‘बौद्धिक’ कृतीत उतरणे महत्त्वाचे!

अत्यंत प्रगल्भ आणि पुरोगामी विचार सरसंघचालकांनी मोजक्या शब्दांत दिले आहेत. त्यामागील हेतूंची चर्चा न करता स्वधर्माच्या उत्थानासाठी त्यांनी दिलेले ‘बौद्धिक’ आता कृतीत उतरविण्याची गरज आहे.

Story: विचारचक्र | सचिन खुटवळकर |
30th January 2023, 12:09 Hrs
‘बौद्धिक’ कृतीत उतरणे महत्त्वाचे!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हिंदूंतील दुहीवर बोट ठेवले आहे.  वर्णव्यवस्थेवरून धर्मातील सुंदोपसुंदी कशी घातक आहे, याचा पाढाच त्यांनी वाचला. त्याचबरोबर संघ स्वयंसेवकांना अनेक वेळा जाहीर आवाहनही केले. ‘संघ स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांनी आपल्या परिसरातील सफाई कामगारांना किंवा समाजातील वंचित घटकातील कोणत्याही कुटुंबाला आपल्याकडे आमंत्रित करावे आणि आठवड्यातून एकदा त्यांच्यासोबत भोजन घ्यावे. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी कार्य करावे,’ असे आवाहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केले. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणाचीही जात विचारली जात नाही. इथे एकत्र भोजन घेतले जाते आणि एकत्र कामही केले जाते. अशा प्रकारचे सौहार्दपूर्ण वातावरण प्रत्येक घरात तयार केले पाहिजे,’ असे आवाहन भागवत यांनी स्वयंसेवकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना केले.                        

सुदृढ समाजव्यवस्थेसाठी अशा विचारांचे स्वागतच व्हायला हवे. हिंदू एकत्र यायला हवे, यासाठी प्रयत्नरत असलेल्या एका महत्त्वाच्या संघटनेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने जातआधारित भेदभाव संपविण्यासाठी केलेले आवाहन सकारात्मक वृत्तीने घ्यायला हवे. मात्र ही विधाने केवळ अभिनंदनीय पाऊल म्हणून कौतुकाच्या भरात सोडून देऊन चालणार नाहीत. त्यावर खोलवर विचारमंथन व्हायला हवे, सार्वजनिक व्यासपीठांवर या विधानांची चिकित्सा व्हायला हवी. त्यातून हिंदू धर्मातील जातीभेदाच्या व्यवस्थेमुळे कोणालाही कसलीच समस्या उद्भवणार नाही, यासाठी सर्व समाजबांधवांचे एकमत निर्माण करावे लागेल. कारण केवळ भोजनावळी घातल्या, एकमेकांना आलिंगने दिली आ​णि सहभोजनानंतर जाती, वर्णव्यवस्था संपुष्टात आल्याचे कोरडे ढेकर दिले म्हणजे उद्दिष्ट साध्य झाल्याचे समाधान कोणीही मानून चालणार नाही. अशा प्रकारचे शेकडो प्रयोग अनेक व्यक्तींनी, संस्थांनी यापूर्वी केले. काही प्रमाणात त्याला यशही आले. पण ते फार मर्यादित राहिले. त्याचे चळवळीत रूपांतर झाले नाही. एखाद्या चांगल्या विचाराला कृतीत उतरविण्याची सुरुवात होते न होते, तोवर ती कृती कशी मातीमोल ठरेल, याचीच कारस्थाने दुर्दैवाने रचली गेली आणि अशा चळवळी काळाच्या उदरात कायमच्या गडप झाल्या. यात कुठल्या दुसऱ्या धर्माच्या लोकांनी खोडा घातला नाही, तर स्वधर्मीयांनीच ते प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. त्यामुळेच सरसंघचालकांचे विचार कृतीत कसे उतरवता येतील आणि त्याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम कसे साधता येतील, याची रूपरेषा आधी तयार व्हायला हवी. ते होणार नसेल, तर ‘नळी फुंकली​ सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ इतकेच महत्त्व या आवाहनांना उरेल.                        

भागवत यांनी आणखी एका कार्यक्रमात एक लक्षवेधी विधान केले. त्याकडे माध्यमांनी केवळ बातमी म्हणूनच पाहिले आणि लोकशाहीचे अविभाज्य अंग असल्याचा विसर पडावा, अशा आविर्भावात ते विधान सोडूनही दिले. भागवत म्हणाले, ‘ब्राह्मण हा जन्माने नव्हे तर कर्माने होत असतो. हे सर्वच धर्मशास्त्रात नमूद असले तरी मधल्या काळात चातुवर्ण्य व्यवस्थेची चौकट घट्ट झाली आणि आपल्याकडून माणसाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले. त्यामुळे आता आपल्याला त्याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही.’ या धाडसी विधानाबद्दल भागवत यांना कुर्निसातच करायला हवा. त्यांनी केवळ ब्राह्मण समाजाचा उल्लेख केल्यामुळे ब्राह्मणवर्गाने दुखावण्याचे मुळीच कारण नाही. कारण ज्या अभिजन वर्चस्ववादी वृत्तीने वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था टोकदार कशी राहील, याची खबरदारी घेतली, त्यात ब्राह्मणवर्गही आहे. पण सरसकट सर्व ब्राह्मणांना असे एकाच तागडीत तोलणे योग्य नाही. प्रत्येक जातीतील व्यक्तींना आपलीच जात इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा वर्चस्ववादाचा, श्रेष्ठत्ववादाचा टेंभा केवळ ब्राह्मणांनी पेटवून मिरवला असे म्हणता येणार नाही. म्हणूनच भागवतांच्या विधानांची चिकित्सा अणि चर्चा सर्व स्तरांवर जाहीररीत्या होणे क्रमप्राप्त आहे. आरएसएसचे स्वयंसेवक किती आहेत, ते कुठपर्यंत हा विषय पोहोचवतील, त्याला कितपत यश मिळेल, हा भाग प्राप्तस्थितीत फारसा महत्त्वाचा नाही. ही चळवळ उभी राहणे महत्त्वाचे आहे. अन्य धर्मियांची उदाहरणे दाखवून हिंदूंना एकत्र येण्याची आवाहने करणे सोपे, मात्र अशा चळवळी उभारून त्या प्रत्यक्षात आणणे कठीण असते. हे आव्हान आरएसएस कशा प्रकारे पेलून दाखवते, यावर भागवत यांच्या विधानांचे गांभीर्य अवलंबून आहे. अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ काय कामाचा?                        

एके ठिकाणी भागवत म्हणतात, ‘कोणालाही विषमता नको. हीच गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र गतकाळात आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही. देशाच्या प्रगतीसाठी समाजातील विषमता दूर करणे आवश्यक आहे. आरक्षणासाठी कायदे झालेत. परंतु, त्याचा लाभ सर्वांनाच झालेला नाही. समाजाला जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत आरक्षण कायम ठेवले पाहिजे. यासाठी माझे पूर्ण समर्थन आहे.’ ही विधाने संघ विचारांचा आदर्श ठेवणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मनावर कोरून ठेवायला हवी. इतकेच नव्हे, तर त्यापासून बोध घेऊन तसे वर्तनही ठेवायला हवे. कारण ज्या अभिजन वर्गातून आरक्षणाविरोधात अपप्रचार केला जातो, त्या अभिजनवर्गाला सबुरीचा सल्ला देण्याचे काम अधिकारवाणीने संघाची माणसेच करू शकतात. ‘सोनारानेच कान टोचावे’ हेच योग्य!                        

भागवतांचे पुढील विधान तर क्रांतिकारी म्हणावे असे आहे. ‘न्यायासाठी उचललेल्या प्रत्येक आवाजासोबत आपण उभे राहायला हवे. संविधानाची प्रस्तावना सर्वांच्याच आचरणात यावी, यासाठी वाणीचा दीप उजळून समरसता लोकांच्या हृदयात उतरवायची आहे, हे वचन बाबासाहेबांना द्यायचे आहे.’ अत्यंत प्रगल्भ आणि पुरोगामी विचार सरसंघचालकांनी मोजक्या शब्दांत दिला आहे. खरे तर हिंदू धर्माच्या बळकटीकरणात भारतीय राज्यघटना हा अभिजन आणि बहुजन, वंचित यांतील ‘सेतू’ बनायला हवा. याची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी व्हायला हवी होती. पण ‘देर आये दुरुस्त आये’ हेही नसे थोडके!                       


सरसंघचालक किंवा संघाचे प्रचारक संघ स्वयंसेवकांसमोर जे विचार मांडतात, त्याला बौद्धिक म्हटले जाते. संघ वर्तुळात बौद्धिकांची तुलना  इतर भाषणांशी केली जात नाही, तर ते गांभीर्याने घेणे अपेक्षित मानले जाते. जे विचार संघप्रमुख किंवा प्रचारक व्यक्त करतात, त्याबरहुकूम मनन, चिंतन करून संघ विचारांच्या लोकांनी वर्तन, कृती करावी, असा आग्रह असतो. भागवतांनी स्वधर्माच्या उत्थानासाठी दिलेले बौद्धिक आता कृतीत उतरविण्याची गरज आहे. त्यांनी व्यक्त केलेले विचार, दिलेले सल्ले, केलेली आवाहने यामागचे हेतू काय आहेत, यावर मतभेद असू शकतील. मात्र जातीवर्णव्यवस्थेला एका पातळीवर आणण्याचा मनोदय स्वागतार्हच मानायला हवा.