माळोली-ब्रह्मा करमळीतील दलदलीतील जंगले

दोडामार्ग तालुक्याशी सीमा भिडलेल्या गोव्यात प्रारंभी सत्तरीतल्या नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातल्या माळोलीतल्या निरंकाऱ्याच्या राईत मायरिस्टिका दलदलीचे जंगल असल्याचे पाव शतकापूर्वी प्रकाशात आले होते. त्यानंतर केरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेच्या कार्यकर्त्यांमार्फत याच पंचायत क्षेत्रातल्या ब्रह्मा करमळी येथे असलेल्या मायरिस्टिका दलदलीतल्या जंगलाच्या दोन जागा असल्याचे स्पष्ट झाले.

Story: विचारचक्र। प्रा. राजेंद्र केरकर |
25th January 2023, 12:10 am
माळोली-ब्रह्मा करमळीतील दलदलीतील जंगले

पृथ्वीची निर्मिती अंदाजे ४५४ कोटी ३० लाख वर्षांपूर्वी झाल्याचे शास्त्रज्ञ मानतात. प्रारंभी द्रव्य स्वरुपाने व्यापलेल्या पृथ्वीवर बाष्पीभवनाद्वारे पर्जन्यवृष्टी सुरू झाल्यावर वृक्षवनस्पती जन्माला अाल्या. कालांतराने जेव्हा खंड आणि महासागर विलग होण्याची प्रक्रिया कोट्यवधी वर्षांपूर्वी सुरू झाली तेव्हा पृथ्वीवर जैववैविध्याचे दर्शन घडवणाऱ्या विविध खंडांच्या निर्मितीला चालना मिळाली. आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका यांनी युक्त गोंडवन भूप्रदेशाची विलग होण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारत आणि मादागास्करची भूमी आफ्रिकेपासून अलग झाली आणि अंदाजे तीन कोटी वर्षांपूर्वी भारतीय उपखंड आणि मादागास्कर एकमेकांपासून अलग झाले. भारत आणि मादागास्करचा एकसंध असलेला भूप्रदेश सागराच्या पाण्याने दुरावलेला असला तरी तो एकत्र असल्याची साक्ष देणाऱ्या वृक्षवनस्पतीचे दर्शन आजही इथे घडते. पृथ्वीवर ज्या वनस्पतींचा उद्गम अगदी प्रारंभी झाला, त्यात जायफळ प्रजातीशी साधर्म्य असणाऱ्या मायरिस्टिका या दलदलीतल्या जंगलांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. मादागास्करची भूमी जैववैविध्याच्या असंख्य पैलूंचे दर्शन घडवत असून, इथल्या काही प्रदेशात मायरिस्टिकाच्या प्रजातीतल्या वनस्पतींचा जसा नैसर्गिक वारसा पहायला मिळतो, तसाच तो आपल्या देशातल्या पश्चिम घाटाच्या काही मोजक्याच ठिकाणी अनुभवायला मिळतो.      

मायरिस्टिका या दलदलीतल्या जंगलाचा भारतातला पहिला शोध १९६०च्या दरम्यान केरळात समाविष्ट असलेल्या त्रावणकोरच्या जंगलात लागला. त्यानंतर केरळ, कर्नाटक राज्यांतल्या पश्चिम घाटातल्या काही मोजक्याच ठिकाणी अशा जंगलांचे अस्तित्व असल्याचे उघडकीस आले. एकेकाळी अशा प्रकारच्या सदाहरित वनक्षेत्राखाली महाराष्ट्रातील कोकणची भूमी होती याची प्रचिती देणारे मायरिस्टिकाच्या प्रजातीच्या वनस्पतींचे जीवश्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत गृहबांधणीसाठी खोदकाम करताना आढळले होते. त्याच्यावर पुणे येथील आधारकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी शोधनिबंध प्रसिद्ध करून, या जीवश्माचे महत्त्व अधोरेखित केले होते. या जीवाश्माच्या शोधानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातल्या बांबर्डे गावात हेवाळेवासीयांच्या कानळाच्या देवराईत मायरिस्टिका दलदलीच्या जंगलाचा शोध लागला. दोडामार्ग तालुक्याशी सीमा भिडलेल्या गोव्यात प्रारंभी सत्तरीतल्या नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातल्या माळोलीतल्या निरंकाऱ्याच्या राईत मायरिस्टिका दलदलीचे जंगल असल्याचे पाव शतकापूर्वी प्रकाशात आले होते. त्यानंतर केरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेच्या कार्यकर्त्यांमार्फत याच पंचायत क्षेत्रातल्या ब्रह्मा करमळी येथे असलेल्या मायरिस्टिका दलदलीतल्या जंगलाच्या दोन जागा असल्याचे स्पष्ट झाले.      

माळोली गावातील निरंकाऱ्याची राई ही नानोडा, माळोली आणि उस्ते येथील ग्रामस्थांनी पारंपरिकरीत्या शेकडो वर्षांपासून राखून ठेवली होती. परंतु इथे जेव्हा लोकवस्ती, शेती आणि बागायतीचे प्रस्थ निर्माण झाले तेव्हा विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरील ही देवराई वन खात्याने संरक्षित केली. इंग्रजीतल्या ‘यू’ अक्षराच्या उलट्या आकाराची मुळे असलेल्या वृक्षवनस्पतीच्या सदाहरित जंगलाने समृद्ध असलेल्या देवराईत बारामाही वाहणारा ओहळ कार्यरत असून त्यामुळे निरंकाऱ्याच्या राईत थंडगार वातावरण आणि चवदार झऱ्याचे पाणी उपलब्ध असून सकाळ, संध्याकाळ इथे विविध फुलपाखरे, पशुपक्षी यांचे दर्शन हमखास घडते. चिखलात तग धरून राहण्यासाठी इथल्या वनस्पतींची मुळे पोलादासम रुतलेली आहेत आणि त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणीय परिसंस्था विकसित झालेली पहायला मिळते. माळोलीशी ज्या ब्रह्मा करमळीची सीमा संलग्न आहे तेथील आजोबाची तळी या देवराईत मायरिस्टिका प्रजातीच्या वनस्पतींनी युक्त अशी दलदल असून, आज ही देवराई म्हादई अभयारण्यात समाविष्ट झाल्याने शेकरू, खवले मांजर यासारख्या वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास झालेला आहे. त्याचप्रमाणे इथे ज्या सदाहरित वनस्पतींच्या प्रजाती आढळतात, त्या अन्यत्र आढळणे दुरापास्त झालेले आहे. लाजेन्ड्रा टॉक्सीकारिया ही अत्यंत संकटग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतीची प्रजाती आजोबाच्या तळीच्या देवराईचे वैभव आहे. दलदलीवर या वनस्पतीचे नैसर्गिक आच्छादन असून, त्यामुळे इथे फुरश्यांसारख्या सापांनी आश्रय घेतलेला असून फुलपाखरांचे विलोभनीय दर्शन या जागेचे वैशिष्ट आहे. सेमीकार्पस कातेलेकानेन्सीस या वृक्षांसाठी ही देवराई ख्यात आहे. आंतरराष्ट्रीय संवर्धन समुदायाने ज्या वनस्पतींना संकटग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ यादीत समाविष्ट केलेले आहे, त्यांचे दर्शन आजोबाच्या तळीच्या देवराईत घडत आहे आणि त्यामुळे वनस्पती प्राणिशास्त्र या विषयांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी ही देवराई मोठा खजिना ठरलेला आहे.      

आजोबाच्या तळीपासून हाकेच्या अंतरावर ब्रह्मा करमळी गावातली बिबट्यान ही जागा असून, येथे वनस्पतीशास्त्र क्षेत्रातल्या संशोधकांना अत्यंत संकटग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ अशा वनस्पतीच्या प्रजातींचा शोध लागलेला आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. आशिष प्रभुदेसाई, डॉ. दिवाकर मेस्त आणि डॉ. जनार्थतम यांना जिम्बाक्राथेरा कानरिका, मायरिस्टिका फतुवा, सेमिकार्पस कातेलेकानेन्सीस, त्रावकोरियम गॅम्बल अशा सहसा अन्यत्र पहायला न मिळणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती आढळलेल्या आहेत. सायजेजियम त्रावकोरियम गॅम्बल ही वनस्पती तर विस्तमृतीत जाण्याच्या वाटेवर आहे. माळोलीतील निरंकाऱ्याची राय, ब्रह्मा करमळीतील आजोबाच्या तळीची राय आणि बिबट्यान या तिन्ही वनक्षेत्रांना सुमारे १४ कोटी वर्षांपेक्षा ज्यादा काळाचा इतिहास आहे. जेव्हा पृथ्वीवर मानवी प्राण्यांचा पायरवदेखील ऐकू येत नव्हता, त्या काळातले सदाहरित जंगल सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रात आढळलेले असल्याकारणाने या प्रदेशाचे महत्त्व सजीवांच्या लाखो वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेच आहे.      

आफ्रिकेच्या मूळ खंडापासून स्वतंत्र झालेल्या मादागास्कर आणि भारतीय उपखंडात पूर्वापार असलेल्या ऋणानुबंधांची प्रचिती देणारे मायरिस्टिकाचे जंगल हे सधन नैसर्गिक वारसास्थळ आहे. पोलादासम मुळांच्या दलदलीत असलेल्या जलस्रोतांमुळे इथे वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणीय परिसंस्था निर्माण झालेली असून, त्याचा आधार मोठ्या धनेरा पक्ष्याबरोबर प्रदेशनिष्ठ मलाबार ट्री निम्फ फुलपाखरांसारख्या जीवांना लाभलेला आहे. मानवी इतिहासाच्या पूर्व काळातला खाणाखुणांचा वेध घेणाऱ्या संशोधकांसाठी हे सदाहरित वनक्षेत्र नित्य खुणावत आहे.