पुष्पधारणम्

देवदर्शनाला जाताना फुले आवर्जून सोबत नेली जातात. त्या त्या देवतेला प्रिय असलेली फुले देवपूजेत वापरतात. देवीची ओटी भरताना फुलांची वेणी अवश्य अर्पण केली जाते. गोव्यात श्रावण महिन्यात जायांची पूजा केली जाते. देवी लईराईला मोगऱ्याच्या माळा अर्पण केल्या जातात. भक्ताने वाहिलेली फुले देव प्रेमाने धारण करतो.

Story: ग्रंथोपजीविये | वैद्य. रश्मिना आमोणकर |
03rd December 2022, 09:03 Hrs
पुष्पधारणम्

सुवासिनीला हळदी-कुंकू लावल्यावर फूल किंवा वेणी केसात माळायला देतात. स्त्रियाच नव्हे तर पुरूष देखील फुले अंगावर धारण करतात. भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनाला ओवाळल्यावर बहीण आपल्या भावाच्या उजव्या कानाला फूल लावते. चाचा नेहरू आपल्या कोटाच्या खिशाला नेहमी लाल गुलाब लावत असत. विवाहसमारंभाच्या वेळी फुलांची वरमाला परिधान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोव्यात बकुळीच्या फुलांची माळ नवरा-नवरीच्या गळ्यात घातली जाते. विवाह विधीच्या वेळी वराने वधूच्या केसात फुले माळायची असतात. फुलांना सौंदर्य, मांगल्य, पवित्र्याचे प्रतीक मानतात. केसात फुले माळणे, गळ्यात व हातात आभूषण म्हणून परिधान करणे आपल्या संस्कृतीत तसेच परदेशातही दिसून येते. फुलांचा गजरा सोळा शृंगारापैकी एक आहे. केसांचे सौंदर्य वाढविण्याबरोबरच फुलांचा सुगंध मन प्रसन्न ठेवतो. तसेच डोक्यातील उष्णता कमी करायला फुले मदत करतात. अंगात खूप उष्णता असल्यास माळलेला गजरा लवकर कोमेजून काळा पडतो.

गोव्यात सुरंगी, मोगरा, जाई, बकुळ, केवडा, अबोली, शेवंती ही फुले प्रामुख्याने माळली जातात. या फुलांविषयी आयुर्वेदीय ग्रंथात काय संदर्भ सापडतात ते आजच्या लेखात बघूया.

सुपुष्पाणि सुगन्धिनि नित्यं शीर्षे प्रधारयेत्।

क्लेदायाससमुद्भूतस्वेददुर्गंधनाशनम्।।

चक्षुष्यं दाहशमनं सौमनस्य च जायते।

(क्षेमकुतूहल)

सुगंधीत फुले केसात धारण केल्याने केसातील आर्द्रता तसेच परिश्रम करून उत्पन्न झालेल्या घामाची दुर्गंधी नष्ट होते. डोळ्यांसाठी हितकर असून, जळजळ शांत होते व मनाला प्रसन्नता प्राप्त होते.

पुष्पधारणाचे नियम ‘क्षेमकुतूहल’ ग्रंथात खालीलप्रमाणे दिले आहेत.

चमेली ,शेवन्ती, कुड्याची फुले, गुलाब, बकुळ, चाफा ही सर्व फुले चंदन व कस्तुरी बरोबर धारण करावीत. मंदार, पांढरे कमळ, नीळे कमळ, लाल कमळ ही फुले कापराबरोबर धारण करावीत.

आंघोळ केलेली नसल्यास मल्लिका (मोगरा) माळावा. स्नान केलेले असल्यास चमेली व बेलाचे फूल माळावे. शरीराला तेलाचा अभ्यंग करताना केवड्याचे फूल माळावे. कमळाचे फूल मात्र नेहमी धारण करता येते.

मकरन्द म्हणजे पराग असलेली फुले, जशी कि चमेली, चंदन, बेल, मोगरा डोक्यावर धारण करावीत.

ऋतुनुसार पुष्पप्रयोग

कैतकं बाकुलं पुष्पं श्रीखण्डं शतपत्रकम्। गौलालं चम्पकं पुष्पं वातश्लेष्ममहरं परम्।। उष्णवीर्यं च तत्प्रोक्तं शीतकाले प्रधारयेत्।   (क्षेमकुतूहल)

केतकी (केवडा), बकूळ, चंदन, कमळ, गुलाब, चाफा ही फुले वात व कफदोष कमी करणारी आहेत. तसेच ही फुले उष्ण वीर्याची आहेत. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात  केसात धारण करावीत.

नीळे कमळ, कुड्याची फुले, चंदन, पाटला ही फुले समशीतोष्ण आहेत. तसेच वात, पित्त व कफ तिन्ही दोष कमी करणारी आहेत. ही फुले वर्षा ऋतूत धारण करावीत. ही फुले डोळ्यांच्या आजारावर उपयुक्त आहेत.

हेमन्त व शिशिर ऋतूत कमळाचे फूल धारण करावे. केवडा वसंतात, नेपाल (कीराततिक्त) व चमेलीचे फूल ग्रीष्मात, वर्षा ऋतूत पाटला पुष्प व शरद ऋतूत चाफा धारण चरावा.

कोणते फूल किती वेळ धारण करावे यासंबंधी नियम क्षेमकुतूहल या ग्रंथात दिले आहे.चमेली ६ याम (१२ तास), नैवाल 2 मुहूर्त (९६ मिनिटे), नीलकमल ३ रात्री, केतकी ५ रात्री, शतपत्र (कमल) २ रात्री, मल्लिका म्हणजे  मोगरा १/२ रात्री, चाफा १ दिवस, पूतीपुष्प १ घटी (२४ मिनिटे), चंदन १ रात्रीसाठी धारण करावे. बकूळ, माधवी, अग्निमंथ भोजन करेपर्यंत व मंदार, दवणा, पाटल जोपर्यंत सुगंध आहेत, तोपर्यंत धारण करावे.

दोषानुसार पुष्प प्रयोग 

जातीपुष्प तिन्ही दोषांना शान्त करणारी, महादाह शान्त करणारी आहे. गुलाब दोषांचे शमन करते. नीळे कमळ पित्त दूर करणारे व नेत्रांसाठी हितकर आहे. सर्व पुष्पांमध्ये केवडा उत्तम आहे. तो कफ वाताचे शमन करतो. तसेच उष्णवीर्याचा आणि निर्मळ गुणाचा आहे.

गन्धमाल्यादिकं वृष्यमलक्ष्मीघ्नं प्रसादनम् । 

(कैयदेव निघण्टु)

सुगंधी माला धारण करणे हे शुक्रधातू वाढविणारे व पौरुषत्व जपणारे, अलक्ष्मीनाशक व प्रसन्नताजनक आहे असे कैयदेव निघण्टु या ग्रंथात दिले आहे.

रक्षोघ्नमथ चौर्जस्य सौभाग्यमुत्तमम् ।

सुमनो ऽम्बररत्नानां धारणं प्रीतिवर्धनम् ॥ 

(कैयदेव निघण्टु)

पुष्ण धारण करणे रक्षोघ्न, ओजोवर्धक, सौभाग्यवर्धक व प्रीतीवर्धक आहे. फुलांच्या सुगंधामुळे रक्षोघ्न म्हणजे नकारात्मक गोष्टींना आळा घालण्याचे कार्य होत असावे.

फुलांची माळ अधिक लांब, दुसऱ्याने वापरलेली, मळलेली असू नये. कमळ सोडून इतर लाल रंगाच्या फुलाची माला परिधान करणे निषिद्ध आहे.

फुले धारण करणे पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी, स्त्रियांसाठी, अंगात उष्णता असलेल्या लोकांसाठी, ग्रीष्म व शरद ऋतूत सर्वांसाठी हितकर आहे. आयुर्वेदीय ग्रंथांप्रमाणे पुष्पधारण हा दिनचर्या व ऋतुचर्येचा प्रमुख भाग आहे.