मंत्री रमेश तवडकर : ५०० स्टॉल्समध्ये कलाकृतींचे प्रदर्शन

पणजी : आपण आपली संस्कृती आणि परंपरेची कास घट्ट धरली, तरच प्रगती होईल. म्हणूनच लोकोत्सवाच्या माध्यमातून आपली ग्रामीण संस्कृती किती महान आहे, हे गोवा आणि देशासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांनी सांगितले.
पणजी येथील कला अकादमीच्या (Kala Academy Goa) आवारात ‘लोकोत्सव २०२६’च्या (Lokotsav 2026) उद्घाटनप्रसंगी मंत्री तवडकर बोलत होते. यावेळी कला आणि संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक, उपसंचालक मिलिंद माटे, आनंद कवठणकर, लेखा अधिकारी राजू गावकर, कला अकादमीचे सदस्य सचिव शंकर गावकर, क्रीडा खात्याचे संचालक अजय गावडे, लोकसंस्कृती अभ्यासक विनायक खेडेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या लोकोत्सवात १८ राज्यांतील कलाकार उपस्थित राहून देशभरातील कलाविष्कार सादर करतील. सुमारे ५०० स्टॉल्सच्या माध्यमातून देशभरातील कलाकार आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडतील, असे मंत्री तवडकर यांनी सांगितले.
लोकोत्सव साजरा करताना आम्ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित व्यासपीठ तयार केले असून, संपूर्ण भारताच्या कलाकृतींचा यात समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे, असे तवडकर म्हणाले. आपल्या भारत देशात विविधता असूनही आपण एकता जपतो, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. जम्मू ते कन्याकुमारी असा प्रवास केला, तर आपली वेशभूषा, भाषा आणि खानपानामध्ये विविधता आढळते, तरीही हा अखंड भारत देश आजही संघटित आणि अबाधित आहे, असे मत तवडकर यांनी मांडले.
या लोकोत्सवाचा आस्वाद गोवा तसेच गोव्याबाहेरील लोकांना घेता येईल. देशभरातील खाद्य संस्कृती समृद्ध आहे हे आपल्याला माहित आहेच, पण त्यात गोव्याच्या खाद्य संस्कृतीचे वेगळेपण पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळेल, असेही तवडकर यांनी नमूद केले.
ग्रामीण संस्कृती जपायला हवी!
गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्याला एक सिद्धांत माहित आहे की, ज्या माणसाने, गावाने किंवा देशाने आपल्या संस्कृतीची साथ सोडली, त्या माणसाचा किंवा गावाचा ऱ्हास होतो. ग्रामीण संस्कृती आणि परंपरा यांची कास आपण घट्ट धरली पाहिजे. तरच आपली प्रगती होऊन आपण पुढे जाऊ शकू, असे मंत्री तवडकर यांनी सांगितले.