रणजी चषक : छत्तीसगडची गोव्याविरुद्ध शानदार फलंदाजी


24th January, 11:04 pm
रणजी चषक : छत्तीसगडची  गोव्याविरुद्ध शानदार फलंदाजी

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : रणजी चषक स्पर्धेतील ‘सी’ गटात यजमान छत्तीसगड संघाने गोव्याविरुद्ध पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगडने ४ गडी गमावून २७३ धावा केल्या.

शहिद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर - झारखंड येथे यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय छत्तीसगडच्या सलामीवीरांनी योग्य सिद्ध करून दाखवला. सलामीवीर अनुज तिवारी व शशांक चंद्राकर यांनी शानदार फलंदाजी करताना गोव्याच्या गोलंदाजांना आपल्यावर दबदबा निर्माण करू दिला नाही. दोघांनी मिळून पहिल्या गड्यासाठी तब्बल १६३ धावांची दणदणीत भागीदारी उभारली. दरम्यान आपल्या शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा अनुज वैयक्तिक ८६ धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार लगावले. ही महत्त्वपूर्ण भागीदारी विजेश प्रभुदेसाईने तोडली. 

पहिला गडी गमावल्यानंतरही छत्तीसगडने गोव्याच्या गाेलंदाजांना मैदानावर स्थिर होऊ दिले नाही. आशुतोष सिंगने शशांक साेबत मिळून छत्तीसगडला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेण्यास सुरुवात केली. दरम्यान शशांकने आपले शतकही पूर्ण केले. शतक झळकावल्यानंतर शशांक अधिक वेळ मैदानावर ​टिकू शकला नाही व १०१ धावा करून बाद झाला. गोव्यासाठी पुन्हा एकदा विजेशने गडी बाद केला. आशुतोष सिंगही वैयक्तिक ५५ धावा करून लक्षय गर्गच्या गोलंदाजीत त्रिफळाचित झाला. छत्तीसगडने आपला चौथा गडी झटपट गमावला. शुभमन अग्रवाल केवळ १ धावा करून बाद झाला. त्याला दर्शन मिसाळने आपला शिकार बनवले. यानंतर थोड्यावेळाने दिवसाचा खेळ संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हरप्रीत सिंग भाटीया २२ तर अमनदीप खरे (०) नाबाद खेळपट्टीवर होते.

गोव्यातर्फे ६ गोलंदाजांचा वापर करण्यात आला. यात विजेश प्रभुदेसाईने सर्वाधिक २ तर लक्षय गर्ग व दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळवले. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी छत्तीसगड गोव्याविरुद्ध मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल तर गोव्याचे गोलंदाज छत्तीसगडला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करतील.