जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन

|
29th January 2023, 11:16 Hrs
जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

मेलबर्न : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजयाबरोबर त्याने राफेल नदालच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

रविवारी मेलबर्नच्या रॉड लेव्हल एरिना येथे झालेल्या अंतिम लढतीत चौथ्या मानांकित जोकोविचने तिसऱ्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. नोव्हाक जोकोविचचे हे २२ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. आता त्याने पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या बाबतीत राफेल नदालची बरोबरी केली आहे.

नोव्हाक जोकोविचचे हे १०वे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद आहे. पाहिल्यास, या स्पर्धेच्या सुरुवातीला जोकोविचला हॅमस्ट्रिंगच्या समस्येचा सामना करावा लागला होता, परंतु तरीही तो खेळत राहिला आणि तो चॅम्पियन बनला. आता अंतिम सामना जिंकल्यानंतर नोव्हाक जोकोविच जून २०२२ नंतर पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

नोव्हाक जोकोविचने १०व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. म्हणजेच येथे जेव्हा जेव्हा जोकोविच अंतिम फेरीत पोहोचला तेव्हा त्याने विजेतेपद पटकावले. त्सित्सिपास दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला, पण येथेही त्याची निराशा झाली. जोकोविचचा हा विक्रमी ३३ वा ग्रँड स्लॅम फायनल होता.

वर्षभरापूर्वी जोकोविचला मेलबर्न शहरात कैद्याप्रमाणे ठेवण्यात आले होते. कोविड प्रोटोकॉलमुळे तो खेळू शकला नव्हता. करोनाव्हायरसच्या त्या भीषण काळात लसीकरण न करण्याच्या जिद्दीमुळे सार्वजनिक दबाव, सरकारी दबाव आणि न्यायालयाच्या आदेशांमुळे जोकोविच मेलबर्नहून परतला होता.