एकदिवसीय मालिकेवर भारताचे वर्चस्व

|
24th January 2023, 11:04 Hrs
एकदिवसीय मालिकेवर भारताचे वर्चस्व

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

इंदूर : इंदूर एकदिवसीयमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला आहे. अशाप्रकारे भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला आहे. त्याचबरोबर या विजयानंतर टीम इंडिया आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे.

या सामन्यात न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचे लक्ष्य होते, पण किवी संघ ४१.२ षटकांत केवळ २९५ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून ड्वेन कॉनवेने शानदार शतक झळकावले, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. ड्वेन कॉनवेने १०० चेंडूत १३८ धावांची धडाकेबाज खेळी केली.

ड्वेन कॉनवेचे शतक व्यर्थ

न्यूझीलंडकडून सलामीवीर ड्वेन कॉनवेने शानदार खेळी केली, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. मात्र, त्याला उर्वरित फलंदाजांची साथ मिळाली नाही. ड्वेन कॉनवेशिवाय हेन्री निकोल्सने ४० चेंडूत ४२ तर मिचेल सँटनरने ३४ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर हे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरले. कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

भारताची दमदार सुरुवात

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी शतके झळकावताना २१२ धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहितच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. त्याने १०१ धावा केल्या. कर्णधारासोबतची भागीदारी तुटताच गिलची लयही बिघडली. एकूण २३० धावसंख्येवर भारताला गिलच्या रूपाने दुसरा धक्का बसला. त्याने ११२ धावांची अप्रतिम खेळी खेळली. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यामुळे भारताची कोंडी झाली. इशान किशन १७ धावा, विराट कोहली ३६ धावा, सूर्यकुमार यादव फक्त १४ धावा करू शकला.

पांड्याची पुन्हा अष्टपैलू कामगिरी

हार्दिक पांड्याने झंझावाती अर्धशतक झळकावून हा डाव सांभाळला. पांड्याने ५४ धावा केल्या. पांड्याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने ९, शार्दुल ठाकूरने २५ आणि कुलदीप यादवने ३ धावा केल्या. भारताच्या ३ फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली होती. यानंतर गोलंदाजांची पाळी आली, जिथे न्यूझीलंडच्या डावाच्या दुसऱ्या चेंडूवर पांड्याने सलामीवीर फिन अॅलनला झेलबाद केले.

टीम इंडिया अव्वल स्थानी

या विजयानंतर भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर न्यूझीलंड संघाला क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाने इंदूर वनडेपूर्वी तिरुअनंतपुरम आणि रायपूरमध्ये किवी संघाचा पराभव केला होता. अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मालिकेत न्यूझीलंडचा ३-० असा पराभव केला.