचा अनिर्बंधपणे वापर आरंभला. कालवे, पाटातून शेती, बागायतीची जमीन ओलिताखाली आणण्यासाठी धरणाचे पाणी सतत खेळते ठेवले. या साऱ्या प्रकारामुळे देशाला अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्णता साध्य करता आली, परंतु एकंदर आम्ही आरंभलेल्या कृत्रिम उपाययोजनांमुळे मातीचे आरोग्य मात्र दिवसेंदिवस बिघडत गेले. पिढ्यानपिढ्या गाईगुरांच्या शेणाचा, वृक्षवेलींच्या पालापाचोळ्याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करून सकस, पौष्टिक अन्नाची निर्मिती करणाऱ्या आपल्या भूमीतल्या लोकांना प्रदूषित अन्न खाऊन कर्करोगासारख्या असंख्य रोगांची शिकार होण्याची पाळी आली. कधी नव्हे असे बरेच प्राणघातक रोग आज सजीवांच्या अस्तित्वावर घाला घालण्यास सिद्ध झाले. त्याला वारेमाप रासायनिक खते आणि तण-कीटकनाशकांचा वापर कारणीभूत ठरलेला आहे. आसुरी वृत्तीने भूमीकडे पाहण्याच्या आमच्या एकंदर मानसिकतेमुळे मातीत क्षारतेचे प्रमाण वाढत जाऊन ती नापिक होण्याच्या मार्गावर पोहचलेली आहे. मातीत सोडियमची मात्रा वृध्दिंगत होऊन मातीचे आरोग्य सध्या बिघडत चालले आहे.

सुफलाम् मातीचा थर निर्माण होण्यासाठी निसर्गाला जव‌ळपास आठशे वर्षांचा कालखंड लागतो, तर रासायनिक खते, कीडनाशकासारख्या तत्सम बाबींचा आणि वारेमाप जलसिंचनाच्या सुविधेमु‌ळे ही माती निकामी होण्याला केवळ एक दोन दशकांचा काळ पुरेसा ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे सजीवांच्या अस्तित्वासाठी मातीचे संरक्षण करण्याची गरज आहे. पृथ्वीवरील ९५ टक्के अन्नधान्य मातीद्वारे निर्माण होत असते, तसेच मातीतच एकूण सजीवांपैकी २५ टक्के सजीव आश्रय घेत असतात. भाजीपाला, फळे आदी अन्नघटकांची गुणवत्ता ठरवण्यास मातीतील गुणवत्ता कारणीभूत ठरते. पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवण्यास मातीत वास्तव्यास असणारे जीव सतत सक्रिय असतात. 

मातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यावरणस्नेही जीवनपद्धतीचा स्वीकार करणे महत्त्वाचे असून, शेती आणि बागायतीची उत्पादन समता वृद्धिंगत करण्यास सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे. प्लास्टिक, रबर, बॅटरीसारख्या कचऱ्याची विल्हेवाट जबाब‌दारीने लावण्याची गरज आहे. मातीतल्या क्षारतेचे प्रमाण रोखण्यास उपाययोजना केली तरी तिच्यातली उत्पादन क्षमता टिकवणे शक्य आहे. गोव्यातल्या लोकमानसाने चिखलाचा आणि जांभा खडकाचा नियोजनबद्ध वापर करून इथल्या कष्टकऱ्यांनी बांध घालून सागराच्या भरतीचे पाणी शेतात येण्याचे रोखून, खाजनशेतीची जोपासना केली होती. आज खाजनशेतीची परंपरा तोडून, गोव्यात जास्त पैसे कमवण्यासाठी ठिकठिकाणी कोळंबी पैदासीला प्राधान्य दिले जात आहे. शेती करण्याऐवजी कोळंबी, मासे पैदासी लाभदायक ठरत असल्याची धारणा, खाजनशेतीच्या सुपिकतेला आव्हान देण्यास सिद्ध झालेली आहे. आज मातीतल्या जैवविविधतेचे रक्षण करण्याबरोबर तिच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरलेल्या घटकांना रोखणे महत्त्वाचे आहे. चवळी, कुळीथ, उडीद यासारख्या कडधान्यांची पैदासी केल्याने, मातीतली मृदा संरक्षणात पोषण तत्वे टिकू शकतात आणि त्यासाठी पर्यावरणस्नेही जीवन पध्दतीचे अवलंबन गरजेचे आहे. 

मृदेचे बिघडते आरोग्य ही गोव्यासारख्या छोट्या राज्यासमोर आ वासून उभी असलेली गंभीर समस्या आहे. एकेकाळी डोंगर उतारावर, माळरानावर धान्याच्या दाण्यांची केवळ पेरणी झाल्यावर मुबलक प्रमाणात धान्याची पैदासी व्हायची. त्याला तेथील जमिनीत असलेले सुपिकतेचे गुणधर्म कारणीभूत होते. परंतु आज आपण ठिकठिकाणी प्लास्टिक, रबर, थर्माकोल, ग्लाससारख्या कचऱ्याला बेशिस्तीने टाकत असल्याने तेथील मृदा नापिक बनू लागलेली आहे. म्हापसा शहरात भाविकांच्या हाकेला धावून येणारा बोडेगेश्वर हा बोडगिणी वनस्पतीच्या बेटाने समृध्द असणाऱ्या आणि बारामाही जलसिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतजमिनीचा अधिष्ठाता देव होता. दरवर्षी भाताची कापणी झाल्यावर उप‌लब्ध होणारे नवान्न येथील कष्टकरी आप‌ण पहिल्यांदा न जेवता, बोडगेश्वराला अर्पण करायचे ते 'जेवणी'च्या विधीद्वारे. आज वृक्षवेलींच्या आणि बारामाही खळखळणाऱ्या निर्झराच्या प्रसन्न करणाऱ्या वातावरणात राहणारा बोडगेश्वर सिमेंट-काँक्रिटच्या वास्तूत सोन्याचा दंड आणि सोन्याची मशाल घेऊन भाविकांचा आकर्षण बिंदू ठरलेला आहे. जत्रा आणि अन्य कार्यक्रमांच्या आयोजनावेळी प्लास्टिकचा जो वारेमाप कचरा इथे टा‌कला जातो, त्यामुळे जमीन खणताना तेथे प्लास्टिक सापडते, म्हणून शेतीची परंपरा खंडित होऊन, शेतजमीन दिवसेंदिवस नापिक होऊ लागली आहे.

गोव्यातल्या गावांत नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान झाल्याकारणाने सिमेंट काँक्रिटच्या बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सांडपाणी, केरकचरा याचे मुळी व्यवस्थापन होत नसल्याकारणाने, त्याच्या प्रादुर्भावाने पिकाऊ जमिनी नापिक होऊ लागलेल्या आहेत. रासायनिक खते, जंतुनाशके, कीटकनाशके यांचा वारेमाप होणारा गैरवापर यामुळे प्रारंभी भरघोस पीक देणाऱ्या शेतजमिनी आपल्यातला सजीवपणा हरवून नापिक होऊ लागलेल्या आहेत. ताळगाव - सांतइनेज भाग नदीच्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे आणि प‌ठारावरून वाहून येणाऱ्या पोषकतत्वांमुळे शेती, भाजीपाला यांच्या लागवडीमुळे कृषीप्रधान होता. आज सुपिक जमीन झपाट्याने गायब होऊ लागली आहे. आपल्या पूर्वजांनी मातीत सृजनत्वाचा साक्षात्कार अनुभवला होता आणि त्यासाठी बहुप्रसवा म्हणून मातीच्या ठायी मातृशक्तीचे दर्शन घेतले होते. आज मातीकडे पाहण्याची ही दृष्टी आणि आपल्या समाजाची धारणा बदलत असल्याने, मृदेचे आरोग्य संकटग्रस्त झालेले आहे, याकडे आपण गांभीर्याने पाहिले नाही तर सिमेंट काँक्रिटच्या वाळवंटात संघर्ष करावा लागेल.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५