भारत-बांगलादेश आज पहिला वनडे


03rd December 2022, 11:30 pm
भारत-बांगलादेश आज पहिला वनडे

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

ढाका : सध्या भारतीय संघ पुढील दौऱ्यासाठी बांगलादेशमध्ये उपस्थित आहे. या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिका रविवार, दि. ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 

या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. तत्पूर्वी, एकदिवसीय मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यासाठी दोन्ही संघांचे कर्णधार मीरपूरला पोहोचले.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि बांगलादेशचा कर्णधार लिटन दास यांनी मीरपूरमध्ये या ट्रॉफीचे अनावरण केले. या क्षणाची छायाचित्रे बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केली आहेत. प्रथम दोन्ही कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, नंतर ट्रॉफी 

दाखवली. 

४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना शनिवार, दि. १० डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर १४ डिसेंबर, बुधवारपासून कसोटी मालिका सुरू होईल.

उमरान मलिक संघात सामील

भारतीय संघाच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी झालेला स्टार वेगवान गोलंदाज महम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी स्पीड मास्टर उमरान मलिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच उमरानने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत पदार्पण केले. शमीच्या खांद्याला दुखापत झाली आहे. उमरानने आतापर्यंत एकूण ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

बांगलादेशच्या कर्णधारातही बदल

बांगलादेशकडून संघाची घोषणा करताना तमिम इक्बालला संघाचा कर्णधार बनवण्यात आला होता, पण त्यालाही दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले आणि त्याच्या जागी संघाची कमान लिटन दासकडे सोपवण्यात आली. बुधवारी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यादरम्यान तमिमला दुखापत झाली होती. विशेष म्हणजे लिटन दास प्रथमच एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे. लिटन हा बांगलादेशचा एकदिवसीय क्रिकेटमधील १५ वा कर्णधार ठरला आहे.