मागील पाच वर्षांत राज्यात ११६ खून

मुख्यमंत्र्यांची लेखी उत्तरातून माहिती : न्यायालयात १२३ खटले प्रलंबित


30th January 2023, 12:26 am
मागील पाच वर्षांत राज्यात ११६ खून

प्रतिनिधी । गोवन वार्ता                               

पणजी : राज्यात मागील पाच वर्षांत ११६ खून झाले आहेत. त्यांतील ६ खून प्रकरणांतील आरोपींना शिक्षा झाली आहे, तर पाच प्रकरणांतील आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. तिघा महिलांवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आले आहेत. न्यायालयात १२३ खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे. विरोधी पक्षनेते तथा कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी याविषयी तारांकित प्रश्न दाखल केला होता.

लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०१८ मध्ये २९, २०१९ मध्ये ३३, २०२० मध्ये ३४, २०२१ मध्ये २६, तर २०२२ मध्ये ४४ असे पाच वर्षांत एकूण १६६ खून झाले आहेत. यांतील तीन महिलांवर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आले. खून झालेल्यांमध्ये ६ अल्पवयीन मुलांचा, तर एका स्त्री जातीच्या अर्भकाचाही समावेश आहे. एका १४ महिन्यांच्या मुलीचा खून करून आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या एका घटनेत ५ महिन्यांच्या मुलीचा खून करण्यात आला आहे. पाच वर्षांच्या दोन मुलांचा खून केल्याप्रकरणी गुन्हे नोंद आहेत. एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून खून करण्यात अाला होता.                   

वरील कालावधीत झालेल्या तीन खून प्रकरणांतील संशयितांमध्ये अल्पवयीनचा समावेश होता. त्या अल्पवयीन मुलांची मेरशी येथील ‘अपना घरा’त रवानगी करून त्याच्यांविरोधात बाल न्यायालयात कारवाई सुरू आहे. १६६ खून प्रकरणांपैकी सहा प्रकरणांतील आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. पाच प्रकरणांतील संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली आहे. सहा प्रकरणांतील संशयितांचे निधन झाल्यामुळे न्यायालयाने खटला बंद केला आहे. एका प्रकरणातील संशयिताला आरोपातून मुक्त केले आहे.                  

पोलिसांकडे १९ खून प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. ६ प्रकरणांत पोलिसांनी न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. १२३ खुनांचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून दिली आहे.


हेही वाचा