बर्च क्लब दुर्घटना: माजी सरपंच रोशन रेडकरचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
1 hours ago
बर्च क्लब दुर्घटना: माजी सरपंच रोशन रेडकरचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

पणजी: बर्च क्लबमधील अग्नितांडव प्रकरणी हडफडे-नागवाचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी यासंदर्भातील आदेश दिला.

हडफडे येथे ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी रोशन रेडकर आणि तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने तो फेटाळला. या आदेशाला दोघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच हणजूण पोलिसांनी १६ तारखेला सायंकाळी रघुवीर बागकर याला कार्मुली येथून अटक केली. त्यामुळे बागकर यांची आव्हान याचिका मागे घेण्यात आली.

रेडकर याच्या अर्जावर आज झालेल्या सुनावणीत सरकारी अभियोक्ता सोमनाथ कर्पे यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. मूळ अर्जात खाडाखोड करून दुसऱ्या मालमत्तेचा घर क्रमांक दाखवण्यात आला होता, तसेच पंचायत सदस्यांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचा घर क्रमांक नमूद केला गेला. संबंधित क्लब बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाल्यावर आणि तो जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर, अतिरिक्त पंचायत संचालनालयाने त्या आदेशाला स्थगिती दिली होती. याशिवाय, अबकारी खात्याने परवाना देण्यापूर्वी पंचायतीकडे विचारणा केली असता, तत्कालीन सरपंच आणि सचिवाने हरकत न घेता क्लब कायदेशीर असल्याचे प्रमाणपत्र दिले आणि जाणीवपूर्वक मदत केली, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर रोशन रेडकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा