तुम्हीही मायग्रेनच्या दुखण्याने त्रस्त आहात का?

आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे छोटामोठा तणाव, स्पर्धा, परीक्षा, खाद्यपदार्थ, कंम्प्युटर, स्मार्टफोन अशा विविध कारणांमुळे मायग्रेनचे प्रमाण वाढले आहे. मायग्रेन म्हणजे डोकेदुखी असे अनेकजण गृहीत धरतात, पण हा त्यापलिकडे जाणारा आजार आहे. जगात डायबे‌टिस व दमा रूग्णांपेक्षाही मायग्रेनचे रूग्ण जास्त आढळतात.

Story: आरोग्य | डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
27th January 2023, 10:35 pm
तुम्हीही मायग्रेनच्या दुखण्याने त्रस्त आहात का?

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे नकळत दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारीरिक दुखण्यात होत जाते. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या एवढी वाढू लागली आहे की सामान्यपणे ९५ % पेक्षा जास्त व्यक्तींना आयुष्यात कधी ना कधी हा त्रास सहन करावा लागतो. मग सतत होणारी डोकेदुखी अचानक मायग्रेनचं रूप धारण करू लागते. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल समस्या असून यामध्ये डोक्याची अर्धी बाजू दुखते. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये व अनुवांशिकतेने ही समस्या अधिक प्रमाणात दिसते.

आपल्या आधुनिक जीवनशैलीमुळे छोटामोठा तणाव, स्पर्धा, परीक्षा, खाद्यपदार्थ, कंम्प्युटर, स्मार्टफोन अशा विविध कारणांमुळे मायग्रेनचे प्रमाण वाढले आहे. मायग्रेन म्हणजे डोकेदुखी असे अनेकजण गृहीत धरतात, पण हा त्यापलिकडे जाणारा आजार आहे. जगात डायबे‌टिस व दमा रूग्णांपेक्षाही मायग्रेनचे रूग्ण जास्त आढळतात. पण, तरीही मायग्रेनविषयी फारशी जागृती नसल्याने सामान्य डोकेदुखी म्हणून याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि केम‌स्टिकडून औषधे घेऊन तात्पुरता दिलासा मिळवतात. अगदी शाळेतल्या मुलांपैकीही दहा टक्के मुलांना मायग्रेनचा आजार आढळून येतो, तसेच मध्यम वयोगटात व स्त्रियांमधे जास्त प्रमाणात उद्भवतो. त्यामुळे या मायग्रेनची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊया.

मायग्रेन म्हणजेच अर्धे डोके दुखणे किंवा अर्धशिशी. सुरुवातीला क्वचितप्रसंगी जाणवणारा त्रास कालांतराने रुग्णांच्या दुर्लक्ष केल्यामुळे व अनियमितपणे घेतलेल्या उपचारांमुळे गंभीर होतो. विज्ञानात बरीच प्रगती असली तरी मायग्रेनचे विशिष्ट असे निदान अजूनपर्यंत कळू शकलेले नाही. मायग्रेनचा त्रास सहन न झाल्याने वारंवार वेदनाशामक औषधांचा वापर केल्यावर तात्पुरता आराम मिळतो. परंतु अशा स्वरूपाच्या औषधामुळे हळूहळू मायग्रेनची तीव्रता वाढत जाते. आयुर्वेदानुसार मायग्रेन ही शरिरातील त्रिदोषांची विशेषत: वात-पित्त दोषांची विकृत अवस्था असते व दोषांच्या विकृत अवस्थेला अनुकूल आहार सेवन केला असेल, तर मायग्रेनचा त्रास वाढत जातो. 

 अनियमित जीवनशैली मायग्रेनचे सगळ्यात मोठे कारण आहे. चुकीचे आहार सेवन, मानसिक ताण-तणाव, वातावरणातील बदल या कारणांमुळे शरीरातील वात-पित्त वाढतो. आहारमध्ये अतिआम्लपदार्थाचे सेवन, शिळे अन्न सेवन, मसालेदार पदार्थांचे सेवन, उपवास, रात्र जागरण, प्रवास, दिवसा झोप, उन्हात फिरणे, उग्र वास, वातावरणातील बदल, अतिशारीरिक श्रम, मानसिक ताण-तणाव, मद्यपान, धूम्रपान व्यसन इ. मुळे शरीरातील दूषित दोषांना अनुकूल वातावरण मिळते.

लक्षणे : 

डोक्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस अथवा दोन्ही बाजूस तीव्र वेदना जाणवतात.

वेदना साधारण ६ ते ७२ तासांच्या कालावधीपर्यंत असतात.

वेदनांची तीव्रता हळूहळू वाढते.

प्रकाश /आवाज सहन होत नाही. 

मळमळ जाणवते अथवा उलट्या होतात.

शारीरिक हालचाल केल्यामुळे वेदना वाढतात.

मायग्रेनचा त्रास न वाढण्यासाठी खालील विषयांचे पालन करावेः

आहारामधे चहा, कॉफी, शीतपेय, मद्यपान, तंबाखू, धूम्रपान टाळावे, आंबट, मसाले पदार्थ टाळावे, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, दही यांचा वापर टाळावा, अतिप्रमाणात तेलकट पदार्थांचा वापर तसेच वनस्पती तुपाचा वापर टाळावा, फास्ट फूड, बेकरी पदार्थ, साबुदाणा, पोहे इ. पचनास जड पदार्थ टाळावे, आंबट तसेच कच्च्या फळांचा वापर टाळावा, अतिप्रमाणात आहार सेवन करू नये, अतिप्रमाणात पाणी पिऊ नये, उपवास टाळावा. 

विहारामध्ये प्रवास, उन्हात फिरणे, रात्री जागरण, दिवसा झोप, मानसिक अतिश्रम, मानसिक ताणतणाव, अतिशारीरिक श्रम टाळावे, अत्यंत उग्र वास व कोदंट बंद वातावरणाचा सहवास टाळावा, मल-मूत्र विसर्जनासाठी टाळाटाळ करू नये.

वेदनाशामक औषधांचा अतिप्रमाणात तसेच वारंवार वापर टाळावा.

मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी काय करावेः

मायग्रेनमध्ये आवाज आणि डोळ्यातल्या प्रकाशाची संवेदनशीलता वाढू लागते, ज्यामुळे डोकेदुखी आणखी तीव्र होते. अशावेळी शांत, एकांतात, अति प्रकाश नसलेल्या खोलीत काही तास बसून रहावे. 

मायग्रेनचा त्रास वाढू लागल्यावर, केस घट्ट बांधणे टाळावे, डोक्याला हलक्या हाताने मसाज करावा.

उन्हाळ्यात / गर्मीत मायग्रेनचा त्रास अधिक वाढतो. अशा परिस्थितीत शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी / फळांचा रस प्यावा. 

मेडिटेशन करावे. तणाव कमी ठेवावा. 

नवीन उपचारपद्धती

मायग्रेनचे नवीन-युगातील उपचार 

नॉन/मिनिमली इनवेसिव्ह असून त्यात कोणतीही औषधे समाविष्ट नसल्यामुळे, 

साइड इफेक्ट्स नसतो. पेशी आणि 

वाढीच्या घटकांचा स्त्रोत सामान्यतः रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातून असतो. हे फायदे 

लक्षात घेता आता मायग्रेनसाठी 

पारंपरिक उपचार सोडून प्रगत उपचार 

पध्दती तसेच प्रभावी आणि सुरक्षित उपचार पर्यायांकडे वळण्याची आता गरज आहे, ज्यामुळे रुग्णांना त्यांचे सुखदायक जीवनमान वाढवता येईल.