बेलारूसची अरिना सबालेन्का बनली ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन

|
28th January 2023, 10:52 Hrs
बेलारूसची अरिना सबालेन्का  बनली ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

मेलबर्न : बेलारूसची टेनिसपटू अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. हे तिचे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. 

अंतिम सामन्यात जगातील पाचव्या मानांकित खेळाडू सबालेन्का हिने जगातील २२व्या क्रमांकाची खेळाडू एलेना रायबाकिना हिचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. गतवर्षी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणारी रायबाकिना पहिला सेट जिंकल्यानंतर नियंत्रणात दिसली. यानंतर बेलारूसच्या खेळाडूने जोरदार पुनरागमन करत बाजी मारली.

असा झाला सामना

ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत एलेना रायबाकिनाने धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये साबालेन्काकडे तिच्या फटकेबाजीला उत्तर नव्हते. कझाकिस्तानची रायबाकिना पुढच्या सेटमध्ये विजेतेपदावर कब्जा करेल, असे वाटत होते. मात्र दुसऱ्या सेटमध्ये आर्याना सबालेन्काने दमदार पुनरागमन केले. नंतरच्या दोन सेटमध्ये ती इतकी उत्कृष्ट टेनिस खेळेल याचा अंदाज क्वचितच कोणी बांधला असेल. यादरम्यान तिने दुसरा सेट ६-३ असा जिंकला. यानंतर तिसऱ्या सेटमध्येही तिने रायबाकिनावर मात केली. तिने कझाकिस्तानच्या खेळाडूला परतण्याची एकही संधी दिली नाही. आर्याना सबालेन्काने तिसरा सेट ६-४ असा जिंकला.

मी खूपच नर्व्हस आहे!

आर्याना सबालेन्काच्या कारकिर्दीतील हे पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. फायनल जिंकल्यानंतर तिने सर्वांचे आभार मानले. सबलेन्का म्हणाली, मी खूप नर्व्हस आहे. मी मिस किंगचे आभार मानते ज्यांनी खूप काही केले. आशा आहे की आम्ही ग्रँड स्लॅममध्ये आणखी स्पर्धा करू. तुम्हा सर्वांचे आभार. मी माझ्या टीमचेही आभार मानू इच्छिते. गेल्या वर्षभरात आपण अनेक चढउतारांमधून गेलो आहोत. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा या ट्रॉफीसाठी अधिक पात्र आहात. पुढील वर्षी मेलबर्नला परत येण्याची आणि आणखी चांगली कामगिरी करण्याची आशा आहे.

जोकोविच-त्सित्सिपासमध्ये आज सामना

ऑस्ट्रेलियन ओपनचा पुरुषांचा अंतिम सामना रविवार, दि. २९ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. यामध्ये ९ वेळा हे विजेतेपद पटकावणारा नोव्हाक जोकोविच आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात स्पर्धा होणार आहे. क्रमांक १ साठी यांच्यात सामना खेळला जाईल. हा अंतिम सामना जो कोणी जिंकेल तो एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.

शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने बिगरमानांकित अमेरिकेच्या टॉमी पॉलचा ७-५, ६-१ आणि ६-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता जोकोविच त्याच्या १०व्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदापासून फक्त एक विजय दूर आहे. जोकोविचने हा सामना दोन तास २० मिनिटांत जिंकला. त्याचबरोबर तीन तास २१ मिनिटे रंगलेल्या लढतीत सित्सिपासने करेन खाचानोववर ७-६ (२), ६-४, ६-७ (६), ६-३ असा विजय मिळवला.