जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीचे वारे

Story: राज्यरंग | प्रसन्ना कोचरेकर |
30th January 2023, 10:59 Hrs
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीचे वारे

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या राज्यात मे महिन्यापर्यंत निवडणूक होऊ शकते. भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीद्वारे पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीत राहण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण झाले आहे.      

भाजप व अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी यांच्यात जवळीक वाढली आहे. या दोघांमध्ये आघाडी झाल्यास खोऱ्यात नवे समीकरण दिसू शकते. इतर पक्षही तयारीला लागले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, काँग्रेस हे राजकीय विधानसभा मतदारसंघातील आपापल्या नेत्यांना सक्रिय करू लागले आहेत. निवडणुकीचे वेध लागले असले तरीही राज्यात अद्यापही आघाडीच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट नाही. एनसी व पीडीपी गुपकार आघाडीअंतर्गत निवडणूक लढवण्याबाबत उभय पक्षांचे नेते वक्तव्य करणे टाळू लागले आहेत.      

जम्मू काश्मीरमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून व्यापक प्रमाणात जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनेतून झालेल्या बदलांची माहिती जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जागा जिंकण्यासाठी लोकांची मने जिंकणे आवश्यक आहे, असेही नेत्यांनी सांगितले.      

माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नियमितपणे लहान-लहान सभा घेत आहेत. त्यांची भूमिकाही बदललेली दिसते. भाजपने जम्मूची उपेक्षा केल्याचा राग त्या आळवतात.      

निवडणूक म्हणजे जनतेचा हक्क असल्याचे नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे म्हणणे आहे. त्यामुळे ते निवडणुकीवर बहिष्कार घालू इच्छित नाहीत. उमर अब्दुल्ला निवडणूक लढवतील. पण गुपकार आघाडीबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही.      

राहुल गांधींच्या यात्रेमुळे काश्मिरात काँग्रेसला लाभाची आशा आहे. गुलाम नबी आझाद यांच्या पक्षातून अनेक नेत्यांची परतणी झाल्यामुळे काँग्रेस नेते उत्साहात दिसून येतात. गुलाम नबींच्या डेमोक्रॅटिक आझाद पार्टीचा सुरुवातीचा उत्साह आता थंड आहे. पक्षासमोर दलबदलूंची समस्या आहे. राज्यात संघटनात्मक बांधणीही तयार नाही. पक्षाने अद्याप निवडणूक रणनीतीदेखील ठरवलेली नाही.      

लहान राज्यांत महत्त्वाची भूमिका बजावणारा आप काश्मिरात आपले नशीब आजमावू शकतो. आम आदमी पार्टीला अलीकडे पंजाबमधील निवडणुकीत चांगले यश मिळाले. या यशाची पुनरावृत्ती जम्मूमध्येही करण्याचे आपचे प्रयत्न आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष नजीर यतू यांनी लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली.      

केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेच्या शिफारशींनुसार ९० सदस्यांच्या विधानसभेत काश्मीरच्या ४७, जम्मूच्या ४३ जागा असतील. विभाजित करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण ८७ आमदार होते. त्यात जम्मूचे ३७, काश्मीरचे ४६ आणि लडाखचे ४ आमदार होते. आता जम्मू-काश्मीरच्या विधानसभा मतदारसंघांची संख्या ८३ वरून ९० करण्यात आली आहे. त्यात जम्मू प्रांतातील सहा जागा वाढवून मतदारसंघांची संख्या ३७ वरून ४३ करण्यात आली आहे, तर काश्मीरमधील एक जागा वाढवून मतदारसंघांची संख्या ४६ वरून ४७ करण्यात आली आहे. मतदारसंघांच्या नव्या आकड्यांमुळे जम्मू - काश्मीरच्या इतिहासात प्रथमच हिंदू मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाढली आहे.