बलात्कार प्रकरणातील शिक्षेला गोवा खंडपीठात आव्हान

माजी कॉन्स्टेबलकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th January 2023, 12:13 Hrs
बलात्कार प्रकरणातील शिक्षेला गोवा खंडपीठात आव्हान

पणजी : दक्षिण गोव्यातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गोवा पोलिसमधील माजी कॉन्स्टेबल सिद्धार्थ उर्फ सिद्धू गोसावी याला पणजी येथील जलदगती विशेष न्यायालयाने (पॉक्सो) शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला आरोपी गोसावी याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवार ३० रोजी होणार आहे.
वास्को पोलिसांनी बाल न्यायालयात आरोपी सिद्धार्थ उर्फ सिद्धू गोसावी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार, १७ वर्षीय पीडित मुलीने १६ जून २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यात तिने आपल्यावर एका अल्पवयीन मुलाने आणि सिद्धार्थ गोसावी याने लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. या व्यतिरिक्त सिद्धार्थ गोसावी याने १३ जून २०१८ रोजी अपहरण करून उत्तर गोव्यात आरोपीने आपल्या नातेवाईकावर ठेवल्याचे म्हटले आहे. त्यानंतर १४ जून २०१८ रोजी रात्री घरी सोडण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, याची दखल घेऊन वास्को पोलिसांनी १६ जून २०१८ रोजी आरोपी सिद्धार्थ गोसावी याच्या विरोधात भादंसंच्या कलम ३७६, ३६३, ३२३ आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर १७ जून २०१८ रोजी गोसावी याला पोलिसांनी अटक केली होती. तसेच अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन नंतर त्याची रवानगी मेरशी येथील अपना घरात केली होती. त्यानंतर २३ ऑगस्ट २०१८ रोजी न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणी पणजी येथील जलदगती विशेष न्यायालय (पॉक्सो) अध्यक्ष दुर्गा मडकईकर यांनी आरोपी सिद्धार्थ गोसावीला दोषी ठरवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यामुळे आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. बलात्कार केल्याप्रकरणी १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४ कलमांतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. तर दंड न भरल्यास अतिरिक्त साधी कैदेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला आरोपीने खंडपीठात आव्हान दिले आहे.