परीक्षा- एक मनोरंजनात्मक उपक्रम

Story: पालकत्व | पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
27th January 2023, 10:40 pm
परीक्षा- एक मनोरंजनात्मक उपक्रम

मित्रांनो, परीक्षा म्हणजेच आपल्या समोर आलेले एक मोठे चक्रीवादळ, ज्याच्याशी आपल्याला निरंतर लढायचे असते. प्रथम दिवसाच्या सुर्योदयासोबत संघर्षाचा शंखनाद होतो, त्यादिवसापासून सर्व घडामोडी सुरु होतात. हृद्यात परीक्षेचा ध्यास घेतला जातो व झोपेचा, अन्नाचा, मोबाईलचा पूर्ण त्याग करण्यास समर्पक वृत्तीची मुले प्रवृत्त होतात. व परीक्षेच्या शेवटच्या दिवसाची वाट डोळ्यात तेल घालून पहात असतात. अखेर शेवटच्या परीक्षेची घटिका भरते व मुले सुटकेचा निश्वास सोडतात. निद्रेला आतूर झालेली मुले, कुंभकर्ण बनतात, व कित्येक दिवसाच्या झोपेचा एकदम आनंद घेतात. परीक्षा म्हणजेच मुलांना प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे मूल्यमापन होय. परीक्षेच्या माध्यमातून, विद्यार्थी तसेच अध्यापक दोघांचीही प्रगती होते. मुलांच्या आकलनाची, बुध्दिमत्तेची कल्पना अध्यापकास मिळते, तसेच एका अध्यापकाला त्याच्या अध्यापन पध्दतीच्या यशाची, प्रभावाची कल्पना येते. पण खरे पाहता, परीक्षेबाबत प्रत्येकाची नकारात्मक भावना का? परीक्षेचे नाव ऐकून कुठल्याही मुखावर प्रसन्नेचा भाव का दिसत नाही?, हा एक चिंतेचा विषयच आहे ना, परीक्षा कितीही गुणांची असो, पण त्या परीक्षेस घाबरायचे का?, परीक्षेची चाहूल लागताच, काही मुलांना ताणतणाव यायला सुरुवात होते. अनेक समस्या येतात, निरोगी असलेले आरोग्य आपोआपच बिघडते. अनेक पालकांची हीच समस्या असते की, आपले मूल नेमके परीक्षेच्या वेळी आजारी का होते?, त्याचे आरोग्य का बिघडते?, याचे उत्तर एकच आहे व ते उत्तर म्हणजेच, परीक्षेचा तणाव होय. मुळात परीक्षेचे गंभीर वातावरण का बनते?, याचे कारण एकच, व ते म्हणजे वेळेचे अनियमित नियोजन होय. वेळेचे व्यवस्थापन आपल्याकडून होत नाही, परिणामस्वरुप, परीक्षेच्या ऐन वेळेस, तणावाचा डोंगर उभा राहतो. खरे पाहता परीक्षेची मजा वेगळीच असते, फक्त ती अनुभवता आली पाहिजे. परीक्षेच्या आनंदाचे रसग्रहण करता आले पाहिजे. आपण शाळेत गेलो, म्हणजे परीक्षा ही होणारच. प्रत्येक परीक्षेला घाबरावे का?, आपल्या आयुष्यात मुद्दामहून वेगवेगळ्या पैजा स्विकारण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तोच आनंद, तुम्ही परीक्षेत का अनुभवत नाही?, आपण जे शिकत आहोत, त्यामुळे नेमके आपल्यामध्ये, कोणकोणते बदल होत आहेत याची अनुभूती घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. मोबाईलमध्ये टप्प्यांचा गेम्स खेळायला जर आवडतो, तर मग जीवनाच्या टप्प्यास का बरे घाबरायचे?, परीक्षा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, आणि आपण जर स्वत:च्या जीवनशैलीला एक आकार दिला, तरच परीक्षा हा नविन मुद्दा न बनता, आपला नित्यक्रम बनेल.

योग्य वेळापत्रकाचे पालन

आपल्याला परीक्षेची भीती वाटते, कारण अभ्यास झालेला नसतो. वेळेचे नियोजन नसल्याकारणाने वेळेत अभ्यासाला सुरुवात केली जात नाही. व मग काहीतरी नक्कीच इकडे तिकडे राहून जाते. त्यामुळे स्वत:लाच काही नियम लागू करुन घ्यायचे. योग्य वेळात वेळापत्रक करायचे. अभ्यासासोबत स्वत:ला खेळाशी जोडून घ्यायचे, मोकळ्या वेळेचा शोध घ्यायचा. अशा पध्दतीने वेळापत्रक करायचे, ज्याचे पालन करण्यास आपल्याला सोपे होईल. अभ्यासाचे प्रमाण वाढल्यावर सुध्दा वेळापत्रकाचे पालन करता आले पाहिजे, प्रत्येक विषयासोबत समान न्याय करणारे वेळापत्रक बनवून त्याचे पालन केले पाहिजे. प्रत्येक दिवशी मी इतका अभ्यास करणार असे मनाशी ठाम ठरवून, ते त्याच दिवशी केले पाहिजे. जर अभ्यास नियमितपणे झाला, तर परीक्षेला कोणकोणते धडे आहेत याचा शोध घेण्याची गरज पडणार नाही. 

आरोग्याची काळजी, पोषक आहार

अर्धा दिवस शाळेत, अभ्यासासोबतच क्रीडा तसेच इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, घरी गेल्यानंतर परत अभ्यास, त्याच्यातूनसुध्दा निवांत वेळ स्वत:साठी सतत राखीव ठेवण्याची कला, आपण आत्मसात केली पाहिजे. कुठलेही काम असो, वा अभ्यासाची जबाबदारी, आपले आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर सर्वात प्रथम असते. त्यासाठी जी सहनशक्ती व ताकद आपल्याला पाहिजे, त्याकरीता आपण झोपेचा योग्य वेळ सांभाळणे तसेच पोषक आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. तेलकट, तूपकट पदार्थाने केवळ आपले आरोग्य बिघडते, त्यामुळे जास्तीत जास्त पोषक आहार जसे की पालेभाजी, कडधान्ये, तसेच फळांचा समावेश असावा, कुठलीही समस्या समोर येऊ द्या, आपण आपली स्थिरता न सोडता, आपल्या योग्य मार्गावर मार्गक्रमण करायचे. तणावमुक्त जीवन जगायचे, दररोज व्यायाम करायचा.

क्षणभर विश्रांती

काम कुठलेही असो, क्षणभर विश्रांती पाहिजे. याची काळजी नक्कीच घ्यावी. अभ्यासाला बसल्यानंतर निरंतर तासनतास न बसता अधूनमधून विश्रांती घेणे गरजेचे आहे. स्वत:वर ताण येऊ देता कामा नये. मुळात ताण हा शब्द आपल्या मनातूनच काढून टाकायला हवा. ताण-तणावाचा जन्म आपल्या उणिवामधूनच होतो, आपण केलेल्या चुकींमुळे होतो, यामुळेच ताण न घेता अभ्यासाची मजा घ्यायला हवी. 

उजळणी

अभ्यासक्रम कितीही असो, परीक्षेची तयारी करण्यास वेळ कितीही असो, पण एक गोष्ट डोक्यात ठाम बसवली पाहिजे. परीक्षेच्या दिवसात फक्त आणि फक्त उजळणी करण्याकरीता वेळ मिळाला पाहिजे. अभ्यास करण्याकरीता परीक्षेच्या वेळेस थांबणे चुकीचे आहे. त्यामुळे काहीही झाले तरीही, उजळणी परीक्षेच्या दिवसातच झाली पाहिजे. तरच तुमचा अभ्यास योग्य पध्दतीने होणे शक्य आहे.