विचारवाणी

Story: वाचू आनंदे | अक्षता किनळेकर |
28th January 2023, 10:53 pm
विचारवाणी

" मी समजतो गांवहि शरीर |  त्यास राखावें नेहमी पवित्र |

त्यानेच नांदेल सर्वत्र  | आनंद गांवी ||

राष्ट्र संत तथा समाजसुधारक तुकडोजी महाराज या अवघ्या दोन तीन ओळीतून जगाला सुखी करण्याचा मतितार्थ सांगून गेले. त्यांनी नेहमीच आपल्या शब्दांनी समाजाला आरसा दाखविला. समाजाला मार्ग दाखविला. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या शरीराची सर्वोतोपरी काळजी ज्याप्रमाणे घेतो त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राची काळजी घेणे ही काळाची गरज आहे असे समाजप्रबोधनपर विचार आपल्याला तुकडोजी महाराजांच्या काव्यात वाचायला मिळतात. वैचारिक शक्ती लाभलेले, देशाचे  भान असलेले अनेक संत, विवेचक, लेखक या भारतभूमीत जन्मले. स्वामी विवेकानंदानी आपल्या विचाराच्या जोरावर हे जग जिंकले. बुद्धांनी दिलेल्या बुद्धीमुळे कित्येकांना खरा जीवन अर्थ उमगला. अनेक थोर विचारवंतांनी आपले विचार प्रकट करून जनतेला विचार करण्यास्तव  भाग पाडले. विचार प्रत्येक माणसापाशी असतात अंतर एवढाच आहे की काही ठामपणे जगासमोर ठेवतात तर काहींचे विचार मनाच्या गर्भगुढीतच दडून राहतात. हा! आता प्रत्येकजणांचा स्वभाव वेगळा असतो. म्हणूच हाताची बोटं सुद्धा समान नसतात. सगळे एकसारखे असू शकत नाही. आपले विचार ठाशीवपणे समोर ठेवण्याची कला काही लोकांत असते, त्यातलेच एक धाडसी लेखक म्हणेज डॉ. गुरूदास नाटेकर.  समाजाचा विचार करणारे समाजचिंतक, विचारवंत  अशी त्यांची ख्याती आहे. आतापर्यंत त्यांनी एक नाही दोन नाही २२ पुस्तके लिहिली आहेत. डॉ गुरूदास हे उत्तम साहित्यक, व्यावसायिक, उद्योजक, नाट्यकलाकार  फार्मासिस्ट व संशोधक आहेत. त्यांची ' एक वादळ घोंगावताना ' ही कादंबरी जनमानसात गाजल्यामुळे. अन्यभाषकांच्या मागण्यांवरून या कादंबरीचे भाषांतर / रूपांतर हिंदी, इंग्रजी, कोंकणी भाषेत करण्यात आले. 'विचारवाणी ' हा डॉ. गुरूदास भालचंद्र नाटेकर यांचा वैचारिक लेखसंग्रह आहे. १0४ पृष्ठ असलेल्या या पुस्तकात एकूण पंधरा लेख आहेत. या पुस्तकाला लेखिका शीतल साळगावकर यांनी प्रस्तावना दिली आहे. प्रस्तावनेत पुस्तकातील लेखांवर भाष्य न केल्यामुळे. पुस्तक वाचण्याची उत्कंठा तयार होते. पुस्तक काय असेल, कसे असेल  हे कोडे प्रस्तावनेत न सुटता. समग्र पुस्तक वाचल्यावरच  सुटते. वैचारिक लेख लिहिणारे हजारो लेखक आहेत, पुढे येतील ही . परंतु संशोधन करून संदर्भ व पुराव्यासकट वैचारिक लेखन करणारे डॉ. गुरूदास भालचंद्र नाटेकर यासारखे लेखक आपल्याकडे कमी आहेत. या पुस्तकात दिलेल्या संदर्भांवरून डॉ. नाटेकर यांनी केलेल्या संशोधनपर अभ्यासाचा कयास लावता येतो. गोव्यातील समुद्र, न्यायव्यवस्था, ग्रीन क्रॅकर तपासणी, भारतीय औषध उत्पादन, क्रीडा, स्त्रियांचे दुय्यम स्थान इत्यादी विषय त्यांनी  'विचारवाणी ' या पुस्तकात हाताळले आहेत. वाचकाला माहीत नसलेली माहिती या पुस्तकात असल्यामुळे पुस्तक वाचून ज्ञानवृद्धी झाल्याचा आनंद वाचकाला मिळणार यात शंका नाही. 'ब्लू फ्लॅगमुळे गोव्याच्या किनाऱ्यांची शान वाढेल ' या लेखात  ब्लू फ्लॅग या  संकल्पनेशी  लेखक वाचकाचा  परिचय करतात. समूद्रकिनारे, त्याच्या पाण्याचा दर्जा, स्वच्छता इत्यादी निकष पूर्ण केल्यावर 'फॉउंडेशन ऑफ एनवयरोमेंटल एजुकेशन ' या संस्थेतर्फे मानांकने दिली जातात. भारताला देखील हे नामांकन मिळाले आहे. ब्लू फ्लॅग ही गोव्याच्या पर्यटनविकासाच्या संदर्भातील काळाची गरज आहे. ब्लू फ्लॅग असलेल्या समुद्राची निवड प्रवासी करत असतात. त्याने  देशाला फायदा होतो. गोव्यातील अनेक व्यवसाय परप्रांतीयांच्या घशात गेल्याची चिंता सुद्धा लेखक पुस्तकात व्यक्त करतात. आधी केवळ महाराष्ट्रातील लोक रोजगारानिमित्त गोव्यात यायचे परंतु आता इतर राज्यातली माणसे येऊन मतदान अधिकारपर्यंत त्यांनी मजल गाठली आहे. असा मुद्दा लेखक व्यक्त करतात. गोव्यातील लोक नोकरीव्यवसायाच्या निमित्ताने परप्रांतात बराच काळ स्थायिक झाल्यानंतर,जीवनाच्या अखेरीस पुन्हा गोव्यात परततात पण परप्रांतातून गोव्यात आलेले लोक तसे करीत नाहीत हा मुद्दा देखील विचारात घेतला आहे. 'विचारवाणी ' या पुस्तकात फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, पर्यावरणप्रिय फटाके निर्मितीचा नुसता दावा करून,प्रदूषण करणारे फटाके बाजारात विकून कशी लोकांची फसवणूक केली जाते. लोकांचे निसर्ग प्रेम, आरोग्य भान जागृत झाल्यामुळे फटाके व्यवसायाचे झालेले नुकसान यावर ही पुस्तकात विचार प्रकट केले आहेत . तामिळनाडूतील शिवकाशी हे फटाक्यांच्या निर्मितीचे भारतातील प्रमुख केंद्र असल्याची माहितीदेखील लेखक पुरवतात. भारतातील औषध उत्पादनावर आधारित लेख हा अतिशय सुंदर लेख आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या औषधांपैकी सुमारे ११ टक्के उत्पादन छोटयाशा गोव्या राज्यात होते. गोव्यात उत्पादित होणाऱ्या औषधांपैकी ८0 टक्के माल जगातील विकसित देशात निर्यात केला जातोय. असे डॉ. गुरूदास नाटेकर यांनी आपल्या लेखात मांडले आहे. या व्यतिरिक्त स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान, समाज समस्या इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी आपले विचार शब्दबद्ध केले आहेत. 'विचारवाणी ' हे शीर्षक या वैचारिक लेख संग्रहाला शोभणारे आहे. सर्व  विचारांना वाणीद्वारे प्रकट करून पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात  लेखक यशस्वी झाले आहेत. डॉ. गुरूदास नाटेकर हे जरी फार्मासिस्ट असले तरी त्यांच्याकडे  असलेले साहित्यिक मन, हे जग समस्या पाहून पेटून उठते. त्यांचे हे पुस्तक म्हणजे ज्ञानग्रंथच जणू. पावसाची धारा ज्याप्रमाणे आकाशातून मुक्त बरसत असते त्याचप्रमाणे आपल्या डोक्यातून विचारांची 

धारा सदैव बरसली पाहिजे...नितांत 

बरसली पाहिजे, त्यात अडथळे येता 

कामा नये. आपल्या विचाराने कुणाला दिशा तर कुणाला संकटांशी लढण्याचे सामर्थ्य मिळू शकते.